डॉक्टर गेले. सुनंदा औषध, फळें घेऊन आली. तिनें रंगाला औषध दिलें. त्याच्याजवळ ती बसून होती. मध्यें रस वगैरे तिनें दिला. मधल्या सुटींत वासूकाका दुचाकीवरुन घाईघाईनें आले नि बघून गेले. ताप कमी नव्हता झाला. घामाचेंहि चिन्ह नव्हतें.

रंगाचा ताप शेवटीं दोषीच ठरला. ताप हटेना, निघेना,  चौदा दिवस झाले. एकवीस झाले. ताप आहेच. रंगा थकाला. तो वातांत असे. त्याची शुध्द बिध्द गेली.

''आई, तूं चिंता नको करुं. मी सुखी आहें. मी नाहीं येणार. मला शिकायचें आहे. खरें नाही वासुकाका ? मी चित्रकार होईन. मी भारताचें नांव करीन. अमेरिका माझीं चित्रें खरेदी करील. आई, मी तुला श्रीमंत करीन. तुझ्या रंगाच्या एकेका चित्राला लाख लाख रुपये मिळतील. हंसूं नको आई. मी स्वप्नांत नाहीं कांही. चांगला जागा आहें मी. मी वातांत नाहीं. शुध्दींत आहे. नयना, खरें की नाहीं ? नयना, बोल ना ? आईची सेवा करणारी नयना. काका, महाबळेश्वरीं जायचें ना ? यंदा जाऊंच. परंतु आई नाहीं. पंढरी, ये ना रे. रंगाजवळ बसून रहा. एकटे काका किती करतील ! नयना, तूंहि ये. काकूंना म्हण 'तुम्ही झोपा. मी बसते रंगाजवळ.' पंढरी, जेवलास कीं उपाशीं ? तूं मिलिटरींत जाणार का ? तुझ्या हातांत बंदुक, माझ्या हातांत ब्रश. मी ब्रशानें क्रान्ति करणारा, तूं मिलिटरींत जाऊन क्रान्ति कर. पंढरी, हंसूं नको. अरे तुम्ही शिपायीहि पुन्हां बंड करुन उठाल. १८५७ पुन्हां होईल. १९५७ च्या आंत इंग्रज जातीलच जातील. १८४८ मध्यें यांनीं सातारची गादी खालसा केली. पाप केलें गोर्‍यांनीं. त्यांना १९४८ साल हिंदुस्थानांत दिसणार नाहीं. काका, केव्हां हो हे इंग्रज जातील ? आतां पुन्हां स्वातंत्र्याचा लढा आला तर मी जाईन हो. तुम्ही मला तीस सालीं, बत्तीस सालीं जाऊ दिलें नाहीं. आतां नाहीं मी ऐकणार. मी जाणार, जाणार.''

असें म्हणून तो ताडकन् उठे. सुनंदा, वासुकाका यांना तो आवरतां आवरत नसें. रंगाला त्या तापांत जणुं स्फुरण चढे. त्याच्या बुध्दीला जणूं पल्लव फुटत. मधेंच तो कविता रचून म्हणे. मधेंस हंसे, मधेंच बोले, उठे. एखादेवेळेस शान्त पांखराप्रमाणें निपचित पडून राही.

एके दिवशीं वासुकाका एकटेच रंगाजवळ होते. ते जणुं भावमग्न होते. त्यांचे डोळे मिटलेले होते. रंगाचा हात त्यांच्या हातांत होता. ते कांही तरी बोलत असावेत. काय बरें म्हणताहेत ?

''प्रभो, या बाळाला वांचव. तूं त्याला अमोल देणगी देऊन पाठविलें आहेस. माझें आयुष्य या बाळाला दे. मी काय सांगूं प्रभो तुला. तूं सर्वज्ञ आहेस. तुला का आम्ही सांगायचें ? तुला का कळत नाहीं ? आम्ही वेडीं माणसें.''

असें ते म्हणत होते. त्यांचे डोळे मिटलेले होते. आणि रंगानें आतां उघडले होते. तो एकाग्र दृष्टीनें काकांकडे बघत होता. आणि एकदम तो उठला. त्यानें काकांना मिठी मारली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel