रंगा दुरुन त्यांच्याकडे बघत होता. त्याचे डोळे भरुन आले. भारताच्या त्या पुण्याईला, त्यागतपश्चर्येला, त्या महान् सेवेला त्यानें भक्तिमय प्रणाम केला.
अधिवेशन संपलें. पुढारी जाऊं लागले. थंडी मी म्हणत होती. सारा पसारा लौकर आंवरण्यांत आला. आज नंदलाल जाणार होते. रंगा त्यांच्या पायां पडला.
''ये माझ्याकडे. मी वाट बघेन.''
''ही तुमची शाल.''
''अजून थंडी आहे. तुला असूं दे. तूं अशक्त आहेस. रंगा प्रकृतीला जप. जगांत अपार दु:ख आहे म्हणून चिंता नको करुं. आपल्याला देतां येईल तो आनंदाचा कण आपण द्यावा. खरें ना.'' नंदलालानीं रंगाला जवळ घेतलें. त्याच्या मुखाचें त्यानीं अवघ्राण केलें. गेले. ते साधे थोर कलावान् गेले. किती साधे ! झाडाखाली बसत. शेंगा चार खात. सत्य साधेंच असतें. नाहीं का ?
रंगा मुंबईस नाहीं गेला. मुंबईस जायला त्याचें मन तयार नव्हतें. त्याला ताईची, लिलीची आठवण येईल. तो दुधगांवला गेला. सुनंदा, वासुकाका यांना त्यानें सारे अनुभव सांगितले.
''रंगा. तूं भाग्याचा. थोरामोठ्यांना पाहिलेंस.''
''काका, नंदलालांनी मला तिकडे बोलावलें आहे.''
''तर जा.''
''मुंबईचे शिकणें ?''
''तूं का परीक्षेसाठी शिकत आहेस ? नंदलालांच्या चरणापाशी बसून शिकलास हें केवढें प्रशस्तिपत्र होईल. मी तुला पैसे पाठवीन. शिकवण्या करीन, कांही करीन. तूं जा. संधि गमावूं नकोस.''
''मुंबईचें सामान घेऊन येऊं ?''
''हो. मग कधीं जायचें ते ठरवूं. ये निघून मुंबईहून. तुला मानवतहि नाहीं ती मुंबई.''