''तुमचें एक पुस्तक अर्धवटच लिहून पडलें आहे'' सुनंदानें आठवण दिली.
''हात दुखे म्हणून तसेंच राहिलें. ते पुरें करीन. होईल. सारें ठीक होईल. हजारों, लाखोंची स्थिती तीच आपली.''
काशीताईहि आतां घरी आली होती. सुनंदा, काशीताई, वासुकाका, रंगा-चौघें आनंदांत होतीं. रंगा चित्रें काढी, कधीं वाची, कधीं पंढरीबरोबर फिरायला जाई. वासुकाका पुस्तक लिहीत; कोठें अर्ज करीत.
''रंगा, अरे दुधगांवचें बोलावणें आलें आहे.''
''दुधगांव ?''
''हो. तेथें नुकतीच गिरणी झाली आहे. वाढते आहे शहर. तेथे इंग्रजी शाळा आहे. या म्हणतात. जायचें का तेथें ? तेथील हवा सुंदर आहे म्हणतात. एका नदीचा धबधबा तेथें पडतो, म्हणून दुधगांव.''
''तेथें सुंदर निसर्ग असेल. धबधबा मी बघेन. त्याचें चित्र काढीन.''
''तूं का त्यांच्याबरोबर जाणार रंगा ?'' आईनें विचारलें.
''काशीताई, तो कोठें राहणार ? तो माझ्याजवळच असूंदे. तुम्ही सेवासदनांत रहा. सुटींत घरी या. रंगाची चिंता नका करुं. मला त्याचें ओझें नाहीं.
त्याच्या गुणांचा विकास करणें हा माझा आनंद आहे. रंगा देशाचें नांव करील. तो मोठा कलावान् होईल. त्याच्या बोटांत अपूर्व देणगी आहे.''
''तुम्हीच त्याचे खरे मायबाप'' आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.
मे महिना संपला. एक दिवस घरीं आइस्क्रीम करण्यांत आलें. पंढरी व इतर मित्र आले होते. नयना सातारला आपल्या घरीं गेली होती. काशीताईना तिची आठवण येई.
बांधाबांध झाली. आंवराआंवर झाली. कांही सामान पुढें पाठवण्यांत आलें. कांही जुनें सामान मोलकरणीला देण्यांत आलें. जायचा दिवस उजाडला.