रंगाला घेऊन वासुकाका दुधगांवला आले. त्यांना व सुनंदासहि रंगाबद्दल फार वाईट वाटे. त्याला आतां कोण होतें ? आई ना बाप, बहीण ना भाऊ. मामा होता, तो असून नसल्यासारखा. रंगावर तीं दोघें अधिकच माया ममता दाखवूं लागलीं. वासुकाका रंगाच्या गुणांची नीट वाढ व्हावी म्हणून शतं प्रयत्न करीत. ते सुंदर सुंदर मासिकें बोलवीत. चित्रांचे संग्रह मागवित. रंगासाठीं सारें. ते त्याला चित्रकलेंतील निरनिराळ्या संप्रदायांची वैशिष्ठ्यें सांगत. रजपूत कला, बंगाली कला, मोंगल कला, प्राचीन अजिंठा कला, सर्वांमधील साम्य आणि विरोध दोन्ही दाखवीत. त्या त्या कलांच्या पाठीमागचा हेतु सांगत. कमलासारखे विशाल नयन कां दाखवायचे ? दक्षिणी शिल्पांत कंबर अगदीं बारीक आणि छाती विशाल कां ? कमल पुष्प अलिप्तता दाखवतें; बारीक कंबर विषयवासनांकडे लक्ष न देणें व विशाल छाती म्हणजे पुरुषार्थशाली होणें इत्यादि भाव दाखवतात असा प्रतीकवाद वासुकाका सांगायचे. रंगाला आनंद होई. त्याला जणूं नवीन डोळे आले. त्या त्या सांप्रदायिक चित्रांकडे तो आतां रसिकतेनें पाहूं लागला. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य कलांतील विशेष अभ्यासूं लागला. वासुकाकांच्या चरणांजवळ बसावें नि शिकावें असें त्याला सारखें वाटे. त्याला कशाचा आतां तोटा नव्हता. रंग, ब्रश, सारें साहित्य भरपूर असे.

परंतु काय असेल तें असो. वासुकाका मात्र पूर्वीप्रमाणें तितके आनंदी नसत. रंगा जवळ असला म्हणजे त्यांची कळी फुललेली दिसे. परंतु एरव्हीं एकटे असले कीं ते विचारमग्न असत. क्वचित त्यांच्या डोळ्यांतून अश्रुहि घळघळत. एके दिवशीं ते एकटेच खोलींत होते. जवळ एक पुस्तक उघडें पडलेलें होतें. परंतु एकाएकीं त्यांच्या मनांत अन्य विचार आहे. समोरच्या खिडकींतून ते शून्य दृष्टीनें बाहेर पाहूं लागले. एक उंच झाड समोर होतें. तें त्यांना फार आवडायचें. परन्तु त्या झाडाकडे आज त्यांचे लक्ष नव्हतें. त्यांचे डोळे घळघळत होते.

इतक्यांत सुनंदा कशालातरी आंत आली. तिनें तें गंभीर दृश्य पाहिलें. ती अवा तेथें उभी होती. शेवटीं जवळ येऊन ती म्हणाली :

''काय झालें, डोळ्यांत कां पाणी ?''
''तूं केव्हां आलीस ? पाणी येतें मधून मधून.''
''डोळे पुन्हां तपासून तरी घ्यावे. चष्म्याचा नम्बर बघावा.''
''डोळे ठीक आहेत.''
''मग पाणी का येतं ? आणि मधून मधून येतें म्हणतां.''
''तुला काय सांगूं ?''

''मी तुम्हांला विचारणारच होतें. तुम्ही अलिकडे तितके आनंदी नसतां. कां बरें ? रंगाची आई गेली म्हणून ? परंतु त्या गोष्टी का कोणाच्या हातच्या आहेत ? आपण रंगाला सांभाळित आहोंतच. तो मुलासारखाच आहे. तो आतां परका नाहीं. तुमचं प्रेम त्याला मिळतच आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel