एका अबलेच्या जीवनांत आनंद आण. तिच्या जीवनाचें वाळवंट फुलव. माझी बाग उध्वस्त झाली होती. तेथें साप विंचू, दगडधोंडे. तूं ये नि बाग फुलव. पुन्हां प्रेमाचीं कारंजी उडव. प्रीतीचे ताटवे फुलव. आनंदाचे झोले बांधूं. तूं नि मी त्यावर झोकें घेऊं. उंच झोके. गगनाला भिडूं. भय ना भीति. तूं बरोबर असलास म्हणजे कोणाचें भय ? रंगा, तूं कां नाहीं बोलत ? तूं रागावलास ? तूंहि का माझ्यावर आग पाखडणार ? भाजून निघालेलीला आणखी भाजणार ? मी आतां तुझी ताई नाहीं. ताई मेली, कधींच मेली. मी निराळी आहें. निराळ्या नात्याची, निराळ्या वृत्तीची.

''तर मग अमृतराव म्हणत तें खरें ? ते उगीच नाहीं रागावले ? तूं का माझ्यावर असलें प्रेम करित होतीस ? या भावनेनें माझ्या आजारांत मला थोपटलेंस ?''

''त्या वेळचा माझा स्पर्श तुला बहिणीचा नाहीं वाटला ? तुला ओळखतां आला असता तो स्पर्श. त्या वेळेस तूं माझा भाऊ होतास, मी ताई होतें. परंतु मला आतां निराळा रंग चढला आहे.

मी माणूस आहे. रंगा. गेले कित्येक दिवस, कित्येक महिने येतां जातां ते मला म्हणायचे कीं त्याच्यावर होतेंच तुझें प्रेम. कर कबूल. सारखी तुझी मूर्ति ते माझ्या डोळ्यांसमोर उभी करायचे. ते मला टांचण्या टोंचीत नि विचारीत. जणूं टांचण्या टोंचून तुझी मूर्ति माझ्या रोमरोमांत ते गोंदित होते. आम्ही बायका गोंदून घेतों. सुईनें ललाट टोंचतों व आंत रंग भरतों. गाल टोंचतों नि रंग भरतों. त्यांनी तुझी मूर्ति माझ्यांत गोंदली. रात्रंदिवस तें ऐकून ऐकून तुझी ताई मेली नि निराळी तरुणी जन्माला आली. दगडावरहि संतत धार धरली तर त्याला बदलावें लागतें. मी तर मनुष्य. कुंभारीण किड्याला टोंचते नि तो किडा निराळा होतो. तसें माझें झालें. त्यांच्या बोलण्यांत जें येई तें माझ्यांत भिनूं लागलें. आणि शेवटीं माझ्या हृदयसिंहासनावर तुझी मूर्ति शोभूं लागली. मी तुझी प्रेमपूजा करुं लागलें. तूं आलास त्यांच्या आजारांत, त्या दिवशीं तुझें स्वच्छ आंथरुण घातलें, तुझ्या आवडीची भाजी केली, एका ताटांत जेऊं म्हटलें. मी तुझी आहें रंगा तुझी. त्यांनी मला तुझा रंग दिला. आतां मी कोठें जाऊं ? हें बिर्‍हाड मोडून कोठें जाऊं ? या बिर्‍हाडाचा आतां तूं धनी, तूं राजा. मला नको दूर लोटूं. माझ्या जीवनांत अमृताचे झरे वाहव. त्या अमृतरावांनीं विषवन्हीनें सारें जाळलें. तूं शीतलता आण. ये, रंगा ये. माझ्या जीवन कुंजवनांतला तूं गोपाळ. वाजव तुझी मुरली, प्रेमाची बांसरी. मला भूतकाळ विसरुं दे. केवळ उज्ज्वल भविष्य दिसूं दे. प्रेमाची नगरी उभी राहूं दे. सुंदर, शोभायमान. रंगा, हा घे माझा हात. धर हा हात. घे ना. कायरे यांत पाप आहे ? यांत ना दंभ ना पाप. या सागरासमक्ष, या आकाशांत उगवणार्‍या तारकांसमक्ष, माझा हात हातांत घे. माझें खरें लग्न लाव.''

तिनें आपला थरथरणारा हात त्याच्या हातांत घुसडला. तो स्तब्ध होता.
''ताई, हे अशक्य आहे. तूं माझी ताईच आहेस. ताईच रहा. लिलीची तूं आई. अमृतरावांची पत्नी.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel