''थोर आहे तुझी आई.''
''तुझी कशी होती ?''
''मला आठवत नाहीं. मी लहान असतांनाच आई वडील देवाघरी गेलीं. अरे स्वत:च्या मुलांचे कोणतीहि आई चांगलेंच करील. परंतु दुसर्‍यांच्या मुलांचेहि करील ती खरी माता. तुझी आई खरी माता आहे. तिची वत्सलता सर्वांसाठीं आहे. मी जातों रंगा.''

पंढरी निघून गेला. वाड्याच्या दरवाजांत रंगा उभा होता. तो आईची वाट बघत होता. त्याला आई दिसली. तो धांवला. परंतु आज आई एकटी नव्हती.

''रंगा, ही नयना तुझीं चित्रें बघायला आली आहे.''
''आई, तूं माझी जाहिरात नको करुं. मी का मोठा चित्रकार आहें ?''
''माझ्या हातांत बाळ तुझें चित्र होतें. हिनें पाहिलें. तिला आवडलें. तीहि चित्रकार आहे.''

''त्यांची चित्रें कोठें आहेत ?''
''ती दाखवण्यासारखीं नाहींत.''
''तुम्ही आणलीं असालच. माझ्या खिशांत माझीं चित्रें असायचींच. तोच तर आपला आनंद, तो प्राण.''

सारीं घरीं आलीं. रंगानें आपली चित्रशाळा दाखविली. नयना बघत होती.
''हें बुध्ददेवांचें चित्र सुरेख आहे.''
''वासुकाका मला प्रसंग सांगतात, मी चितारतों.''
''तुमचे ब्रश बघूं.''
रंगानें आपले ब्रश दाखविले.
'झपझप् काढायला हा ब्रश उपयोगी पडतो. चिनी चित्रकार फटके मारीत भरभर रंगवतात. कुंचल्याचे तीनचार फटके आणि निसर्गदृश्य समोर उभें करतात. ठसठशीत असतात त्यांच्या रेषा.''
''तुम्हांला हें सारें कोण शिकवतो ?''
''वासुकाका.''
''मी मधूनमधून येत जाईन. मला फार आवड आहे चित्रकलेची.''
''तुमचीं दाखवा ना चित्रें  नक्की आणलीं आहेत तुम्ही.''
नयनानें पिशवींतून चित्रें काढलीं. रंगा तीं पहात होता.
''छान आहेत'' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel