अशा कठीण परिस्थितींतहि संस्थानांतून चळचळ सुरूं झाली. काठेवाड, राजपुतांना व मध्य हिंदुस्थान इकडे स्वर्गस्थ मणिलाल कोठारी यांनीं चळवळीचें बीज रोंवले. काँग्रेसमधील पुष्कळसें व्यापारी ह्या संस्थानांतील आहेत. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या विचारांचे लोण तिकडे गेलें. १९२०- मध्यें, ३०-३२ मध्यें जे सत्याग्रह झाले त्या सत्याग्रहांमध्यें अनेक संस्थानांतून सत्याग्रही आले होते. ज्या संस्थानांतून अधिक सत्याग्रही आले त्या संस्थानांतील प्रजेची चळवळ वाढली.
काँग्रेसनें स्वत: ही चळवळ हातीं घेतली नहीं. परंतु स्टेट काँग्रेस स्थापन होऊन तिच्या शाखा संस्थानांतून सुरू झाल्या. काँग्रेसचा नैतिक पाठिंबा या चळवळीस होता.परंतु ब्रिटिश सरकारशी लढण्यांत आपण अप्रत्यक्षपणें संस्थानिकांशहि झगडत आहोंत, ही गोष्ट काँग्रेस जाणून होती. ब्रिटिश हिंदुस्थानांत जर स्वराज्य आलें तर संस्थानांत आलेंच.
परंतु संस्थानांतील प्रजेनेंहि चळवळ करणें जरूर होतें. विधायक कामांच्या द्वारा सर्व जनतेंत आधीं विचार-जागृति करणें, जनतेशी संबंध जोडणें हा काँग्रेसचा मार्ग. त्या मार्गानें निरनिराळया संस्थानांतून काम सुरू झालें. अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन झाली. काँग्रेसनें त्यासाठीं आपलें एक खातेंहि असें काय सुरू केलें. स्वत: जवाहरलाल या परिषदेचे सेक्रेटरी झाले. संस्थानांतील घडामोडी प्रसिध्द होऊं लागल्या.
१९३६-३८ साली सर्व हिंदुस्थानभर कधीं नव्हती अशी संस्थानी चळवळींची लाट आली. कारण ब्रिटिश हिंदुस्थानांत प्रांतांतून प्रांतिक सरकारें स्थापन झाली होती. त्यामुळें जवळच असलेल्या संस्थानी प्रजेलाहि स्फृर्ति आली. त्या संस्थानांतील सत्याग्रही चळवळ करूं लागले. काँग्रेसकडे ठिकठिकाणाहून चळवळ सुरू करण्याची परवानगी मागण्यांत येऊं लागली. गांधीजी विचार करीत होते. काठेवाड, म्हैसूर, जयपूर वगैरे ठिकाणी चळवळ सुरू झाली. त्रावणकोरकडेहि चळवळ सुरू झाली होती. निजाम स्टेट तर सर्वांत मागासलेले ! तेथेहि स्टेट काँग्रेसनें सत्याग्रह सुरू केला. कोल्हापूर संस्थानांतहि चळवळ सुरू झाली. बडोद्यांत हालचाल दिसूं लागली. राजकोट तर पेटत चाललें.
निजाम स्टेट काँग्रेसनें सत्याग्रह सुरू करतांच हिंदुमहासभाहि तेथें सत्याग्रह करण्यास निघाली ! आर्यसमाजहि उठावला. स्टेट काँग्रेसच्या चालकांनीं बाहेरच्या या लोकांस पुन्हा पुन्हा प्रार्थिले, '' तुम्ही येऊं नका. आमचा लढा आम्ही चालवूं. '' परंतु स्टेट काँग्रेस म्हणजे शेवटी काँग्रेसचीच संस्था. त्यामुळें काँग्रेसचीच प्रतिष्ठा वाढेल आणि उद्यां पुन्हा निवडणुकी आल्या तर आपल्याजवळ सांगायला कांही हवे कीं नको, असें मनांत येऊन हिंदुमहासभेनें आपलें पिल्लू त्यांत घुसडलें !