पंजाबमध्यें शीख व हिंदु आहेत. ज्या जिल्हयांतून त्यांची अधिक वस्ती असेल ते अलग करा, असें ते म्हणतील. पश्चिम बंगालमध्यें हिंदुंची संख्या अधिक आहे. तेथील हिंदु म्हणतील आम्ही निराळे होतों. कसें करायचें या पाकिस्तानचें? सरहद्द प्रांत कदाचित् हिंदुस्थानांतच राहूं इच्छील. मग पाकिस्तान कोणाचें? पंजाबचा थोडा भाग, सिंध आणि बंगालचा पूर्व भाग यांचें का पाकिस्तान बनवायचें? आणि लष्कर व आरमार कोठें ठेवणार? पूर्व बंगालचे रक्षण कसे करणार? त्याच्याशीं संबंध कसा ठेवणार? एका पाकिस्तानचे का दोन तुकडे, एक पूर्वेस व एक पश्चिमेस असे ठेवणार? आणि आर्थिक दृष्टया हें सारें कसें शक्य होईल?

आणि उद्यां पाकिस्तान एक स्वतंत्र देश मानला तर किती आपत्ति येतील ! हिंदु हिंदुस्थानांत जे दोन तीन कोटी मुसलमान असतील त्यांना का तेथें विदेशी समजायचे? मुसलमान पाहतांच हा दुस-या देशांतील असें का मानायचें? आणि पाकिस्तानांत जे दोन तीन कोटि हिंदु असतील त्यांना मुसलमान का परदेशी मानणार? पाकिस्तानांत हिंदूंना व हिंदूस्थांनांत मुसलमानांना नागरिकत्वाचे हक्क राहतील का? कारण ते निराळया देशाचे मानले जाणार? असें एकमेकांस विदेशी मानणें शक्य होइल का? शेंकडो वर्षे जे एकत्र राहिले ते उद्यांपासून एकमेकांस केवळ दुस-या देशाचे असें मानू शकतील का?

आणि अशीं अलग राष्ट्रे करुन राहणें ही गोष्ट कालाच्या ओघाविरुध्द आहे ! लहान लहान तुकडे करुन त्यांचीं राष्ट्रे करण्याचे दिवस संपत आले आहेत. छोटया-छोटया राष्ट्रांचे दिवस जाऊन विशाल राष्ट्रांचे दिवस येत आहेत. हिंदुस्थान आधींच एक विशाल राष्ट्र आहे. सर्वांना एकत्र नांदविण्याचा प्रयोग करितच आलें आहे. आणि हाच प्रयोग उद्यां व्हावयाचा आहे. अशा विशाल राष्ट्रांला खंड-राष्ट्र म्हणा पाहिजे तर. येथें खंड याचा अर्थ तुकडा नसून अशिया खंड वगैरे शब्दांत जो अर्थ आहे, आणि काँग्रेस प्रांताना संपूर्ण स्वायत्तता देऊं करित आहे, आणि काँग्रेस प्रातांना संपूर्ण स्वायत्तता देऊं करित आहे, एवढेंच काय त्यांना अलग राहायचेंच असेल तर तोहि हक्क मान्य करित आहे ! परंतु तेथील सर्व जनतेनें तें ठरवावें. काँग्रेसची श्रध्दा आहे कीं प्रांतांनी एका अर्थी स्वतंत्र राहून दुस-या अर्थी एका विशाल संघटनेंत राहणें हेंच उद्यां सारे मान्य करतील. कारण त्यांतच कल्याण आहे, संरक्षण आहे, विकास आहे.

बॅ. जिनांचें असें कां म्हणणें आहे का एक मुस्लीम फेडरेंशन व एक हिंदू फेंडरेशन असावे? आणि या दोन फेडरेशनांचे कांही प्रतिनिधि घेऊन त्यांचें एक पुन्हा वरिष्ठ कार्यकारी फेडरेशन असावें? या वरिष्ठ संयुक्त फेडरेशनांत प्रतिनिधि का समान घ्यायचे? जिनांच्या मनांत काय आहे? कदाचित जिनांच्या डोळयांसमोर स्वतंत्र हिंदुस्थान ही वस्तुच नसेल ! मुस्लीम पाकिस्तान व हिंदू हिंदूस्थान यांच्या डोक्यांवर सदैव ब्रिटिश सत्ता असावी असेंहि त्यांच्या मनांत असेल. कारण ब्रिटिश नसतील तर कसं व्हायचें? हिंदु फेडरेंशन तर बलवान होईल्. मुस्लीम फेडरेशनला भीति वाटणार. आणि बॅ. जिनांचें पाकिस्तान ब्रिटिशांचें मांडलिक राहूं पाहणार ! मुस्लीम जनतेला हें आवडेल का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel