पलटणींतील लोक असतात ना, त्यांना अज्ञानांत ठेवण्यांत येत असतें. सरकार पसंत करील तींच वर्तमानपत्रें मिळालीं तर त्यांना मिळतात. नवाकाळ, लोकमान्य, लोकशक्ति, क्रॉनिकल अशीं राष्ट्रीय पत्रें पलटणींत जातील का? पलटणींतील शिपायांना पशूप्रमाणे मारामारींसाठी तयार ठेवण्यांत येते ! गोळी घाल म्हणतांच त्यांनी गोळी घातली पाहिजे. सत्य काय असत्य काय, याचा विचार त्यांनी करायचा नसतो. पलटणींत जसें हे विचारशून्य टॉमी तयार करण्यांत येतात तसेच आम्हीहि आज टॉमी तयार करीत आहोंत ! शत्रूंचाद्वेष ही एकच गोष्ट शिपायांस सांगण्यांत येतें. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीच्या वेळेस फ्रेंच लोक म्हणजे आग लावणारी माकडें आहेत, अशा प्रसार इंग्लंडमध्यें करण्यांत येई. एकदां फ्रेंच कैदी लंडनमधील रस्त्यातूंन नेले जात होते. फ्रेंच माणसास खरोखरीच पाठीमागें शेपटें असतात कीं काय तें पाहण्यासाठी त्यांचे कोट इंग्रज लोक पाठीमागून गंभीरपणें उचलून बघत !  विषारी प्रचाराचा असा परिणाम होत असतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतें बौध्दिक खाद्य दिलें जातें? वर्तमानपत्रांत मुसलमानांनी केलेले अत्याचार जे येतील, त्यांचीं कात्रणें म्हणजे यांचे वेद ! ''कृण्वन्तो विश्रमार्यम्'' हें यांचें ब्रीद वाक्य. ''हिंदुस्थान है हिंदुओंका, नहीं किसी के बाप का.'' हा यांचा महान मंत्र. जर्मनीने ज्यू हद्पार केले. आपणहि मुसलमानांना घालवूं, हें यांचें स्वप्न. आपली संस्कृति, आपला धर्म किती उच्च ! हे मुसलमान म्हणजें बायका पळवणारे. मुसलमान म्हणजे शुध्द पशु. त्यांना न्याय ना नीति. मुसलमानांना लांडे या शिवाय दुसरा शब्द ते लावणार नाहीत. असा हा मुसलमान द्वेष लहान मुलांच्या मनांत ओतण्यांत येत आहे. मुस्लिम लीग व हिंदुमहासभा दोघांकडून हें पाप होत आहे.

बायबलमध्यें एक वाक्य आहे, ''माझ्या लहानग्यांना जो बिघडवितो त्यानें सर्वांत मोठें पाप केलें !'' आज असें पाप आमचे जातीय पुढारी करीत आहेत. त्यांना ना धर्माची ओळख ना संस्कृतीची. एखाद्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष करणें म्हणजें केवळ मनुष्यद्रोह आहे. भलेबुरे लोक सर्वत्रच आहेत. त्यामुळें सर्वच्या सर्व लोकांना पशु मानणें म्हणजे बुध्दिचें दिवाळें निघाल्याचें चिन्ह आहे. १९१४-१८ च्या महायुध्दांत शत्रूकडच्या कैद्यांना सर्वांत चांगल्या रीतीने जर कोणी वागविलें असेल तर तें तुर्कस्ताननें, असा युरोपिय राष्ट्रांनीं निकाल दिला. तुर्की लोक मुसलमान धर्माचेच आहेत. मुसलमान लोक सभ्यता, दिलदारी याबद्दल प्रसिध्द आहेत. हिंदुस्थानांतील सारे मुसलमान का पै किंमतीचे? कोटयवधि लोक पै किंमतीचे निर्माण करणारा तो ईश्वरहि मग पै किंमतीचा ठरेल.

हिंदुस्थानांतील मुसलमान हिंदूंतूनच गेलेले असेंहि आपण म्हणतों. जर हे हिंदी मुसलमान तेवढे वाईट असतील तर आपण हिंदूच वाईट असा त्याचा अर्थ होतो. कारण हे मुसलमान प्रथम हिंदुच होते, असें आपण सांगत असतों. वसंता, पापाचा मक्ता कोणा एका जातीला नाही. हिंदू स्त्रियांना मुसलमान गुंड पळवतात. पुष्कळ वेळां आमच्याच श्रीमंत लोकांना त्या सुंदर स्त्रिया हव्य असतात. मुली किंवा बायका पळविण्या-या टोळया असतात. त्यांत हिंदु व मुसलमान दोन्ही प्रकारचे लोक असतात, असें दिसून आलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel