गांधीजींचा मुद्दा हा कीं, सत्ता एकाच्या हातांत नको. भांडवलशाही समाजपध्दतींत शेवटीं असा क्षण येतो कीं ज्या वेळेला फॅसिस्ट हुकुमशाही तरी निर्माण होते किंवा साम्यवादी हुकुमशाही निर्माण होते. भांडवलशाही समाजाच्या परिणतावस्थेंत संघटित कामगार क्रान्ति करून समाजवाद स्थापन करतो. त्या वेळेस कामगार-हुकुमशाही कांहीं दिवस असते खरी, परंतु ती आपोआप पुढें नष्ट होईल. कामगार हुकुमशाह ही तात्पुरती, संक्रमणावस्थेंतील होय. ती हुकुमशाही चिरजीव नसते. कांहीं संघटीत कामगार क्रांति करतात. परंतु सर्वच्या सर्व समाज नवीन प्रकारास तयार असतोच असें नाहीं. समाजवादी क्रांति कामगार करतो. तो क्रान्तीचा आघाडीचा शिपाई असतो. कामगारांस गमवायला काहींच नसते. त्याला ना घरदार ना जमीन. म्हणून तोच राष्ट्राच्या मालकींची उत्पादन-साधनें आपलीं व्हावींत यासाठी झगडायला उभा राहतो. परंतु शेतकरी जमिनीला चिकटलला असतो. तो सावकार किंवा जमीनदार यांच्या पाशांतून मुक्त होण्यापुरता क्रान्तीत सामील होतो. परंतु ' सर्व जमीन समाजाची ' असें म्हणावयास तो एकदम तयार होणार नाही ! सामुदायिक शेती करावयांस तो एकदम तयार होत नाहीं. त्याला हळुहळु सामुदायिक शेतीचे फायदे शिकवावे लागतात. प्रचार करावा लागतो. थोडी सत्त्कीहि करावी लागते. संपूर्णपणें समाजवादी प्रयोग होईपर्यत अशा अडचणी असतात. त्यासाठी कांही दिवस हुकुमशाही असते. तसेंच हा नवीन प्रयोग हाणून पाडण्यासाठी भांडवलवाले-लहान वा मोठे-प्रयत्न करीत असतात. ते असंतुष्ट झालेले असतात. त्यांची चैन नाहींशी होते. त्यांचा बडेजाव व रुबाब जातो. इतर भांडवलशाही राष्ट्रांशी ते संगनमत करतात. कट रचतात. या सर्व गोष्टीचा वेळींच प्रतिकार करता यावा यासाठीं संक्रमणावस्थेंत कामगार-हुकुमशाही निर्माण होणें अपरिहार्य असतें. जगांतील भांडवलवालेहि हा प्रयोग यशस्वी होऊं न देण्याची पराकाष्ठा करतात. कारण दुस-या एखाद्या देशांत शेतकरी-कामकरी सुखी झालेला दिसला तर आपल्या देशांतील शेतकरी -कामगारहि त्याच मार्गानें जाऊं पाहतील अशी त्यास भीति वाटते. म्हणून हा स्फूर्तीचा झरा नाहींसा करावा, ही ज्वाला विझवून टाकावी, हा आदर्श प्रयोग मातींत गाडावा म्हणून भांडवलवाले अट्टाहास करता. जोंपर्यंत आजूबाजूस भांडवलशाही आहे तोपर्यंत समाजवादी प्रयोग करणा-या राष्ट्रांस नेहमीं लढाईच्या पावित्र्यांत रहावें लागतें. आणि राष्ट्राला लढाईच्या तयारींत ठेवण्यासाठी हुकुमशाहींची जरूरी असते. लढाईच्या वेळीं एकाच्या हातीं सूत्रें द्यावीं लागतात. स्टॅलिन अशा अर्थाचें एकदां म्हणाला कीं '' रशियांत ऊन हुकुमशाही आहे. पण ती का आहे? आम्हांला सत्तेची स्पृहा नाहीं. अपरंपार किंमत देऊन जो हा प्रयोग आपण केला आहे तो मातींत जाऊं नये एवढयासाठी येथें हुकुमशाही आहे. आपण सुरक्षित आहोंत असें तुम्हांस वाटतें का? सांगा.जर खरोखर तुम्हांस आपण सुरक्षित आहोंत, आपला प्रयोग आतां सुरक्षित आहे, असें वाटत असेल तर सांगा. आतां या क्षणी मी अधिकारसूत्रें खालीं ठेवतो ! परंतु सभोवत पहा. आपल्यावर हल्लें चढविण्यासाठीं सारे टपलेले आहेत. जें रोपटें आपण लावलें, ते उपटून टाकावयास भांडवलशाही जग अधीर आहे. अशा परिस्थितीत आपण नेहमीं सज्ज राहिलें पाहिजें. आपला प्राणप्रिय प्रयोग नष्ट न होऊं देण्यासाठी सर्व कष्ट सहन केले पाहिजेत.
पण हुकुमशाही हें समाजवादाचें ध्येय नाहीं. हळूहळू सारी जनता तयार होईल. नवीन प्रयोग पचनीं पडेल. अंतर्गत विरोध नाहींसें होतील. सभोंतीचे शेजारी निवळतील. आणि मग हुकुमशाही आपोआप गळून पडेल. मार्क्सवादी ' सरकारहीन समाज ' हें ध्येय मानतात. सरकारच नाही ! सुरळित असें सहकारीं समाजयंत्र चाललें आहे. एक दिवस उजाडेल व मानव इतका विकसित झालेला दिसेल. म्हणून सत्ता एकाहातीं नसावी, हें गांधीवादींतील तत्व आम्हांसहि मान्य आहे. फक्त संक्रमणावस्थेंत, प्रयोगाच्या बाल्यावस्थेत आम्हांला हुकुमशाही ठेवणें जरूर पडते. परंतु ते शेवटच्या अराज्यवादी, सरकारहीन ध्येयाचें साधन आहे.
गांधीवादींचें तिसरें म्हणणें असें कीं, प्रजा फार एकत्र येऊ नये. लोकांची एकेका शहरांत फार गर्दी होऊं नये. समाजवादी म्हणतात कीं, आमच्या आदर्श समाजघटनेंत सत्तर सत्तर मजल्यांच्या इमारती बांधून कबुतरांसारखे लोक गर्दी करुन राहात आहेत असें दिसणार नाहीं ! आमचीं शहरेंच खूप विस्तृत, लांब - रुंद असतील. कामगारांच्या चाळी दूर दूर असतील. मधून सार्वजनिक बागा असतील. कारखाने एका बाजला असतील.कामगार दूर राहात असले तरी त्यांना ताबडतोब नेण्यासाठी ट्रामगाडया, आगगाडया व विमानें असतील. अशीं सुंदर ऐसपैस, मोकळी शहरें आम्ही निर्मू. म्हणजे गांधीवाद्याचा हा तिसरा आक्षेपहि उरत नाहीं.
वसंता, येथेंच हीं उत्तरें प्रत्युत्तरे संपलीं असे नाहीं. दोन्ही पक्षांचे आणखीहि पुष्कळच तात्विक विवेचन आहे. खंडन-मंडन आहे. तें पुढील पत्री लिहीन. हा विषय इतका गहन आहे कीं, वाचावें व एकावे तेवढें थोडेंच ! गांधीवादी विचार कळण्यासाठी आर्चाय कृपलानी यांचे ' गांधीयन वे ' हें वाच. ' गांधी-विचार-दोहन ' हें पुस्तकहि वाच. सर्वोदय मासिकाचे अंक वा आचार्य जावडेकरांचे ' आधुनिक भारत ' वाच. समाजवाद कळण्यासाठी मराठींतील ' समाजवादच कां? ' ' रशियांतील राज्यक्रान्ति, ' ' समाजवादाचा ओनामा, ' लेनिन मार्क्सची चरित्रें, वादविवेचन मालेचीं पुस्तकं चाव. आज पुरे.
सर्वांस प्रणाम.
तुझा
श्याम