उद्योगधंद्यांतून शाळेला पैसे मिळालेंच पाहिजत असे नाही. पंरतु ही पध्दती शास्त्रीय आहे असें ठरले. जगांतील काही शिक्षणशास्त्रज्ञांनी ही पध्दती योग्य आहे असे म्हटलें. या पध्दतीतून अर्थात द्रव्यही निर्माण होईल. नाना वस्तू तयार होईल. कापसाचा मूलभूत उद्योग घेतला तर सूत निघेल, कापड होईल. शेतीचा मूलभूत उद्योग घेतला तर फुलें, फळें, भाज्या, धान्य यांची निर्मिती होईल. भातकाम घेऊं तर विटा, मडकी, कौले, खुजे, पेले निर्माण करुं. आणि जसजशी पध्दति अधिकाधिक व्यवस्थित हाईल तसतसें निर्माणही चांगले हाईल. त्या वस्तू विकतां येतील. मुलांनाही अभिमान वाटेल. मुलांना कंटाळा येणार नाही. 'देशांतील लोकांनी दारु पाजून तुझ्या शिक्षणाला पैसे घेणे चांगले का?' असे मुलांना विचारा. ती 'नाही' म्हणतील. 'आपली शाळा आपण चालविली आहे. आपल्या श्रमांतून चालविली आहे, याचा तुम्हांला आनंद नाही का वाटणार?' असे मुलांना विचारा. मुले कंटाळत नाहीत. मुलांची उत्साहशक्ती अनंत असते. त्यांच्या भावना निर्मळ असतात. मुलांनीच जगांत क्रांन्त्या केल्या मुलें उदात्त भावनांना एकदम मिठी मारतात. त्यांच्या भोंवती तसे वातावरण ठेवा म्हणजे झाले.
मुलें कंटाळलेली नाही, जी आजच्या शिक्षणाला कंटाळलेली आहेत. कंटाळलेले जर कोणी असतील तर सुशिक्षित लोक ! त्यांना नवीन प्रयोग नको. चालेले आहे. ते बरें अशी त्यांची मरतुकडी वृत्ती ! 'जगाच्या प्रयोगांत हिंदुस्थान कांही भर घालीत आहे, करुं या प्रयोग, दीडशे वर्ष तो प्रयोग झाला; आता हा करुं, हा प्रयोग पूर्णतेस नेऊं, त्यांत अनुभवाची भर घालूं, आपल्या दरिद्री देशाच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवूं.' असे यांच्या मनांतही येत नाही ! 'सरकारने जनतेच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केलाच पाहिजे' अशी वाक्ये झोकून देतात. परंतु उद्यां स्वराज्य आल्यावर एकदम कोठॅन येणार आहे पैसा? गरीब ना आहे आपला देश? आणि इतर देशांची लुटमार करुन तर आपणांस पैसा नाही ना आणावयाचा? आपला तर अहिंसक मार्ग. सारे देश स्वतंत्र असोत. कोणाची पिळवणूक नको. असे ना आपले म्हणणे? मग शिक्षणाचा प्रश्न कसा सुटेल. श्रमाची माहितीही पटेल. पांढरपेशे व श्रमणारे हे भेद जातील. संशोधक वृत्ती वाढेल. हिंसेची भावना कमी होईल. पोटाला धंदा मिळेल. वर्धा शिक्षण पध्दती म्हणजे 'वर-दा' वर देणारी आहे. महात्माजींची ही थोर देणगी आहे. राष्ट्राला हा वर आहे. मृत राष्ट्राला ही संजीवनी आहे. वसंता, वर्धा शिक्षण पध्दती म्हणजे काय याची तुला व तुझ्या मित्रांना थोडीफार कल्पना येईल अशी मला आशा आहे.
तुझा
श्याम