आणि मी मागेंच सांगितलें आहे कीं, पूर्वीच्या इतिहासांतून भलें तें घेऊन पुढें जाऊं या. वसंता, परवा गाडींत एक गृहस्थ भेटले होते. ते म्हणूं लागले, '' मुसलमानांचें सारें आमच्या उलट. त्यांना धर्मच नाहीं. हिंदूंच्या उलट करणें म्हणजें जणूं त्यांचाधर्म ! आम्ही पूर्वेकडे, सूर्याकडे तोंड करूं तर त्यांचें पश्चिमेकडें तोंड. आम्ही दाढीं काढूं तर ते दाढी राखतील. आम्ही अलग अलग जेवूं. ते एका थाळींत जेवतील. '' असें त्या गृहस्थांचें व्याख्यान चालूं होतें. लहान कोंवळया मुलांनाहि या गोष्टी सांगण्यांत येतात, परंतु केवळ हिंदूंच्या उलट करणें हा त्यांत हेतु नाहीं. मक्का पश्चिमेकडे आहें. तिचें स्मरण म्हणून ते पश्चिमेकडे तोंड करतात. आपल्यांतहि उत्तरेकडे तोंड करुन औषध घेण्याची पध्दत आहे. संध्येच्या वेळीं कधीं कोणी उत्तरेंकडेहि तोंड करतात. कां बरें? आपण उत्तर ध्रूवाकडून आलों त्याची तू खूण आहे. मुसलमान पश्चिमेकडे पाहतात म्हणून जर त्यांना या देशांत स्थान नसेल तर आपण उत्तरेकडे पाहतों म्हणून आपणांसहि नसावें. मुसलमान बाहेरून येथें आले आणि आपण का येथलेंच आहोंत? आपणहि ध्रूवावरच्या बर्फात पुन्हा मरायला जाऊं या. फक्त द्रवीडियन लोकांना येथें राहूं दे.

त्या त्या देशांतील परिस्थितीप्रमाणें रीतिरिवाज पडत असतात. अरबस्थानांत वाळवंटे आहेत. वा-यानें वाळॅ उडते. दाढीमुळे संरंक्षण होतें. ती वाळू नाकातोडांत शिरत नाहीं. अरब लोक एकत्र जेवत. त्यांचे खाणें कढी-आमटीचें नसे. त्यांचा आहार म्हणजे सुका मेवा, किंवा कोरडी भाकर. चादरीवर खजूर पसरीत, एकत्र खात. ती चाल इकडेहि आली. इकडे कढीभात ते खाऊं लागले ! परंतु एकत्र जेवणाची चाल राहिली. मारवाडांत पाणी कमी म्हणून तेथें भांडी कोरडयाच राखेनें घांसतात. मारवाडी महाराष्ट्रांत आले तरी तीच चाल त्यांची राहिली. अशा चाली राहतात. त्या केवळ दुस-यांच्याविरुध्द वागण्यासाठी नसतात.

मुसलमान,गाईची कुरबानी करतात. या चालींचा इतिहासहि पाहिला पाहिजे. एक मुसलमान साधु होता. देव व देवदूत यांच्यांत चर्चा चालली होती. देवदूत म्हणाले, '' देवा, तो कांही तुझा खरा भक्त नाहीं. '' देव म्हणाला, '' तो साधु माझाखरा भक्त्त आहें.  मी त्याची परीक्षा घेतों. '' देव त्या साधूच्या स्वप्नांत आला व म्हणाला, '' तुझी सर्वांत प्रिय अशी जी वस्तु असेल ती मला अर्पण कर. '' साधु दुस-या दिवशी जागा झाल्यावर विचार करूं लागला. त्याचीं आवडती एक बकरी होती. देवानें ती बकरी कां मागितली? त्यानें ती आवडती बकरी बळी दिली. परंतु देव पुन्हां स्वप्नांत आला व म्हणाला, '' त्या बकरीहूनहि प्रिय अशीं एक वस्तु तुझ्याजवळ आहे ती मला दे. '' साधु सकाळी विचार करूं लागला. तो म्हणाला, '' खरेंच. माझा मुलगा मला बकरीहूनहि प्रिय आहे. '' त्यानें आपल्या मुलाला बळीं द्यायचें ठरविलें. मुलाला मारण्यासाठी त्यानें तलवार वर केली तोंच देवानें वरचेवर हात धरला. प्रभु म्हणाला, '' तूं माझ्या कसोटीस उतरलास. तूं खरा भक्त आहेस. '' अशी ही गोष्ट आहे. त्या गोष्टीची स्मृति म्हणून मुसलमान त्या दिवशीं कुरबानी करतात. केवळ हिंदूच्या भावना दुखविण्यासाठी नव्हें. परंतु मुसलमानांसहि ही रुढी कां आली तें माहीत नाहीं, आपणांसहि माहीत नाहीं. आपण गाईची पूजा करणारे. आपणांस वाटलें कीं, मुसलमान मुद्दाम हें करतात. आणि अडाणी मुसलमानांसहि वाटलें कीं, बरें आहे हें हिंदूंना चिडविणें !

किती तरी मुसलमानांच्या घरींहि गाई असतात. आपण हिंदू प्रेम करतों त्याप्रमाणें तेहि करतात. आणि हिंदूंत तरी गाईवर कितीसें प्रेम आहे? गाईची अवलाद सुधारणे, तिचें दूध वाढविणे, हें सारें दूरच राहिलें, गाईला आपण वेळेवर खाऊं घालणार नाहीं, पाणी पाजणार नाहीं. आपण स्वत:ला गोपूजक म्हणवितों, परंतु म्हशींची उपासना करतों व त्यांचें दूध पितों !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel