हिंदुमहासभेचासत्याग्रह निजामसंस्थानांतील अन्यायाच्या चिडीनें नाहीं सुरू झाला, तर काँग्रेसला नामोहरम करण्यासाठीं तो सुरू करण्यांत आला होता. निवडणुकीच्या दृष्टीनें तो सुरू केला गेला होता. नाशिक वगैरे ठिकाणी त्यांच्या पुढा-यांनी ही गोष्ट सांगितली. हया हिंदु महासभावाल्यांना निजामी प्रजेची तळमळ नव्हती. उद्यांच्या निवडणुकींची त्यांना तळमळ होती व कोठून तरी थोडें भांडवल त्यांना जमवायचें होतें.जो त्याग केला, जे हाल त्यांनीं सोसले त्याला यामुळे कमीपणा येतो ! तेथील लोकांना तारण्यापेक्षां काँग्रेसला मारण्यासाठी तो सत्याग्रह होता. आर्यसमाजहि त्या सत्याग्रहांत होता. परंतु त्यांनीं काँग्रेसला शिव्याशाप दिले नाहींत. काँग्रेस राजकीय संस्था आहे असें ते म्हणत. सोलापूरला सत्याग्रहीच्या ज्या सभा होत त्यांत कोणा हिंदुसभावाल्यानें काँग्रेसवर तोंडसुख घेतलें तर आर्यसमाजी सत्याग्रही रागावत ! आर्यसमाजाचे प्रमुख श्री. गुप्ताजी मध्यप्रातांतील असेंब्लीचे काँग्रेसप्रणीत अध्यक्ष होते. ते काँग्रेसचे सेवक होते. ते महात्माजींचा सल्ला घेत. त्यांची दृष्टि कशी व महाराष्ट्रीय हिंदुमहासभावाल्यांची कशी? देवाला माहीत.

महात्माजींचे कोठेंहि आंतडे गुंतले नाहीं. '' राजकोटचा प्रश्न मला सोडवतां आला तर साज्या काठेवाडचा सुटेल. त्याचा परिणाम इतर राजेरजवाडयांवर होईल '' असें त्यांना वाटत होतें. जमनालालजींना जयपूरला पाठविण्यांत हाच हेतु. सोपे सुटण्यासारखे प्रश्न आधी हातीं घेऊं या. ते सुटले तर एकंदर संस्थानिकांचा प्रश्नहि सोडविण्यास सोपें जाईल. ज्याप्रमाणें केसांची गुंतागुंत सोडवावयाची असली तर एकदम खसकन फणी खोवीत नाहीत. मुठीमध्यें थोडे थोडे केंस घेऊन त्यांची गुतांगुंत सोडवीत मग वरपासून खालपर्यंत बायका केंस विंचरतात. त्याप्रमाणें राजकोट, जयपूर वगैरे संस्थानें आधीं घेऊं या. बघूं या काय होते तें. मग मोठी संस्थानें घेऊं. तोपर्यंत विधायक कार्यक्रम तेथें होऊं दे. जनता जागी होईल. काय चाललें आहे तें तिला कळेल. पुढील सत्याग्रह अधिक जोराचा होईल. अशी माझ्या थोर काँग्रेसची निर्मल व उदार दृष्टि. परंतु गैरसमज पसरविणें हाच ज्यांचा धर्म, हिंदुस्थानांत वितुष्टें वाढविणें, वातावरण दूषित करणें, ५०/६० वर्षाच्या तपश्चर्येनें उभ्या राहिलेल्या थोर काँग्रेसला राक्षसी महत्वाकांक्षेनें खाली ओढणें हाच ज्यांचा आनंद, स्वत:चा सवता सुभा करून तेथें मिरविण्यांतच ज्यांचा पुरुषार्थ, ते गांधीजी व काँग्रेसवर हीन आरोप करतील यांत नवल तें काय?

असो. काँग्रेसची भूमिका वसंता तूं ध्यानांत घे. काँग्रेसला सर्व संस्थानांचा प्रश्न सोडवावयाचा आहे. जें फेडरेशन ब्रिटिश सरकार लादूं पहात होतें त्यांत संस्थानी प्रजेनें निवडलेले प्रतिनिधि आले तरच आम्ही तेथे बसूं, असें काँग्रेसनें स्वच्छ सांगितलें होतें. अर्थात फेडरेशन तर धिक्कारायचेंच होतें. परंतु जी कोणती घटना उद्यां काँग्रेसकडून स्वीकारली जाईल तींत संस्थानी प्रजेंनें निवडलेले प्रतिनिधि असले पाहिजेत. काँग्रेसनें असा ठराव केल्यामुळें संस्थानी प्रजेचा प्रश्न तिनें अलग ठेविला आहे असं नाहीं. आज आपली शक्ति ती तेथें पणाला लावूं इच्छित नाही. झाडांच्या फांद्या तोडण्यांतच वेळ कां दवडा? मुळावरच घाव घालूं या. ब्रिटिश सत्ताच येथून नाहीशी करुं या. मग संस्थानिक कोठें जातात?

वसंता, गांधीजी इतकीं वषें सेवा करीत आहेत. त्यांना आतां या भागाबद्दल आसक्ति नाही रे उरली. अहमदाबाद सोडून ते पूज्य विनोबाजींजवळ येऊन बसले. वर्ध्याला आले. त्यांना का आसक्ति आहे? मागें एकदां आंध्र प्रांतांत महात्माजींना एका आंध्र चित्रकारानें '' हाती काढलेली त्यांची तसबीर दिली. महात्माजी त्याला म्हणाले, गडया, कोठें लावूं ही तसबीर? आतां हा देहहि गळावा असें मला वाटत आहे. '' वसंता, तुकारामांनीं म्हटलें आहे :

''उद्योगांची धांव बैसली आसनीं ! पडलें नारायणी मोटळें हें ! '' तसें आतां महात्माजींना वाटतें. तरीहि ते सेवा करीतच आहेत. कोठली रे त्यांना आसक्ति? त्यांच्या इतका संयमी व वासना-मोह जिंकलेला दुसरा कोण या हिंदुस्थानांत दाखवितां येईल? त्यांचे मार्ग सारे पटणार नाहींत. त्यांचीं मतें पटणार नाहींत. परंतु त्यांच्या हेतूंची शुध्दता संशयूं नये. क्षुद्र आरोप त्यांच्यावर करूं नयें. '' प्रतिबध्नातिहि श्रेय : पूज्यपूजा व्यतिक्रम: - '' पूज्यांची पूजा न करूं तर कल्याण होणार नाही. '' असें कविकुलगुरु कालिदास सांगत आहे. महाराष्ट्रांतील तरुण तें ऐकतील कां?

तुझा
श्याम

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel