भारतीय तरुणांनी गरीबांची बाजू घेऊन उभें रहावें. जगांत दोन वाद आहेत. त्यांतील गरीबांकडे जाणा-या वादाला मिठी मारावी. काँग्रेस जपून कां होईना, परंतु गरिबांकडे जात आहे. अद्याप ती मर्यादेनें जात आहे. श्रीमंत लोकांना सद्बुध्दि येईल व ते श्रमणा-यांस सुखी करतील, अशी आशा ती बाळगते आहे. महात्माजी ' ट्रस्टी व्हा ' असे सांगत आहेत. श्रमणारे अधीर होत आहेत. काँग्रेस त्यांना जरा धीर राखा असें सांगत आहे. परंतु भांडवलवाल्यांनीं शेवटी काँग्रेसचें न ऐकले तर? मग इतर देशांत झालें ते या देशांत होईल. एक तर येथे फॅसिझम् स्थापन होईल किंवा समाजवाद येईल. रक्तांतून राष्ट्राला जावें लागेल.
काँग्रेस शेवटीं गरिबांच्या सागराला जाऊन मिळणार आहे. तो खालीं जो अनंत असा श्रमणारांचा सागर आहे, तेथें काँग्रेस जाणार आहे. कधीं तिच्या हातून चुका होतील, कधीं ज्यांचे संसार सुंदर व सुखी करण्यासाठी तिचा अवतार त्यांनाहि तिला दुखवावें लागेल. परंतु म्हणून तिला नांवें ठेवूं नका. वेडीवांकडी, नागमोडी ती गेली तरी गरिबांकडे ती जात आहे. तिच्या हृदयावर चरखा कोरलेला आहे. तिच्या हृदयांत गरिबांची-दरिद्री नारायणाची मूर्ति आहे. हें विसरुं नका.
वसंता, किती रे तुला लिहुं? हा हृदय-सागर तुझ्यांपुढें कसा रिता करूं? परंतु थेंबामध्येंहि सर्व सागराची चव असते. असो.
तुझा
श्याम.