वसंता, स्पेनमध्ये जसें झालें तसेंच या देशांत एखादे वेळेस होईल. बहुजनसमाजाच्या, श्रमणा-या जनतेच्या हिताचे जसजसे अधिकाअधक कायदे काँग्रेस करु पाहील तसतसे वरिष्ठ वर्ग, मग ते हिंदु असोत वा मुस्लिम असोत वा पारशी असोत, काँग्रेसला विरोध करावयास उभे राहतील. आणि मग हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुस्लिम लीगचे स्वयंसेवक एक हेऊन हिंदूस्थानांतील फ्रॅकोचें लष्कर उभें राहील ! येथील गरीब जनतेच्या चळवळीवर ते हल्ला करतील. साम्राज्यवादी राष्ट्रें त्यांना मदत करतील. असें हें भविष्यकालीन दृश्य माझ्या डोळयांना दिसत आहे.
पांढरपेशा तरुणांनी विचार करावा. संस्कृतीच्या व धर्माच्या नांवांनी फसूं नयें. धर्मा सर्व जनतेला सुखी करणे हा आहे. केमालपाशानें मशिदींची क्रीडांगणें बनविली. प्रभूच्या घरीं मुलें खेळूं लागली. रशियांत चर्चची हॉस्पिटलें झाली. चर्चची हॉस्पिटलें झाल्यामुळें त्या चर्चमध्यें देव नव्हता तो आला. देव म्हणजे गप्पा नव्हते. '' सर्वेsपि सुखिन: सन्तु ! सर्वे सन्तु निरामय: '' हें ध्येय गांठण्यासाठीं क्रान्ति करणें म्हणजेच धर्म.
तरुणांसमोर हा प्रश्र आहे. त्यांना या जातीय संघांतून शिरून गरिबांची पिळवणूक कायम ठेवावयाची आहे का? जर नसेल ठेवायची तर त्यांनी हे संघ सोडले पाहिजेत. संघटना कोणत्या तरी ध्येयासाठी असतात. ध्येयहीन संघटना फोल आहेत. ज्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूमहासभेचा उदो उदो करतो, आणि समाजवादी लोकांना शिव्या देतों, त्या अर्थी या संघाचें ध्येय धर्माच्या नांवानें पिळवणूक कायम ठेवणें हेंच ठरतें ! आम्ही हिंदू एक होऊन मग समाजवाद आणूं असें म्हणणें हा वदतो व्याघात् आहे. हिंदूतील श्रीमंत लोक व हिंदू संस्थानिक मग मुसलमान नबाबांशी संगनमत करतील, तुम्हांला गाडूं पहातील. आर्थिक भूमिका एकरां स्वीकारली म्हणजे मग हा हिंदु व हा मुसलमान हा भेद रहात नाहीं. हिंदु भांडवलवाले व मुस्लिम भांडवलवाले, हिंदु सत्तावाले व मुस्लिम सत्तावाले परस्पर भांडले तरी ते शेवटी गरिबांना चिरडण्यासाठीं एक होतील !
हिंदी तरुणांसमोर हा प्रश्र आहे. डॉक्टर, वकील, पेन्शनर, भटजी, प्रोफेसर, शिक्षक, इंजिनिअर, जमीनदार, इनामदार वगैरे प्रतिष्ठित वर्गांच्या मुलांसमोर हा प्रश्न आहे. उद्यां तुमची संघटना घेऊन तुम्ही खेडयांत गेलेत व शेतक-यांनीं जर विचारलें, '' हे सावकार व जमिनदार छळीत आहेत. यांचें काय? '' तर त्यांना काय उत्तर देणार? हिंदु, हिंदु तेंवढे आधी एक होऊ या, या उत्तरानें त्यांचें समाधान होणार नाहीं. कांहीं वेळ ही धार्मिक पुंगी कदाचित् अडाणी लोकांनी गुंगवील, परंतु पुढें भ्रम उडेल. त्या वेळेस हे संघवाले काय करणार?