काँग्रेसनें मुसलमानांस जें जें संरक्षण पाहिजे असेल तें तें देऊं केलें. धर्मांचे, भाषेचें, संस्कृतीचें संरक्षण सर्वांना मिळेल असें कराची काँग्रेसच्या ठरावांत स्पष्ट झाले. स्वातंत्र्य युध्दांत मुसलमानांनी सहकार करावा म्हणून काँग्रेसनें शक्य-तें द्यायची तयारी दर्शवली. १९३१ मध्यें लंडनच्या गोलमेज परिषदेच्या वेळेस गांधींजींनीं त्यांना कोरा चेक दिला ! त्यामुळें हिंदुमहासभावाले रागावतात. परंतु गांधीजी अखिल भारताची तेथें अब्रू सांभाळित होते. ब्रिटिश मुत्सद्यांनी जगासमोर हिंदुस्थानचा फजितवाडा चालवला होता. तुमची एकमुखी मागणी आणा नाहींतर आमचा निर्णय मान्य करा, असें मिश्कीलपणें कुटिल ब्रिटिश मुत्सदी सांगत होते. काँग्रेसनें मुसलमानांस इतक्या जागां देऊं, असें म्हणतांच ब्रिटिश मुत्सदी त्यांना तिकडे बोलावून आम्ही अधिक देऊं असें म्हणत. असा चावटपणा सुरू झाला ! जगाच्यासमोर गांधीजी का घासाघीस करित बसतील? राष्ट्राचे प्रश्र म्हणजे का केवळ आंकडे? तेथें शेवटी मोठी दृष्टि घ्यावी लागते. महात्माजींना ब्रिटिशांनी चालविलेली ही कुतर-ओढ सहन होईना. महात्माजी मुसलमानांस म्हणाले, '' तुम्ही म्हणाल तितक्या जागा; कोरा चेक. आपण एकमुखी मागणीं करूं. परंतु ब्रिटिशांनी मागणी मान्य न केली तर काँग्रेसच्या खांद्याशीं खांदा लावून तुम्ही लढलें पाहिजे, '' कोरा चेक देत असतांना ' स्वातंत्र्यार्थ लढायला या ' ही गांधीची अट होती.
गांधीजीनीं जगाच्या बाजारांत हिंदुस्थानची अब्रू सांभाळली. त्यांच्या समोर या ४० कोटि लोकांच्या इभ्रतीचा प्रश्र होता. म्हणून त्यांनी ही मोठी दृष्टि घेतली. तींत चूक काय आहे? परवां राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मागणीच्या वेळेस श्री राजगोपालाचार्य म्हणाले कीं '' मुख्य प्रधान जिना झाले तरी आमची तयारी आहे. '' क्रिप्सजवळ वाटाघाटी करतांना काँग्रेस म्हणाली, '' मध्यवर्ती मंत्रिमंडळ जिनांना बनवूं दे. आमची ना नाहीं. परंतु तुम्ही जा. ''
काँग्रेस कोरा चेक देते, जिनांना मुख्य प्रधानकी देऊं करतो, मंत्रिमंडळ बनवा म्हणते, याची हिंदुमहासभावाल्यांस चीड येते परंतु राष्ट्राच्या स्वातंत्र्याची ज्याला कदर आहे, त्याला क्षुद्र दृष्टि घेऊन चालत नाहीं. म्हणून लोकमान्य टिळकहि म्हणत, '' येथल्या मुसलमानांच्या हातीं सर्व सत्ता आली तरी चालेल, परंतु सहा हजार मैलांवरचे हे परके जाऊं देत. ''
अशा म्हणण्यांत काय बरें अर्थ असतो? काँग्रेसला किंवा महात्माजींना मुसलमानांची भीति वाटत नाही. उद्यां आपलें कसें होईल ही भीति काँग्रेसमधील हिंदूंना नाहीं. ३० कोटी हिंदूंना भयभीत होण्याचें काय कारण? हा न्यूनगंड हिंदुमहासभेला आहे, काँग्रेसला नाहीं. हिंदुमहासभेला मुसलमानांची भीति वाटते. म्हणून तिची धांवपळ. काँग्रेस धीरोदात्त वागत आहे. स्वराज्य आलें म्हणजे आर्थिक प्रश्न सुटूं लागून भांडणे आपोआप कमी होतील, ही गोष्ट काँग्रेस जाणते.