लोकनायक अणे त्यांच्या षष्ठयब्दपूर्ति समारंभाच्या वेळेस म्हणाले, '' काँग्रेसनें समाजवाद सोडून द्यावा. '' अद्याप समाजवाद काँग्रेसमध्यें आला आहे तरी कोठें? परंतु इतक्यांतच यांना भीति वाटत आहे. अण्यांसारख्यांसहि जर ही भीति वाटते तर मग इतरांची कथा काय? केसरी पत्रानें एकदां लिहिलें होतें, '' सावकार, जमीनदार, इनामदार, कारखानदार यांच्या दु:खास वाचा फोडण्यासाठी हें पत्र आहे ! '' मला नक्की शब्द आठवत नाहींत. परंतु अशा अर्थाचें लिहिलें होतें. यावरुन केसरी पत्र कोणाची बाजू मांडणारें आहे हें तुझ्या ध्यानांत येईल. आणि हिंदुमहासभेचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदो उदो करणारें हें पत्र गरिबांच्या बाबतीत कोणतें धोरण स्वीकारील तेंहि दिसत आहे.

धर्माच्या नांवानें ओरडून ओरडून या संघटकांना वरिष्ठांचे वर्चस्व राखायचें आहे व गरीबांची पिळवणूक कायम करायची आहे. कल्याणच्या पुढचें नेरळ स्टेशन तुला माहीत असेल. त्या बाजूस कोणी एक मुसलमान आहे. तो पैसेवाला आहे. तरीचा मत्त्का नेहमी आपला त्यालाच मिळतो ! जंगलातील कूप तोच विकत घेतो !! हा मुसलमान गोरगरीबांना फार छळतो. आसपासच्या चाळीस पन्नास गांवच्या लोकांस त्याचा त्रास. तो वेळेवर तरच सोडणार नाही. शेतकरी गरीब असतात. त्यांच्या जवळून अधिकच पैसे मागतो. नाहींतर तरच सोडीत नाही म्हणतो. मग तो शेतक-यास म्हणतो, '' पैसे तुमच्या जवळ नाहींत. परंतु जंगलांत मोफत चार दिवस लांकडें तोडायला याल?'' अडलेले शेतकरी कबूल करतात. मग ती तर सुटते. शेतकरी वेठला धरल्याप्रमाणें जंगलांत जाऊन त्याचीं झाडें तोडतात. लांकडें तोडतात. अशा गोष्टी तिकडें कानांवर येतात.

या छळवाद्या मुसलमानांस तरीचा मक्ता मिळूं नये म्हणून काँग्रेसनें दुसरा एक मनुष्य उभा करायचें ठरविलें. केवळ मुसलमानविरोध हें काँग्रेसचें ब्रीद नव्हें. परंतु तो मुसलमान पिळवणूक करतो म्हणून काँग्रेसनें दुस-यांस उभें केलें. परंतु वसंता, काय तुला सांगूं? हिंदुमहासभेच्या वरिष्ठानीं, खोतांनी व श्रीमंतानीं त्या मुसलमानासच मक्ता मिळावा म्हणून खटपट केली. श्रीमंत श्रीमंतास मिळाले. ते हिंदु असोत वा मुसलमान असोत. गरिबांची दैना तशीच चालूं राहिलीं.

पंडित जवाहरलाल पुण्याच्या प्रंचंउ सभेंत म्हणाले, '' हिंदु संस्थानिकाहि मुस्लिम लीगला पैशाची मदत करीत असतात, '' याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच कीं मुस्लीम लीग काय, हिंदुमहासभा काय, या श्रीमंतांच्या, इनामदारांच्या बाजू घेणा-या संस्था आहेत. त्या धर्माच्या नांवानें अलग दिसल्या तरी आर्थिक बाबतींत आजची गरीबांची पिळवणूक कायम ठेंवणें हेंच त्यांचें ध्येय आहे.

मागें एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते म्हणे कीं '' जपानशीं हिंदुस्थाननें वांगडें धोरण धरुं नयें. जपान बलवान राष्ट्र आहे. जपानला दुखवूं नये. '' चीनचा गळा दाबणा-या साम्राज्यवादी जपानशीं हें हिंदु-महासभावाले प्रेमाचा संबंध राखूं इच्छितात. आज जगांत साम्राज्यवाद व समाजवाद हे दोनच प्रमुख वाद आहेत.  हिंदुमहासभा साम्राज्यवादी आहे. त्यांना साम्राज्याचींच स्वप्नें पडत असतात. परंतु साम्राज्य शब्द काँग्रेसला सहन होत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel