हिटलर व मुसोलिनी यांना आज कामगारांच्या चळवळी दडपून ठेवाव्या लागल्या आहेत. इंग्लंडमध्यें तशी परिस्थिती नाहीं. परंतु कां नाही? इंग्लंडचें जगभर साम्राज्य आहे. त्यांना हिंदुस्थानासारखी चाळीस कोटी लोकांची परतंत्र वसाहत आहे. इंग्लंडचा माल साम्राज्यांत व दुनियेंत सर्वत्र जातो. त्यामुळें त्यांना स्वदेशांतील कामगारांना अधिक सवलती देता येतात. इंग्लंडमध्यें लोकशाहीचा डोलारा दिसावा यासाठीं हिंदुस्थाननें गुलाम राहिले पाहिजे !
परंतु समजा हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर? चाळीस कोटी लोकांची पेठ त्यांच्या हातून गेली तर? इंग्लंडमधील भांडवलवाल्यांना चिंता वाटल. कामगारांना दिलेल्या सवलती त्यांना काढून घ्याव्या लागतील. म्हणजेच इंग्लंडलाहि फॅसिस्ट बनावें लागेल. आज ना उद्यां इंग्लंडमध्यें हीच स्थिति येणार आहे. इंग्लंडमध्यें मजुरांचे पुढारी म्हणून जे मिरवतात. ते निवडणुकींत स्वत:ला बहुमत मिळूं नये अशी म्हणे खटपट करतात ! मजूर मंत्रिमंडळ इंग्लंडमध्यें स्थापण्याची आपत्ती येऊं नये म्हणून हे मजूर पुढारी जपतात ! कारण या मजूर पुढा-यांना माहीत आहे कीं दिवसेंदिवस स्वत:च्या देशांतील माल दुनियेंत खपविणें कठीण जाईल. मग आपणांसच मजुरांच्या सवलती कमी करण्याचे कायदे करावे लागतील. मग मजूर काय म्हणतील? म्हणून हे मजूर पुढारी स्वत:ला बहुमत मिळूं नये अशी कारवाई करतात ! आणि मग कारखानदारांजवळ कारस्थानें करतात. कारखानदार जाहीर करतात २५ टक्के पगार-काट. कामगार संपावर जातात. हे पुढारी त्यांच्यापुढें जोर जोराची भाषणें करतात. कारखानदार या पुढा-यांना बोलावतात. शेवटीं तडजोड होते. १० टक्केच पगारकाट करण्याचें ठरतें. हे कामगार पुढारी मग कामगारांना सांगतात, '' आपला विजय आहे. मालक २५ टक्के पगार-काट करणार होता. आपण त्याला १० टक्कयांवर आणलें ! '' मालक व हे मजूर पुढारीं यांचें आधींच हें ठरलेलें असतें. त्यांनी २५ टक्के म्हणावयाचें, यांनीं संप करावयाचा व शेवटीं १० टक्क्यावंर तडजोड करावयाची. मालकांना १० टक्केच कमी करण्याची जरूर असते. आणि अशा रीतीनें क्रान्तीला भिणारे कामगार पुढारी कामगारांना फसवीत असतात.
यांत्रिक भांडवलशाहीचा कळस झाला कीं, दोन फांटे फुटतात. फॅसिझम तरी स्वीकारावा लागतो किंवा समाजवाद आणावा लागतों. प्रचंड उद्योगधंदे तयारच असतात. लहानलहान कारखानदारांना पोटांत घेत घेत एकेका धंद्याची प्रचंड सिंडिकेटस तयार झालेली असतात. तीं राष्ट्राच्या मालकीची कारणें एवढेंच काय तें उरतें. कामगार क्रान्ति करुन तें काम पुरें करतात.
गांधीवाद सर्व उत्पादन यंत्रांनी करावें याविरुध्द आहे. गांधीवादी म्हणतात, '' यंत्रांनी बेकारी वाढते. सर्व बेकारांना काम देतां यावे व निर्माण झालेला माल खपावा म्हणून दुस-या देशास गुलाम ठेवावें लागतें. निरनिराळया यांत्रिक उत्पादन करणा-या देशांचीं स्पर्धा सुरू होते. युध्दें होतात. जीविताची व वित्ताची अपरंपार हानि होते. कामगारहि असंतुष्ट होतात. विषमात वाढतें. भांडवलवाले मोटारी उडवितात तर कामगार कसा तरी जगतो. या सर्व गोष्टी टाळायाच्या असतील तर यांत्रिक उत्पादन कमी करावें,'' गांधीवादी एकजात सर्वच यंत्रांना विरोध करतात असें कांही नाहीं. आपणांतील कांही नवमतवादी म्हणत असतात कीं, ''गांधीजी जगाला पुन्हां त्रेतायुगांत नेऊं पहात आहेत. आजच्या काळांत चरख्याचे गुं गुं सुरू करूं पाहात आहेत. गांधीजी प्रतिगामी आहेत !'' प्रतिगामी किंवा पुरोगामी यांची कसोटी यंत्र किंवा चरखाही नसून समाजांत जो कोणी स्वास्थ, समाधान, संतोष व समानता कमी रक्तपातानें आणील तो खरा पुरोगामी असें मानलें पाहिजे गांधीजी कांही शनिमाहात्म वाचा, कुंडली मांडा, ज्योतिष पहा, तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळें तूं असा झालास ... वगैरे गोष्टी सांगत नसतात. मला एक आश्चर्य वाटत असतें कीं आमचे पुरोगामी लोकहि आपल्या वर्तमानपत्रांतून व साप्ताहिकांतून भविष्यें देत असतात. बुध्दिवादाचा आग्रह धरणारे हे लोक लोकांच्या रूढीची पूजा करीत असतात !! गांधीजींनीं असले प्रकार कधीं केले नाहीत. गांधीजी बुध्दिवादी आहेत. शास्त्रीय बुध्दिवादी आहेत. मलेरियावर गांधीजी कोयनेल घ्यायला सांगतात म्हणून आमचे आयुर्वेदी गांधीजींवर रागवत असतात ! गांधीजी त्यांना म्हणतात, '' तुमची गुळवेल किंवा तुमचीं औषधें शास्त्रीयदृष्टया जगासमोर मांडा. मी आयुर्वेद मान्य करीन. '' गांधीजी विज्ञान मानतात. यंत्रानें सडलले पांढरे तांदुळ खाणारा उंदीर वजनांत घटला, परंतु न सडलेला तांदूळ खाणारा उंदीर वजनांत वाढला. म्हणून असडीक तांदूळ खा, निदान हातसडीचे खा, परंतु गिरणीचे पांढरे खाऊं नका, असें शास्त्रीय दृष्टीनेंच ते सांगतात. मुंबईच्या केमिकल अनलायझरकडे चिंच, घोळीची भाजी, कडुलिबांचा पाला वगैरे वस्तु गांधीजींनी पाठवून त्यांत कोणते गुणधर्म आहेत त्याचा चौकीशी केली. गुळ व साखर यांत अधिक गुण कशांत आहेत हे डॉक्टरांच्याकडून चर्चून घेतलें.