मराठीत शेख महंमद वगैरे साधु झाले. त्यांनीं सुंदर काव्यरचना केली. बंगालीमध्यें मुसलमान कवींनीं गंगेवर स्तोत्रे लिहिली ! बंगाली मुसलमान बंगाली भाषाच बोलतात. मुसलमान मायबहिणी हजारों खेडयापाडयांतून जात्यावर दळतांना ज्या ओव्या म्हणतात त्या ओव्यांतून हिंदुमुस्लिम ऐक्य दिसून येतें. गंगाजमनांचीं सुंदर वर्णनें त्या ओव्यांतून आहेंत.

मुसलमान राजांनीं हिंदू देवस्थानांस देणग्या दिल्या. हिंदू राजांनीं मशिदींस व पीरांस देणग्या दिल्या. पेशव्यांचे गुरु कायगांवकर दीक्षित यांची दिल्लीच्या बादशहांनीहि पूजा केली ! कायगांवकर दीक्षितांना निजाम स्टेटमधून जहागीर आहे. चिंचवडच्या देवस्थानास निजाम स्टेटमधून देणगी आहे असें कळतें. अशा प्रकारे रहावयास आपण शिकत होतों. खरा धर्म आचरांत होतों. धर्म तोडणारा नसून जोडणारा आहे, हें शिकत होतों. हिंदूच्या धर्मग्रंथांतून शेवटी ॐ शांति: शंति: शंति: असाच घोष असतो आणि मुसलमानाहि शांतीचे पुरस्कर्ते आहेत. इस्लाम या शब्दाचा अर्थच मुळी शांति. दोन्हीं धर्म शांतीचा अनुभव येथें घेऊं लागले.

हैदरअल्ली मुसलमान होता. परंतु गाय मारणा-याचा हात तोडण्याची शिक्षा त्यांने दिली. बाबर बादशहानेंहि लिहिलें होतें कीं, ''आपण गाय मारतां कामा नये.'' अकबराचे मानसिंग वैगरे हिंदु सुभेदार होते. औरंगजेबानें शिवाजीवर कोणास पाठविले? जयसिंगला. इतकेंच काय, तर  गझनीच्या महंमदाचेहि हिंदु सेनापति होते. ज्या संयुक्त प्रांतांत मुसलमानांनी आठशें वर्षे राज्य केलें तेथें मुस्लिम लोकसंख्या आज शेंकडा १४ फक्त आहे. सारीच बाटवाबाटवी असती तर असें  झाले असतें का? हिंदु-मुस्लिम नीट वागूं लागले होते. नवरात्राचा सण हैदरच्या दरबारांत पाळला जाई. दस-याला दरबार भरे. मुसलमान राजा नवरात्रोस्तव करींत. तर हिंदु राजे डोले उभारीत. बडोदे शहरांत सरकारी डोले असतात ! हिंदु राजे मुसलमानी प्रजेचें मन सांभाळीत. मुसलमानी राजे हिंदु प्रजेला दुखवीत नसत. हैदरअल्लीनें हिंदूंचे मुख्य गुरु जे शंकराचार्य त्यांना नजराणे पाठविले. दहा हजार सोन्याची नाणीं पाठविली. टिपू सुलतान हिंदु दैवतांना नवस करी. त्यानें उत्कृष्ट संस्कृत हस्तलिखितांची लायब्ररी ठेवली होती.

आपण व्यक्तीवरून एकदम धर्म वाईट ठरवूं नयें. औरंगजेब वाईट होता. दुष्ट होता. तो स्वत:च्या भावांच्याहि बाबतींत क्रूर होता. परंतु त्यावरुन सारे मुसलमान असेच, असें म्हणू नये. एखाद्या चर्चिल वा अ‍ॅमेरी साम्राज्यवादी निघाला म्हणून का सारे ख्रिश्चन वाईट व दुष्ट असें आपण म्हणतो? मुस्लिम धर्म व संस्कृति एकाद्या औरंगजेबावरुन परीक्षूं नये.

निरनिराळया सुंदर रुढि आपण पाडीत होतो. खानदेशांतील अमळनेरच्या श्रीसंत सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी देण्याचा मान मुसलमानांचा आहे. मुसलमानांना नारळ प्रसाद म्हणून देण्यांत येतो. जळगांवजवळ कमळदे म्हणून गांव आहें. तेथें मशीद आहे. त्या मशिदीजवळ वारक-यांची दिंडी थांबली पाहिजे व त्यांनी भजन केले पाहिजे, असा मशिदीचा हक्क होता ! मुसलमान म्हणत, ''आमच्या मशिदीजवळ थांबा व भजन करा. कारण शेवटीं परमेश्वर एकच आहे. त्याला राम म्हणा कीं रहिम म्हणा. पुणें जिल्हयांत बारामती गांवीं हिंदु-मुसलमानांत किती ऐक्य आहे तें जाऊन पहा. पीरासमोर हिंदु शाहीर हिंदु पुराणांतील कवनें व पोवाडे म्हणतात आणि मुसलमान तीं कवनें आनंदानें ऐकतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel