स्वराज्य येणें म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे राष्ट्राच्या सर्व शक्तींना वाव मिळणें. राष्ट्राच्या विकासास अवसर मिळणें. अडथळे दूर होणें. आज राष्ट्राच्या कर्तृत्वास वावच नाहीं. नोकरीशिवाय धंदा नाहीं. उद्यां स्वराज्य मिळालें म्हणजे व्यापार वाढेल, उद्योंगधंदे वाढतील. लोकांची  कोंडलेली चैतन्यशक्ति शतक्षेत्रात खेळूं शकेल. भांडणे आपोआप बंद होतील. उद्योगी माणसांना भांडायला वेळ आहे कोठें? मुसलमानांतील बोहरी समाज हा व्यापारी आहे. त्यामुळें ते कडवे नाहीत. ते गुजराती भाषा बोलतात, गुजराती वर्तमानपत्रे घेतात. कारण त्यांना उद्योग आहे. रोज त्यांचा व्यापा-यांशीं संबंध, म्हणून त्यांचीं भांडखोर वृत्ति नाहीं. उद्यां स्वतंत्र हिंदुस्थानांत भांडणें उरणारच नाहींत. कोठून का होईना एकदां या देशांतील लोकांच्या हातांत सत्ता येऊं दे. एकदा देश स्वतंत्र होऊं दे. जोंपर्यंत देश परतंत्र आहे तोपर्यंत भांडणें राहणार, कारण कर्म-शक्तीला वाव नसणार. इंग्रज म्हणतात, '' तुमच्यांत भांडणें आहेत म्हणून स्वराज्य देत नाही. '' काँग्रेसचें नेहमी एकच म्हणणे आहे, '' तुम्ही आहांत म्हणून भांडणें आहेत. गुलामगिरीमुळें भांडणे आहेत. तुमचा संबंध सुटताच सलोखा निर्माण होईल. ''

वसंता, तूं पानपट्टीवाल्याचें दुकान पाहिलें आहेस का? तो पट्टीवाला हातांत कातरी घेऊन उजाडत दुकानांत बसतो. तो तें सडलेलें पान कापून टाकतों. तसें तो न करील तर सडलेलें पान चांगल्या पानासहि सडवतें. त्याप्रमाणें आम्ही आमच्या देशांत चांगले संबंध निर्मित होतों, परंतु इंग्रज आले. ते फोडा व झोडा असें सडकें धोरण घेऊन आले. त्यांनीं हिंदुस्थानांस कीड लावली आहे. त्यांचा संबंध सुटल्याशिवाय हिंदुस्थानचें ग्रहण सुटणार नाही, भांडणे मिटणार नाहींत, दारिद्रय व दास्य दुरावणार नाहींत. काँग्रेस हें पुरेपूर ओळखते.

वसंता, लोकमान्य टिळक, देशबंधु दास-सर्वच पुढा-यांना काँग्रेसच्या या धोरणासारखेंच धोरण ठेवावें लागलें. देशबंधुदासांनींहि १९२४-२५ मध्यें बंगालमध्यें हिंदु-मुस्लीम पॅक्ट केला. त्यांना हिंदुमहासभावाल्यांनीं विरोधी केला. परंतु देशबंधु डगमगले नाहींत. त्यांनीं असा पॅक्ट केला तेव्हांच त्यांना प्रांतिक कायदेमंडळांत सरकारचा सारखा पराभव करता आला ! दिवाणांचा पगार तीन रुपये, असें ठराव त्यांनीं मंजूर केलें !! ब्रिटिशांचा पराभव करण्यासाठीं, ब्रिटिशांची सत्ता येथून घालवण्यासाठी वाटेल ती किंमत द्यावयास भारतील पुढारी तयार असत, त्यांनीं तयार असले पाहिजें. लोकमान्यांची, देशबंधु दासांची परंपरा आज काँग्रेस पुढें चालवीत आहे. तिच्या डोळयांसमोर देशाचे स्वातंत्र्य हीच एक गोष्ट रात्रंदिवस आहे. अर्जुनाला  द्रोणाचार्यांनीं विचारलें, '' अर्जुना, तुला काय दिसतें आहे? '' तेव्हा तो नरवीर पार्थ म्हणाला, '' पक्ष्याचे डोके व बाणाचे टोंक याशिवाय मला कांही एक दिसत नाही. '' त्याप्रमाणे काँग्रेसला स्वातंत्र्य मिळणें याशिवाय दुसरी वस्तु दिसत नाहीं. मुसलमानांस किती जागा, हिंदुंस किती, हें भांडण इंग्रजासमोर कशाला? मुसलमानांस दोन जागा जास्त म्हणून तीन कोटी हिंदूनीं भिण्याचे कारण काय? उद्या जे कायदे होतील ते कोणा विशिष्ट जातीसाठी नाही होणार, दरिद्री जनता, श्रमणारी जनता, ती कोणत्याहि जातीची असो त्यांची स्थिती सुधारणें हें उद्यां स्वराज्यातलें मुख्य काम. सर्वसामान्य जनतेचा संसार सुधारणें हें मुख्य काम.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel