कारण मुसलमानांनी येथें राज्य केली. ते येथे सत्ताधारी होते. त्यांना कोण मानणार अस्पृश्य? सरकार व सरकारच्या जातीचे लोक सदैव पवित्र असतात !! आज साहेबलोक नाहीं का आमचीं मंदिरे पाडूं शकत? व्हाइसरॉयसाहेब दक्षिणेकडचीं प्रचंड मंदिरें आंत जाऊन पहातात. मंदिराचे चालक साहेबांना तीं मंदिरे मोठया नम्रतेने दाखवितात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच कीं आम्ही सत्ता ओळखतों. सत्तेला आम्ही देव मानतों. आम्ही सत्य-देव नसून सत्तादेव आहोंत. मामलेदार, कलेक्टर, गव्हर्नर, व्हाइसरॉय हे आमचे देव आहेत !
न्यायमूर्ति रानडे एकदां रेल्वेंतून जात होते. सेकंड क्लासमध्यें त्यांचा बिस्तरा होता. ते प्लॅटफॉर्मवर हिंडत होते. इतक्यात एक साहेब त्या सेकंड क्लासच्या डब्यांत शिरला. त्याला इंडियन मनुष्याचें तें सामान सहन झालें नाहीं. त्यानें तें प्लॅटफॉर्मवर फेंकलें. न्यायमूर्ति रानडयांनी तें निमूटपणें उचलून दुसरीकडे नेलें. त्यांना एक मित्र म्हणाला, ' तुम्ही या साहेबावर फिर्याद कां करीत नाही? ' न्यायमूर्ति म्हणाले, ' आपण आपल्या कोटयवधि बंधूंना याच तऱ्हेनें वागवीत आहोंत. कोणत्या तोंडाने मी साहेबावर फिर्याद करुं? '
वसंता, आपण आज स्वराज्य मागत आहोंत. जोंपर्यंत आपण आपल्याच भावाबहिणींस साधे माणुसकीचे हक्क देत नाहीं, तोंपर्यत स्वराज्याचा अर्थ तरी आपणंस कळला असें मानतां येईल का? विवेकानंदांहून हिंदुधर्म अधिक कोणाला समजत होता? परंतु हरिजनांची दीन दशा पाहून ते रडत. महाराष्ट्रांतील ज्ञानमूर्ति ब्रम्हाचारी नारायणशास्त्री मराठे-वाईच्या प्राज्ञपाठशाळेचें संस्थापक-त्यांच्याहून हिंदुधर्माचा अधिक आत्मा कोणाला कळला? परंतु हिमालयांत जाणा-या एका तरुणास ते म्हणाले, ' देव हिमालयांत नाहीं. हरिजनांची सेवा कर. तुला देव मिळेल. '
एक वेळ तुमच्या घरांत हरिजनांना नका येऊ देऊं, परंतु मंदिरात तरी त्यांना जाऊं दे. देवाजवळ तरी त्यांना जाऊं दे. देव सर्व जगाची माता ना? आपण सारीं त्या देवाचीं लेकरें ना? असें तोंडाने पुटपुटतां ना? देवळांतील ती मूर्ति जर खरोखरी भगवंताची असेल तर सर्व मानव प्राणी तेथे नको का जायला? आमच्या मंदिरांत कुत्रीं बसतात. कावळे बसतात. चिमण्या नाचतात. परंतु हरिजन मात्र तेथें शिरुं शकत नहींत. देवळांत जर शाळा असली तर तेथें हरिजन मुलें जाऊं शकत नाहींत. ज्या देवाजवळ त्यांचीं सारीं लेंकरें जाऊं शकत नाहींत ती का देवाची मूर्ति? नाशिक शहरांत बालाजी व भद्रकालीच्या देवळांतून सभा होतात, प्रवचनें होतात. परंतु हरिजन त्या देवळांत येऊं शकतात का? ज्या रामाने शबरीचीं बोरें खाल्ली, जटायू पक्षाचें श्राध्द केलें, वानरें प्रेमानें हृदयाशीं धरलीं, त्या रामाच्या मंदिरात हरिजन जाऊं शकतात का? धर्माच्या व संस्कृतीच्या बेटे गप्पा मारतात, परंतु धर्मांचा व संस्कृतीचा स्वत: वध तर करीत आहेत.
ईश्वरासमोरहि आमचा अहंकार गळून जात नसेल तर तो आतां गळायचा तरी कोठे? प्रभूच्या मूर्तीसमोरहि जर मी नम्र होत नसेन तर मी नम्रता शिकणार तरी कोठें? मुसलमान बादशहा औरंगजेब ज्याला आपण नांवें ठेवतों - तो एकदां जुम्मा मशिदींत जरा उशिरा गेला. तो आला असें पाहतांच मशिदींतील लोक त्याला जागा करुन देऊं लागले. त्या वेळेस औरंगजेब म्हणाला, ' आपण मशिदीत आहोंत, येथें मी बादशहा नाहीं. आपण सारे समान आहोंत. देवासमोर तरी भेदभाव नको. ' अद्वैत तत्त्वज्ञान ज्या हिंदुधर्मानें दिलें, त्या हिंदुंच्या देवळांत आहे का हा प्रकार? समानतेची वचने आम्ही ओंठावर खेळविली, परंतु कृति मात्र कृत्रिम भेदभावाची ठेविली.