या संस्थेचे अनुकरण करणा-या अनेक संस्था महाराष्ट्रभर निघाल्या. परंतु शिक्षणांत काय बदल झाला? शिक्षण तेंच. शिक्षक शिकवतांना देशभक्तीच्या ज्या काही थोडयाफार गोष्टी सांगतील तेवढाच काय तो फरक. परंतु ज्याला रहावत नाही असा शिक्षक कोणत्याही शाळेंत असो, तेंथे तो देशभक्तिच्या गोष्टी सांगेलच. रोज उठून काही इन्स्पेक्टर बघायला येत नसतो. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाचे सारे विषय मातृभाषेतून शिकवण्याचे ध्येय होते. परंतु ते ध्येय्य कागदावरच राहीले व इतर शाळांप्रमाणेच तेथेंहि शिक्षण सुरु झाले. १९१८ मध्ये प्रो. घारपुरे यांनी न्यू कॉलेजमध्ये पहिल्या वर्गाला मराठीतून सृष्टिशास्त्र शिकवायला आरंभ केला. परंतु इतर प्रोफेसरांनी त्यांना तसे शिकवणे बंद करायला लावले !
१९०६ साली कलकत्याच्या राष्ट्रीय सभेत जी चतु:सूत्री जन्मली तीत राष्ट्रीय शिक्षण हा शब्द जन्मास आला. सरकारी शाळांवर बहिष्कार घालावा. सरकारशी संबंध नसणा-या शिक्षणसंस्था काढाव्या असे ठरले. बडोदे संस्थानांतून श्री. अरविंद घोष तेथील सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कलकत्यास राष्ट्रीय विद्यालय स्थापण्यासाठी गेले. महाराष्ट्रांत तळेगांवला श्री. अण्णासाहेब विजापूरकर यांनी समर्थ विद्यालय काढले. श्री. ज.स.करंदीकर, श्री. जनार्दनपंत ओक वगैरे थोर त्यागी माणसे तेथे शिकवूं लागली. परंतु या संस्थांतूनही शिक्षण कोणते होते? तेच शिक्षण ! शिक्षणाचा खोल असा कोणी फारसा विचार केला नव्हता. समर्थ विद्यालयांत पहाटे उठणे, स्नानसंध्या, गंध, हजामत, सोवळें, श्लोक म्हणणें या गोष्टींवर अधिक भर देण्यांत येई. ही जी ब्राम्हणी सोंवळी संस्कृति तिचा येथे जणु आदर्श होता ! खरे म्हणजे आपले राष्ट्र त्यावेळेस चांचपडत होते. राष्ट्रियता शोधीत होते. स्तिमीत झालेला देश कोठून स्फूर्ति मिळते का ते पहात होता. कोणी रजपूत इतिहासातून स्फूर्ति घेऊ लागले, कोणी मराठी इतिहासांतून स्फूर्ति घेऊं लागले. कोणाला ती जुनी जानवी व शेंडीची संस्कृती स्फूर्ति देईल असे वाटू लागलें. या सर्व गोष्टी ही बाहय प्रतीकें होती. या सर्व गोष्टीतून देशाविषयीचा अभिमान आम्हांस जागृत करावयाचा होता. साहेबाचे अंध अनुकरण करणारे आम्ही होत होतो. स्वदेशास पारखे होत होतो. हॅट, बुट, सूट घालणे पाप आहे असें नाही, परंतु त्यामुळे जर स्वजन व स्वदेशी यांच्यापासून दूर जाणार असू तर हया वस्तू त्याज्यच समजल्या पाहिजे. इतिहाससंशोधक राजवाडे म्हणत, 'प्रयोगशाळेत पंचा नेसून आपण गेलो तर काय ऑक्सिजन तयार होणार नाही? त्यासाठी काय साहेबांची विजारच पाहिजे?'
रजपूत व मुसलमान यांचे झगडे, मराठे व मुसलमान यांचे झगडे यांतून आम्ही नवराष्ट्रस्फूर्ति मिळवीत होतो ! परंतु जुन्या इतिहासांतून राष्ट्रीयता घेतांना काहींची मते हिंदु-मुस्लीम द्वेषाने नकळत भरली वास्तवीक त्या जुन्या इतिहासांतील त्यागाची, स्वातंत्र्याची स्फूर्ति घेऊन आजच्या स्वातंत्र्य लढयांत ती उपयोगावयाची असते. परंतु आजचा परकी शत्रू दुर राहून काही नव सुशिक्षित हिंदु-मुसलमान एकमेकांचेच वैरी होऊ लागले !