मुसलमान राजांनीं गोवधबंदी केली होती. परंतु गोरे साहेब आले. त्यांना गोमांसाची चटक. त्यांनीं ठायीं ठायीं कत्तलखाने सुरु केले. गो-या साहेबांना व शिपायांना गोमांस पुरविण्यासाठी गाईंचा संहार सुरूं झाला. सरकारी कत्तलखान्यांतून लाखों गाईंचा होणारा संहार हिंदु मुकाटयानें बघतात. मग आपण पूर्वीप्रमाणें गाईंची कुरबानी कां करुं नये, असें मुसलमानांस वाटूं लागतें. बंद              झालेली कुरबानी पुन्हा होऊं लागली.

परंतु याला उपाय म्हणजे सत्कल्पनांचा प्रसार करणें हाच आहे. त्यांनीं गाय मारली म्हणून त्यांना मारणें हा उपाय नव्हें. ते एक पूर्वीची धार्मिक स्मृति म्हणून तरी मारतात, परंतु साहेबाच्या जिव्हालोल्यासाठी होणा-या कत्तलींविरूध्द आपण काय करीत आहोंत? ही कत्तल आपण थांबविली तर मुसलमानांसहि वाटेल कीं, खरोखरच गाय हिंदूंस प्राणांहूनहि प्यारी आहे.

वसंता, माझें म्हणणें इतकेंच कीं, उगीच द्वेष पसरुं नये. गोष्टी कशा रुढ झाल्या तें पहावें. द्वेषानें द्वेष वाढतो. एखाद्या मुलाला नेहमीं आपण दगड आहेस असें म्हटलें तर खरोखरच तो तसा नसला तरी तसा होईल ! त्याप्रमाणें '' लांडे असेच, मुसलमान म्हणजे वाईटच, बायका पळवणारे '' असें जर आपण नेहमीं म्हणूं तर मुसलमान तसे नसले तर तसे होतील. आपल्या सदैव म्हणण्याचा तो परिणाम होईल. म्हणून आपली सत्श्रध्दा दुस-यावर आपण लादीत असावें. '' तूं चांगला होशील. चुकीच्या कल्पनांमुळें तूं असा वागत आहेत. तूं मुळांत वाईट नाहींस. '' असें आपण म्हटलें पाहिजे. शास्त्रज्ञ डांबरांतून सुंदर रंग काढतात. डांबरांतून साखर काढतात. माणूस का डांबराहून डामरट आहे? मुसलमान सारे वाईट, ते कधींहि चांगल्या रीतीनें वागणार नाहींत, असें म्हणणें म्हणजे नास्तिकवाद होय. मी तर परमेश्वरावर - म्हणजेच शेवटीं सारें चांगलें होईल यावर विश्वास ठेवणारा आहें. '' अहं ब्रह्मस्मि, तत्वमसि - मी मंगल आहें व तूंहि मंगल आहेस. '' या उपनिषदाच्या वचनावर श्रध्दा ठेवणारा मी खरा हिंदु आहें.

असो. आपण आपली श्रध्दा घेऊन जावें. रवीन्द्रनाथांनीं म्हटलें आहे, '' तुझा दिवा घेऊन तूं जा. तुझ्यावर टीका होतील. तुझा दिवा विझवतील. पुन्हा लाव. तुला एकटयानेंच जावें लागेल. '' वसंता, तुला माहीत आहे कीं नाहीं मला ठाऊक नाहीं;  परंतु कांही हिंदु महासभेचे लोक मला '' मुल्ला '' म्हणतात. म्हणोत बिचारे. त्यानें मी माझ्या ध्येयाजवळ येतों असेंच मला वाटतें. मी सर्वांचा आहें. माझा देव सर्वाचा आहे. सर्व विश्वाचा आहे. तूं प्रकृतीस जपत जा हो. सर्वांस सप्रेम नमस्कार व आशीर्वाद.

तूझा
श्याम

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel