वसंता, म्हणून आपण कंटाळता कामा नये. हजारों वर्षे आपण अन्याय केले त्यांची आपण कल्पना करावी. हरिजनांच्या मनांत केवढी अढी असेल तें मनांत आणावें. तें मनांत आणून ती पूर्वी पापें स्मरून, कोणत्याहि फळाची अपेक्षा न धरतां सर्व शिव्याशाप सहन करून प्रायश्चितरूप सेवा आपण केली पाहिजे, तरच हरिजन एक दिवस प्रसन्न होतील. हे दूर झालेले भाऊ प्रेमानें भेटतील. आज कोठें कोठें असें अनुभव येतात कीं हरिजनांसाठीं एकादें मंदिर उघडलें तर महार बंधु वगैरे येत नाहींत. परंतु त्यामुळें आपण रागावूं नये. लहान मूल प्रथम आईनें घ्यावें म्हणून रडत असते. परंतु मग आई घ्यायला आली तर ते उलट रागावते व आईचा हात झिडकारतें. त्यामुळें आईला राग का येतों? ती अधिकच कळवळते. किती वेळ मी मुलाला ओरडत ठेवलें. असें तिच्या मनांत येतें. तसेंच हे हरिजन आजपर्यत जवळ घ्या असें म्हणत होतें, परंतु आतां आपण त्यांना जवळ घ्यायला गेलों तर ते दूर जातात. परंतु त्यामुळें आपण रागावतां कामा नये. त्यांना अधिकच प्रेम दिलें पाहिजे ख-या आस्थेनें त्यांना जवळ घेतलें पाहिजे. हरिजन वर्ग हा समाजांतील सर्वांत खालचा वर्ग. विद्वत्ता, पैसा, किंवा समाजजीवनांतील त्यांचें स्थान, या सा-याच दृष्टीनें त्यांना जणुं वाळीत टाकलेले. अशा समाजाची सुधारणा म्हणजे केवळ सुधारणा नाही, तर ती एक प्रंचड क्रान्ति आहे. केवळ स्वातंत्र्याची चळवळ नाहीं पुरेशी पडणार त्यांच्या उध्दाराला ! क्रान्ति म्हणजे सर्वांगीण क्रान्ति. केवळ सत्तेची आलटापालट नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानिक अशी क्रान्तिच हरिजनांच्या उपयोगी पडेल. जीवनाची मूल्येंच नवीं उभारली पाहिजेत. जुनीं मूल्यमापनें उपयोगी पडणार नाहींत. अशी क्रान्ति समाजवादीच क्रान्ति असेल. खरा समाजवादी पक्षच ती करुं शकेल.
वसंता, या लहानशा पत्रांत मी किती लिहूं? तुझ्या सेवादलांतील मुलें हरिजनवस्तीत जाऊं देत. तेथें स्वच्छता करुं देत. हरिजन मुलांना पुस्तकें, कपडे वगैरे जी मदत देतां येईल ती गोळा करुन देऊं देत. कीव म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून. संक्रान्त, दिवाळी वैगरे सणांच्या दिवशीं त्यांच्यांत जात जा. त्यांना तिळगूळ द्या. दस-याला त्यांना सोनें द्या. प्रेम वाढवा. सहकार्य वाढवा. ' सबसे उँची प्रेम सगाई ' हें प्रेमाचें नातें सर्वात श्रेष्ठ मानावें. हरिजनांत मित्र जोडा. त्यांना औषधें वगैरे नेऊन द्या. तुमचें सेवा दल आहे. नुसत्या लाठया काठया फिरवणारें तुमचें दल नाहीं. लाठी फिरवून हात मजबूत करा. परंतु तो मजबूत हात दुस-याचें दू:ख दूर करण्यासाठी झिजो.
स्पृशास्पृश्य, श्रेष्ठकनिष्ठ, हिंदुमुसलमान सारे जवळ येण्याची खटपट करूं या. भारत मातेचें तोंड उजळ करूं या. प्रेमानें फुलवूं या. असो, तुण्या वैनीस सप्रेम प्रणाम. तुझ्या वडील बंधूंस व वडिलांस कृतानेक प्रणाम. तुझ्या भावास, रामास व सेवादलांतील सर्वांस सप्रेम प्रणाम.
तुझा
श्याम