वसंता, माझा एक बंगाली मित्र अहे. तो दिल्लीहून येत होता. त्याच्या डब्यात एक गुजराती मनुष्य होता. त्या माणसाला खूप ताप भरला. त्याला वांत्या झाल्या. गाडींत का थोंडे हिंदु होते? परंतु त्याची वांती कदाचित् अंगावर पडेल म्हणून ते भीत होते? तो गुजराती कावरा-बावरा झाला. त्या डब्यांत दिल्लीचा एक दिलदार मुस्लीम तरुण होता. तो उठला. त्यानें त्या गुजराती हिंदूला आपल्या बिछान्यावर निजवलें. खांडेवा स्टेशनवर त्यानें त्याला उतरवलें. त्याच्या घरीं तार केली. त्याला स्टेशनमास्तरांच्या स्वाधीन करुन तो मुसलमान तरुण गाडींत बसला. आमचीं वर्तमानपत्रें आग लावायला टपलेलीं आहेत. परंतु ज्यामुळें समाज एकत्र येतील असें कोणी लिहिणार नाहीं !
मी शाळेंत शिक्षक असतांना माझ्या एका विद्यार्थ्याच्या घरीं मी गेलों होतों. आम्ही दोघे दुस-या दिवशीं निघणार होतों. त्या विद्यार्थ्याचा मोठा भाऊ सायंकाळी जिनमध्यें पैसे आणण्यासाठीं म्हणून गेला होता. तें जिन गांवापासून दोन मैलांवर होतें. बरीच रात्र झाली तरी भाऊ परत आला नाहीं. त्यांच्या घरीं एक मुसलमान नोकर होता. त्याला घरांतील सारीं मुलें ' अटेलाकाका ' असें म्हणत. त्या नांवांतहि किती गोडी आहे पहा ! तो अटेलाकाका अस्वस्थ झाला. शेवटी हातांत कंदील व काठी घेऊन तो निघाला. रात्रीची वेळे. धनी पैसे घेऊन येणार होता. वाटेंत बरेंवाईट झालें असतें तर? असें मनांत येऊन तो निघाला. ' हा आपला हिंदु मालक करो ' असें का त्याच्या मनांत आलें? घरांतील माणसांना चिंता वाटली नाहीं इतकी त्याला वाटली. तो मुसलमान होता, परंतु दिलदार होता. ज्यांना तुम्ही लांडे लांडगे म्हणतां, त्यांच्यातहि अशी दिलदारी भरलेलीं आहें. परंतु तुम्हाला दिसत नाहीं. मी तरी काय करूं?
खानदेशांतील चोपडे तालुक्याकडची गोष्ट आहे. एकदां एक मोटार रस्त्यांत मोंडून पडली. रात्र झाली. गाडींत कुटुंबवत्सल माणसें होतीं. रस्त्याजवळ एक गांव हाता. त्या गावांत एक वृध्द काजीसाहेब होते. त्यांना कळलें कीं, रस्त्यांत मोटार पडली आहे. आंत बायकामाणसें, मुलेंबाळें आहेत. ते लगेच हातांत कंदील घेऊन निघाले. त्या सर्व मंडळींना ते म्हणाले, '' रात्रीं येथें का उघडयावर बालबच्चे घेऊन बसणार? गांवांत चला. मी सारी व्यवस्था करतों. तुम्ही स्वयंपाकपाणी करा. तुम्हांला शिधासामुग्रीं, दूध वगैरे सारें मिळेल. अंथरुण-पांघरुण मिळेल. ''
मुसलमानांवर विश्वास ठेवावा की न ठेवावा, अशी त्या मंडळीस चिंता वाटल. त्या वृध्द मुसलमानाच्या लक्षांत ही गोष्ट आली. त्याला दु:ख वाटलें. तो म्हणाला, '' या पांढ-या दाढीवर विश्वास ठेवा. मुसलमानहि माणसेंच आहेत. '' शेंवटीं ती सर्व मंडळी गांवांत आली. त्यांना दूध वगैरे मिळालें. तो काजी म्हणाला, '' घरांत झोपता का? '' ते लोक म्हणाले, '' बाहेरच बरें ! '' त्या मुसलमान वृध्दानें आंथरुण पांघरुण दिलें. तीं मंडळी झोपली.