पण मग शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा कसा? हिंदुस्थानांत आज प्राथमिक शिक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च होत आहेत. तरी शेंकडा १० लोकच साक्षर करायची म्हणूं तर १०० कोटी रुपये हवेत. आणि सर्व हिंदुस्थानचे मध्यवर्ति व प्रांतिक धरुन सरकारी उत्पन्न जवळ जवळ दोन अडीचशे कोटी आहे. म्हणजे निम्में उत्पन्न प्राथमिक शिक्षणाकडेच खर्च करावें लागेल आणि इतर राष्ट्रसंवर्धक कामे कशांतून करावयाची? ही एक मोठी समस्या आहे. महात्माजी म्हणाले, 'शिक्षण संस्था स्वावलंबी नाही का करतां येणार?' शाळेंत येणारी मुलें काही हस्तव्यवसाय नाही का करणार? त्यांतून काही उत्पन्न शाळेला नाही का मिळाणार?' शाळेतील शिक्षण हस्तव्यवसायांमार्फतच द्यावयाचे असा मुद्दा निघाला. आणि मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र दोनही या गोष्टीला अनुकूल आहेत.
वसंता, हिंदुस्थानात सक्तिचे व मोफत असे प्राथमिक शिक्षण हवे असें आपण म्हणतो. तेवढयाने प्रश्न सुटत नाही. लहान मुलें-मुलीही गरिबाच्या संसारास हातभार लावतात. जपानसारख्या श्रीमंत देशांतही सक्तिचे शिक्षरण करतांना शेंकडा १० लोक बाद करावे लागले. कारण त्या अत्यंत दरिद्री लोकांना आपली मुलेंबाळे शाळेंत पाठवणे कठिण जाई म्हणून श्रीमंत जपानची जर ही स्थिती तर हिंदुस्थानांत कशी स्थिती असेल बरे? म्हणून पू. विनोबाजी म्हणाले, 'हिंदुस्तानांतील शिक्षण केवळ सक्तिचें व मोफत करुन भागणार नाही. तर ते शिक्षण मुलांना दोन दिडक्या देणारे झाले पाहिजे. तर मग गरीब आईबाप म्हणतील, शेण गोळा करणे, बक-या चारणें वगैरेंसाठी पोर नाही गेला तरी चालेले. शाळेंत जाऊनही तो रुपयाभर घरी आणतो ! '
मुलांनी घरी दोन पैसे देणे दूर राहिले, परंतु निदान शिक्षण तरी स्वावलंबी करतां येईल का? आणि मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र यांच्या पायावर ते उभारतां येईल का? मुलांचे मानसशास्त्र काय सांगते? मुलाला तर हालचाल करायला आवडते. आजचें प्राथमिक शिक्षण मुलांना चार घंटे बसवून ठेवतें ! मग मुले हळूंच कोणाला चिमटे घेतील, हळूंच कोणाचा सदरा ओढतील, कोणाचे पुस्तक फाडतील, कोणाची पेन्सिल मोडतील. मुलांचे हातपाय बांधून ठेवणारे शिक्षण व्यर्थ आहे. मुलांना काम द्या. कामांत रमवा त्यांचे हात, रमवा त्यांचे कान, रमवा त्याचा डोळा. द्या त्याला कापूस निवडायला आणि तोंडाने गाणें म्हणायला सांगा :
'कापसांतली घाण काढूं या
चित्तांतली घाण काढूं या
देशातील घाण काढूं या
साफ करूं, साफ करूं
स्वच्छ करूं, स्वच्छ करूं,
अज्ञान आपुले दूर करूं.'