भारताला महान प्रयोग करायचा आहे !

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

तूं सेवादलाची लहानशी का होईना शाखा सुरू केलीस, हें वाचून किती तरी आनंद झाला ! तुझ्या पत्राची मी वाटच पहात होतों. परंतु कांही तरी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केल्याशिवाय उगीच कशाला लिहा पत्र, असें जें तूं मनांत ठरविले होतंस त्यामुळें आतांपर्यत तुझें पत्र आलें नाहीं. खरें आहें. आपण खंडीभर चर्चा करतों. परंतु प्रत्यक्ष कार्य आरंभणे सर्दव दूरच राहतें. तूं तसा नाहींस ही चांगली गोष्ट आहे.

सेवादलांतील मुलें तुला नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. त्या मुलांना वाचून दाखविण्यासाठी तुला कांही हवें आहे. तूं या गोष्टीची मागणी केली आहेस. वसंता, मी तसें फार वाचलेले नाहीं. कोणत्या विषयाचा गाढ अभ्यास मी केलेला नाही. बहुधा खेडेगांवांतून हिंडत असल्यामुळें शहरांतील बौध्दिक वातावरणाशी माझा संबंध येत नाहीं. नवीन नवीन ग्रंथ पहावयास मिळत नाहींत. थोर थोर पुढा-यांचा प्रत्यक्ष परिचय मला नाहीं. वादविवाद, चर्चा फारशा ऐकल्या नाहींत. या अशा परिस्थितीमुळें मी विचारांची मौल्यवान भेट तुला कशी पाठवणार? माझी तितकी लायकी नाही. परंतु जे लायक आहेत ते जोंपर्यंत स्वस्थ आहेत तोंपर्यंत माझ्यासारख्यानींच जें थोडें फार देतां येईल तें दिलें पाहिजे. माझ्याजवळ ज्ञान फारसे नाहीं. परंतु या देशाचे भलें व्हावें असें सारखे वाटते. तरुणांनी उदार व थोर दृष्टीचें व्हावें असें फार वाटतें. ही जी तळमळ, तिच्यामुळे जे कांही मला सुचेल, स्फुरेल तें मी तुला लिहीत जाईन.

मला एक लहानसा सुंदर पक्षीं समोर दिसेत आहे. त्याचे नीळसर पंख आहेत. तो आकाशात उडत आहे. स्वच्छ हवा व प्रकाश लुटीत आहे. वसंता, मीहि त्या पक्ष्याप्रमाणें आहें. काँग्रेसच्या ध्येयाच्या निर्मळ आकाशांत माझा आत्मा उड्डाण करीत असतो. तसें पाहिले तर काँग्रेसच्या संस्थेत का दोष नसतील? संस्था या व्यक्तींच्या गुणदोषांकडे फारसे बघत नाहीं. त्या गुणदोषांच्या पाठीमागें संस्थेचा जो ध्येयवाद असतो, त्याच्याकडे माझी दृष्टि असते. तें ध्येय म्हणजे संस्थेचा खरा आत्मा, संस्था ज्याच्यासाठी जन्मली व ज्याच्यासाठी मरणार तें त्या संस्थेचे ध्येय.

काँग्रेस कशासाठी जन्मली? या हिंदुस्थानचा संसार सुखाचा करावा म्हणून. आरंभी आरंभी काँग्रेसच्या समोर ध्येयाची सुस्पष्ट अशी कल्पना नव्हती. परंतु आपण जसजसे उंच जातों, तसतसें अधिक दूरचें दिसूं लागतें. काँग्रेस अशा रीतीनेंच स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे आली. कांही क्षुद्र लोक विचारीत असतात कीं तुमच्या काँग्रेसनें काय केलें. परंतु आईनें मुलांसाठी काय केलें असें विचारण्यासारखेंच हें आहें. काँग्रेस जणुं लोकमाता आहे. आई ज्याप्रमाणें मुलाला पाजते, पोसते, त्याला चालावयास बोलावयास शिकविते, त्याप्रमाणे काँग्रेसनें केलें आहे.

टिशांनी अमदानींत हिंदुस्थानचें सर्वांत मोठें नुकसान कोणते झालें असेल तर तें हें कीं राष्ट्राचा आत्माच जणूं मेला. आपण केवळ भेकड बनलों. एक पोलीस पाटील सा-या गांवाला जरबेंत ठेवतो. एखादा पोलीस दिसताच सारे घाबरतात. काँग्रेसनें ही वस्तुस्थिती ब-याचशा अंशानें दूर केली आहे. राष्ट्रांत आज किती तरी निर्भयता आली आहे. काँग्रेसनें ज्या प्रचंड चळवळी केल्या त्यामुळे हें झालें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel