आज जगांत असेच हे दोन पक्ष आहेत. तरुणांनी आपली संघटना शास्त्रीय पायावर केली पाहिजे. भ्रामक कल्पनांच्या नादी त्यांनीं लागूं नये. आज कदाचित् धर्माच्या नांवानें लोक भुलतील, भाळतील. परंतु उद्यां वस्तुस्थिति दिसूं लागतांच या संघटना मोडतील. मुसलमानांचे अन्याय कांहीं रोज उठून प्रत्येक खेडयांत नाहींत. परंतु सावकारांचे व जमीनदारांचे अन्याय तर दररोज वर्षांनुवर्षें होत आहेत. ते सावकार गरिबांच्या घरांतील भांडी काढतात. लग्नाची पैठणी, तीहि काढून तिचा लिलांव करतात. सावकारांनीं शेतक-यांची विटंबना चालविली आहे. बेअब्रू चालविली आहे. ही बेअब्रू हिंदू संघटनवाले थांबविणार आहेत का? माझ्या दाराशी हिंदु सावकारांची जप्ती येते. पठाणहि येऊन बसतो. दोघे सावकारच. जात एकच. गरिबांना पिळण्यांची. शेतक-यांच्या ध्यांनात ही गोष्ट येईल. नुसतें हिंदु-हिंदु ओरडण्यांत काय अर्थ? श्रीमंत हिंदु, गरीब हिंदुंचे रोज रक्तशोषण करीत आहेत त्याचें काय? माझी गीता या दोघांना एका धर्माची म्हणणार नाही. रक्तशोषण करणा-याला ती आसुरी म्हणेल. आणि सावकाराविरुध्द शेतकरी झगडायला उभा राहील तर त्या शेतक-याला ती दैवी म्हणेल. राक्षसी व दैवी या पूर्वीच्या दोन नावांनाच आज आपण भांडवलवाले व श्रमणारे अशीं नांवें देऊं या. नांवें बदललीं तरी अर्थ एकच आहे.
किती तरी कारखान्यांचे मालक हिंदु असतात. ते का हिंदु मजुराला अधिक मजुरी देतील? उद्यां मुसलमान कमी मजुरीवर मिळाला तर ते त्याला आधी कामाला ठेवतील. आमच्या अमळनेरच्या कामगारांत मिलच्या चालकांनीं खानदेशी कामगार व खानदेशच्या बाहेरचे कामगार अशी फूट पाडण्याचे प्रयत्न केले. इंग्रज आमच्यांत फूटी पाडून राज्य चालवितो. भांडवलवाले कामगारांत फुटी पाडून स्वत:ची लूट चालवितील. या गिरण्यांतून किती विटंबना असते ! स्त्री-कामगारांची तेथें किती करुण दशा असते ! परंतु कोणा हिंदु संघटनवाल्याचें तेथें लक्ष जाईल का? निदान तुझ्या हिंदु कामगारांना तर अधिक मजुरी दे, हिंदु कामगारांसाठी तरी नीट चाळी बांधून दे, असें हिंदुमहासभावाले एखाद्या श्रीमंत हिंदु कारखानदारांस सांगतील का? आणि तो कारखानदार तें ऐकेल का?
काँग्रेसनें कर्जनिवारणबिल आणलें तर सारे हिंदुमुसलमान सावकार एकत्र जमून त्यांनीं आरडाओरडा केला. कुळकायदा येतांच सारे जमीनदार जातगोत न पाहतां उठले. खोती विरुध्द काँग्रेसचें मत दिसतांच सारे खोत एकत्र झाले. संघटना हिंदुमुसलमानांच्या वरवरच्या आहेत. खरी संघटना आर्थिक हितसंबध एक असणा-यांचीच होत आहेत, कोंकणात हिंदु खोत आहेत, मुसलमान खोत आहेत. हिंदु खोत व मुसलमान खोत का अलग राहिले? हिंदुमहासभेचें काम करणारे खोत, खोतमंडाळांतहि सेक्रेटरी होतात. आणि त्या खोतमंडळांत मुसलमानहि असतात. खोत तेवढे सारे एक होतात व कुळांना चिरडतात. कुळेंहि मग सारीं एक होतील.
शहरांतील कामगारांना ही गोष्ट पटकन पटते. दुनियेंत गरीब व श्रीमंत, छळणारे व छळले जाणारे, पिळणारे व पिळले जाणारे हेंच काय ते खरे भेद आहेत हें त्यांना पटकन समजतें. मालक हिंदु असो, ज्यू असो, मुसलमान असो. सर्वत्र कामगार भरडलेच जात असतात कारण सर्व मिलवाल्यांचे आर्थिक हितसंबंध एक असतात. कानपूरला हिंदुमुसलमान कामगारांत कधीं फारसें भांडण होत नाही. ते एकत्र राहतात. उलट कानपुरांत होणारे हिंदुमुसलमानांचे दंगे मिटवण्यासाठी तेथले कामगार खटपट करतात. तेथे हिंदुमुसलमानांची भांडणें पुष्कळ वेळां सरकारी हस्तकहि तेथें लावीत असतात. हिंदु कामगार वा मुसलमान कामगार दोघे कारखान्यांतून मरत आहेत. हें कामगार ओळखतो.