या राष्ट्रासाठी गेली पन्नास वर्षे अहोरात्र हाडें झिजविणारा दुसरा कोण आहे? आणि आज आयुष्याच्या सायंकाळी सर्वांच्या पुढें जाऊन तेच उभे आहेत. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ते नुसते तडफडत आहेत. वसंता, महाराष्ट्रांतील कांही क्षुद्रांनी या महापुरुषावर आग पाखडली. तरी महाराष्ट्राचे हृदय शाबूत आहे. महाराष्ट्रांतील बाळगोपाळ, महाराष्ट्रातील बहुजनसमाज महात्माजींभोंवती, काँग्रेसभोंवती उभा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रानें काँग्रेसची अब्रू सांभाळली. तें काम अधिकाच नेटानें पुढें झालें पाहिजे. तूं तुझ्या तरुण मित्रांच्या मनांवर ही गोष्ट बिंबव. त्यांना मोठी दृष्टि घेण्यास सांग. ज्या महात्म्याने हिंदी राष्ट्राची मान उंच केली, त्याच्यासमोर मान लववायला त्यांना सांग. कृतज्ञता दाखवायला सांग.

आज आतां पुरे. मी पत्र लिहायला घेतले तेव्हां आकाशांत अभ्रे होतीं. हवा जरा चमत्कारिक होतीं. परंतु आतां समोर स्वच्छ प्रकाश पडला आहे. अभ्रें कोठल्या कोठें गेली ! त्याप्रमाणे आपल्या राष्ट्रावरची अभ्रेंहि जातील. स्वच्छ विचारांचा निर्मळ प्रकाश येईल. भारताचे भवितव्य उज्वल आहे यांत शंका नाहीं. हे महान् राष्ट्र हजारों वर्षे का उगीच जगलें? लिन यूटांग या प्रख्यात चिनी लेखकानें लिहिलें आहे कीं, ''चीन जुनें नाहीं झालें, म्हातारें नाहीं झालें. कांही राष्ट्रांची वाढ फार हळू होते. ज्यांची तारुण्य आतां कोठें सुरु झाले आहे ! '' हिंदुस्थानाविषयीं मला असेंच वाटतें. खरी अखिल भारतीय दृष्टि आतां येतें आहे. सारा भरत अंतर्बाह्य एक ही भावना वाढत आहे. आतां कोठें आपण डोळस होत आहोंत. नवीन प्रकाश घेत आहोंत. वाढतें वय आहे. हिंदुस्थान म्हातारा नाही, नवजवान आहे. त्याला भरपूर कार्य अद्याप करावयाचे आहे. सर्व धर्म व संस्कृति एकत्र नांदवण्याचा महान् प्रयोग त्याला करावयाचा आहे.

वसंता, तुला अधूनमधून मी कांही ना कांही लिहीत जाईन. तुझ्या सेवादलांतील मुलांना तें वाचून दाखवीत जा. मी जणुं त्यांना माझें हृदयच पत्ररुपानें पाठवीत जाईन. दुसरें मी काय देऊं, काय पाठवूं? मी जें लिहून पाठवीन तें त्यांना आवडेल कीं नाहीं ते मी काय सांगू? माझ्या लिहिण्यांत नवीन कांही असेल असें नाही. त्यांच्या सर्व शंका-आशंका माझ्या लिहिण्यानें फिटतील असेंहि नाही. परंतु तरुणांबद्दल आशा बाळगणा-या एका माणसाचें हें तडफडणारे हृदय आहे एवढें त्यांना कळलें तरी पुरे. सर्वांस प्रणाम.

 

तुझा
श्याम

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel