या देशांत प्राचीन काळापासून नाना जातिजमाती आल्या, भांडल्या व पुन्हां गुण्यागोविंदानें राहूं लागल्या. ज्याप्रमाणे आगगाडीचा डबा असतो तसें हें आहे. आपण आगगाडीच्या डब्यांत बाहेरचें कोणी आंत घेंत नाहीं ! परंतु धक्काधक्की करून ते बाहेरचे आंत येतात. क्षणभर वातावरण गरम असतें. मग पुन्हां सारे एकत्र बसतात. चौकशी करतात. पानसुपारी खातात. ते एक होतात. पुढच्या स्टेशनवर पुन्हां तो प्रकार ! अशा प्रकारें सर्व प्रकारचे लोक घेऊन तो डबा मुक्कामावर पोंचतो. भारतवर्षात नाना धर्म आले आहेत, नाना संस्कृति आल्या आहेत. यांचे झगडे झाले नाहींत असें नाहीं. परंतु झगडयातून आम्ही ऐक्य निर्माण करीत होतों.

हिंदु व मुसलमान भांडभांड भांडले. परंतु ते नव संस्कृति निर्मित होते. अकबरच्या कारकीर्दींत परस्पर संस्कृतिची देवाणघेवाण सुरू झाली. आम्ही अरबी ग्रंथ भाषांतरिले. मुसलमानी उपनिषिदें, रामायण महाभारत यांची भाषांतरें केलीं. परस्परांच्या संस्कृतींचा अभ्यास केल्यानें हृदयें जवळ येतात. मुसलमानांतील सुफी कवींचीं कविता तर आपल्या संतवाड्मयासारखी अद्वैत शिकवणारीं आहे. परंतु आपला कोठें आहे त्या वाड्मयाशीं परिचय?

आपण हिंदुस्थानचे जे इतिहास शिकतों तें बहुधा इंग्रजांनी लिहिलेले असतात. इंग्रजांनी या देशाचें विकृत असे इतिहास लिहिलें. 'भारत अंग्रेजी राज' या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्यें येथें मुसलमानाचे संबंध कसे चांगले होते ते पंडित सुंदरलाल यांनीं दाखविलें आहे. किती तरी मुसलमान राजांनी हिंदु कवींना, कलावंतांना आश्रय दिला आहे. परंतु मुसलमानांच्या चांगल्या गोष्टी आम्हांस माहीत नाहींत. हिंदुस्थानावर इंग्रजांनी राज्य चालवावयाचे आहे. आरंभापासूनच भेदनीतीचा त्यांनी अवलंब केला. या देशांतील जनतेचीं मनें परस्परविरुध्द राहतील अशी कोशांस ब्रिटिश सरकार सदैव करीत असतें. आमच्यांत त्यांनीं सवंते सुभे उभे केले. अलगपणाचें विष पेरलें. परसत्ता म्हणजे शाप आहे.

परंतु हिंदुमुसलमान नवसंस्कृति निर्मित होते. हिंदु-दैवतांना मुसलमान नवस करीत, तर मुसलमानी पीरांना हिंदु भजत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे. त्यांचे शहाजी हें नांव कोठून आलें? एका मुसलमान फकीराचें तें नांव होतें, 'शहाजी' या शब्दाचाच अर्थ 'फकीर' असा आहे. ब्लंट या इंग्रज इतिहासकारानें हिंदुमुसलमान परस्परांविषयीं इतकी प्रीति दाखवतात यांचे आश्चर्य मानलें आहे. ही प्रीति नष्ट करणें हें तर या इंग्रज इतिहासकारांचे काम होतें व तसे इतिहास त्यांनी लिहिलें.

नांवांतूनसुध्दां इतिहास कळतो. शेवटीं भांडणामधूनहि भलें कसें निर्माण होत असतें ते नांवावरुनहि कळतें. शैव व वैष्णव एके काळीं भांडत होते. परंतु पुढें दोन्ही दैवतांची नांवे एकत्रित करुन आपलें पूर्वज आपल्या मुलांबाळांना तीं नांवें ठेवूं लागले. शिवनारायण, हरिहरराव वगैरे नांवें ऐक्य-सूचक आहें. हें ऐक्य निर्मिणा-या पूर्वजांवर त्या वेळेस दगडधोंडे मारण्यांत आले असतील. खुदाबक्ष, रामबक्ष अशा नांवांतूनहि हिंदुमुस्लीम ऐक्याचाच प्रकार दिसतो.

भारतीय शिल्प, चित्रकला, संगीत इत्यादि कलांमध्यें हिंदुमुसलमान दोघांनी भर घातली. हिंदु गवयी मुसलमान वस्तादांचे चरणीं बसून शिकतात तर मुसलमान गवयी हिंदु गायनाचार्यांजवळ धडे घेतात. तानसेन मरण पावला तेव्हां मुसलमान म्हणाले हा आमचा आहे. हिंदु म्हणाले हा आमचा आहे. दोघांना तो आपला वाटला. कबीर मरण पावले तेव्हां हिंदु म्हणाले हा आमचा आहे, मुसलमान म्हणाले हा आमचा आहें. कबीराच्या अंगावरील वस्त्र दूर केलें तेथें तुळशीहि सापडल्या व सबजाहि सांपडला. बुक्काहि सांपडला, अबीरहि सांपडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel