वसंता, संघटनेच्या नांवाने इतका अपरंपार द्वेष आम्ही पसरवीत आहोंत. मला अत्यंत वाईट वाटलें. ही का संस्कृति? ही का माणुसकी? हा का धर्म? असें मनांत आलें. मागें एकदां जळगांव शहरांत खादीसंबंधी एका गृहस्थांजवळ बोलतांना ते गृहस्थ म्हणाले, '' आम्ही खादी नाहींच वापरणार. कारण खादीमुळें मुसलमानांसहि धंदा मिळतो ! मुसलमान बायका, मुसलमान पिंजारी वगैरेंस काम मिळतें. आम्हांला नको खादी. ' ' आपल्याजवळच्या मुसलमान आया-बहिणींस दोन घांस मिळतात म्हणून आर्यसंस्कृतीच्या या उपासकांचें पोट दुखूं लागलें. हीच जर आर्य-संस्कृति असेल तर मग आग लागो तिला. ज्याला ज्याला का देतां येईल, त्याला त्याला आम्ही देतों. खादीमध्यें हिंदु-मुसलमान सर्वांना काम मिळतें. खादी हिंदुमुसलमांचीं छकलें जोडीत आहें. कांही गरीब मुसलमानांची फार दैना असते. त्यांच्यांत पडदा आहे. घरांत दारिद्रय असलें तरी रुढीमुळें त्यांना बाहेर पडतां येत नाही. घरांत उपास पडतात. मागें भुसावळजवळ वरणगांव नांवाच्या खेडेगांवांत असे करुण अनुभव आले. तेथें माझ्या कांहीं मित्रांनी मजुरीनें सूत काढून घेण्याचें काम सुरूं केलें. मुसलमान आयांबायांस तें कळलें. त्यांनीं आपल्या मुलींना सूत कातणें शिकवण्यासाठी या मिंत्राकडे पाठविलें. आठ आठ तास न कंटाळता त्या मुली शिकत बसत.
''तुम्ही कंटाळत नाहीं कां? माझ्या मित्रानें त्या मुलींना विचारलें.
''कंटाळून काय करूं? आम्हाला लौकर शिकूं दे. मग आमच्या आयांना आम्ही शिकवूं. आम्हाला दोन पैसे मिळतील. पोटाला मिळेल.'' त्या मुली म्हणाल्या.
''सध्यां तर तुमचे सणाचें दिवस ना?''
''काय का सण? घरमें खानेकू तो नही. !''
वरणगांवचे माझे एक थोर मित्र बनाभाऊ. मुसलमान मायबहिणींनी त्यांना भाऊ मानले. मुसलमानांत पडदा होता तरी बनाभाऊंस तो नडत नसे. ते खुशाल त्यांच्या घरीं जात. हा आपण अन्नदाता आहे असें त्यांना वाटें.
पारोळें येथें नेहमी हिंदुमूसलमानांचें दंगे. परंतु खादीनें तेथें मांगल्य निर्मिले आहे. मुसलमान मायबहिणींस दोन घास मिळतात त्या आपल्या भांडखोर नव-यांस म्हणतात. '' हुज्जत कशाला घालता? पोटाला खायला द्यायला हे काँग्रेसवालेच आहे. दुसरे कोण आले? '' एरंडोल येथील कागदाचा धंदा पुन्हां वाढला. काँग्रेसच्या मदतीमुळें अधिक कागद होऊ लागला. अधिक खपूं लागला. सात आठ हजारांचा कागद मागील वर्षी झाला ! त्या मुसलमांनातले कितीतरी काँग्रेसचे सभासद झाले. त्यांना काँग्रेसविषयीं आपलेपणा वाटला. सेवा हृदयांना जोडते. काँग्रेस हिंदी जनतेंचीं शकलें विधायक सेवेनें जोडीत आहे. पूज्य विनोबाजी सांगत असतात कीं, '' सुताचा धागा सर्व दारिद्र नारायणांशीं आपल्याला जोडीत आहे, असें सूत काततांना वाटतें. '' ते खरें आहे. परंतु खादी सर्वांना जोडीत आहे म्हणूनच ती कांहीना नको आहे. जळगांवच्या त्या मित्राचा तो मुस्लीम-द्वेष पाहून मी गारच झालों ! जणुं गिरणीमध्यें सारे हिंदूच कामगार आहेत. आगागाडीचे व मोटारीचे सारे ड्रायव्हर जणुं हिंदूच आहेत ! मुसलमानांचा ज्या ज्या धंद्याशी संबंध असेल त्या धंद्याशीं का तुम्ही संबंध तोडला आहे.? फोडणीला लागणारा हिंग तर काबूलहून येतो. सोडलात का तो? कांहीं तरी चावटपणानें बालावयाचें झाले. मागें नाशिकचे कांहीं हिंदु-महासभेचे तरुण ' गांधी टोपी जाळा' वैगरे गांधी जयंतीस ओरडले. अरे इंग्रज सरकारनें तेंच म्हटलें. इंग्रजांत व तुमच्यांत फरक काय? गांधी टोपी जाळा म्हणण्यांत ज्या गरिबांना खादींने घांस मिळतो त्यांच्या संसारास आग लावा असेंच जणुं तुम्ही म्हणत असता.