अत:पर तरी अस्पृश्यतेसारखी दुष्ट चाल आपण गाढून टाकली पाहिजे. कोणी फाजील लोक म्हणतात, ' आज हरिजनांना जवळ घ्या म्हणतो, उद्यां त्यांच्याशीं लग्न लावा असें म्हणाल. ' त्यांना उत्तर एवढेंच कीं ज्या इतर जातीजमातीस आपण आपल्या ओटीवर बसवतों, त्यांच्याशीं का लगेच आपण लग्नें केली? ब्राम्हण, मराठे, न्हावी, धोबी, कुणबी, मुसलमान वगैरे सारे एकमेकांच्या ओटीवर येतात? त्यांच्याशी काय आपण सोयरिकी जोडल्या? हरिजनांना जवळ घ्या असे म्हणताच असले प्रश्न तुम्ही का विचारता? हा चावटपणा आहें.
कोणी शहाणे म्हणतात, 'अहो आतां हळूंहळूं हें सारें होणारच आहे. विटाळ आपोआप कमी होत आहे. मुद्याम तुम्हीं चळवळीं कशाला करता? आपोआप एक दिवस सारें होईल म्हणून का आपण गप्प बसावयाचें? काळ आपणांस करायला लावीलच. परंतु काळाची गति ओळखून शहाणपणानें आधींच आपण तसें वागणें योग्य नाहीं का? आपणाला एखादी जखम झाली तर ती कांहीं दिवसांनीं आपोआप बरी होतेच परंतु आपण औषध लावून ती जखम लौकर बरी व्हावी म्हणून नाहीं का खटपट करीत? त्याप्रमाणेंच युगधर्म ओळखून आपण नको का कृति करायला? जें होणार आहे तें आधीच करुं या. आपणाला काळ ओढून नेईलच. परंतु आपण होऊन आधींच करुं तर त्यांत प्रतिष्ठा आहे.
तिसरें कोणी म्हणतात, ' हरिजन मृत मांस वगैरे खातात. त्यांना कसें जवळ येऊं द्यावयाचे? ' ही तर दु:खावर डागणी आहे ! हरिजनांची स्थिति तर पहा. त्यांना ना शेत ना भात. ते खाणार काय? मृत मांस त्यांना मिळालें तर ते तेंच खातात. ताजा बकरा, ताजी कोंबडी त्यांना मिळत नाहीं. हा का त्यांचा दोष? त्यांची आर्थिक स्थिति सुधारली तर ते तुमच्याप्रमाणें ताजे मांस खातील. दही, दूध, तूप खातील. आणि आज कितीतरी हरिजनांनी मृतमांस खाणें सोडून दिलें आहें. त्यांना तरी घेतां का जवळ? हरिजनांमध्यें हजारों वारकरीं आहेंत. वऱ्हाडच्या बाजूस हजारों हरिजन वारकरी आहेत. त्यांनी मद्यमांस सोडलेले आहें. परंतु त्यांना पंढरपूरच्या देवळांत येतं का जाता? तुमच्या मंदिरावर अशी पाटी लावा की आंघोळ केलेल्या लोकांनी आंत जावें. हातपाय धुवून आंत जावे. विडी न ओढणारानें आंत जावें. परंतु ' हरिजनांनीं आंत जाऊं नयें ', असें म्हणणे अर्थहीन आहे. तुम्ही कांही वागणुकीचे नियम करा. ते नियम पाळील तो जाईल. ते नियम न पाळणारा ब्राम्हण असता तरी त्याला मज्जाव करण्यांत येईल, असें करा ना.
चौथे कोणी म्हणतात, ''हरिजनांची राहणी गलिच्छ असते.'' परंतु हरिजनांची राहणी सुधारावी असें वाटत असेल तर त्यांच्यांत जा. मुलांच्या नाकाला शेंबूड असेल तर तो आपण काढला पाहिजे. आणि हरिजनांची राहणी गलिच्छ असते त्यालाहि कारण त्यांचे दारिद्रय हेंच आहे. त्यांच्या बायका कोठून लावतील केसांना तेल? त्यांच्या कपडयांना कोठून मिळणार साबण? आंघोळीला कोठून मिळणार पाणी? पिण्यासहि ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांनीं कपडे कोठें धुवावें, अंगें कोठें धुवावीं? हरिजनांची मुलें शाळेंत तुमच्या मुलांबरोबर बसूं देत. हरिजन तुमच्याकडे जाऊंयेऊं देत. तुम्ही त्यांच्यांत जाये करा. त्यांची आर्थिक स्थिति सुधारा. त्यांना शिक्ष्ज्ञण द्या. म्हणजे तुमच्यासारखे ते दिसतील.