काँग्रेसमध्यें जे कांही थोर मुसलमान आहेत तें गांधीजींच्या श्रध्देचेच फळ आहे. ज्या खैबरखिंडींतून पूर्वी मुसलमानांचे लोंढे आले, त्याच बाजूला देशभक्तीचें फळ आलें ! हजारों खुदाई खिदमतगार तेथें उभे आहेत.  त्या प्रातांत काँग्रेसचें मंत्रिमंडळ होते. आज तरी तेथें काँग्रेसचें मंत्रीमंडळ नसले तरी त्या प्रांतांत काँग्रेस-प्रेम आहे. खान अब्दुल गफारखान आज तुरुंगात आहेत. सरकारी कारवायांनी आज सरहृद प्रांतांत, सिंधमध्ये, बंगालमध्यें जरी मुस्लीम लीगचा वरचष्मा दिसला तरी तेथें खरा पाया नाहीं. ब्रिटिशांची व मुस्लीम लीगची ही कुटिल नीति आहे. परंतु कुटिलता नेहमींच फलद्रूप होत नसते. मुस्लीम लीगच्या प्रतिष्ठेचें हें पोकळ डोलारे आहेत. ते पुढें कोलमडतील.

पेशावर प्रांतात काँग्रेस-प्रेम आहे. अहरार पक्षहि काँग्रेसला सहानुभूति दाखवायला तयार असतो. जमायल-उल-उलेमा ही संस्थाहि काँग्रेसप्रेमी आहे. बोहरी मुसलमानांत काँग्रेस-प्रेम आहे. शियापंथी मुसलमान अद्याप मुस्लीम लीगला फारसे मिळाले नाहींत. लाखो मोमीनांचा मुस्लीम लीगला विरोध आहे. निरनिराळया प्रांतांतून काँग्रेसला अनुकूल असे मुसलमान आहेत. मुस्लीम लीगच्या गाजावाजामुळें या काँग्रेसप्रेमी मुसलमानांचें स्वरुप दिसून येत नाहीं. परंतु बॅ. जिनांच्या एकान्तिक धोरणास मुसलमान विटतील, आझाद मुस्लीम पक्ष बलवान होतील.

मुस्लीम लीग हीच काय ती मुसलमानांची एकमेव संस्था, या गोष्टीला काँग्रेसनें कधीहि मान्यता दिली नाहीं. जिनासाहेबांजवळ काँग्रेसनें पुन:पुन्हां वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले. आणि  वेळ आली तर पुन्हांहि करील. कारण किती झालें तरी आपल्यास राष्ट्रांतील ते भाऊ आहेत. ब्रिटिश सरकारशीं पुन:पुन्हां वाटाधाटी करण्यांत जर आम्हांस कमीपणा वाटत नाही तर जिनांजवळ वाटाघाटी करण्यांत कमीपणा का वाटावा? परंतु जोंपर्यत काँग्रेसबद्दल सहानुभूति दाखविणारे इतर मुसलमान पक्ष आहेत, खुद्द काँग्रेसमध्येंहि जोंपर्यत मुसलमान आहेत तोंपर्यंत मुस्लीम लीग हीच मुसलमानांची एकमात्र संस्था असें काँग्रेस मानणार नाही. जिनासाहेब सारखे सांगत आहेत कीं काँग्रेस फक्त हिंदूंची, परंतु काँग्रेस एका जातीसाठी वा धर्मासाठी कधी जन्मली नव्हती. ती सर्वांसाठी आहे. सर्व राष्ट्रासाठीं म्हणून ती आहे. सर्व राष्ट्राची याच भुमिकेवरून ती वागेल, काँग्रेस केवळ हिंदुची ही गोष्ट काँग्रेसनें कबूल करणें म्हणजे काँग्रेसनं स्वत:ची हत्या करुन घेणे होय. काँग्रेस मग मेलीच ! हिंदुमहासभा व काँग्रेस यांत मग फरक काय? काँग्रेस मरावी हाच तर सर्व जातीय पुढा-यांचा हेतु आहे. मरायचीच असेल तर काँग्रेस मरेल, परंतु ती ध्येयाला सोडणार नाहीं.

जिनांची पाकिस्तान-योजना तरी काय? ती व्यवहार्य तरी आहे का? पाकिस्तान-योजनेची स्पष्ट कल्पना त्यांनीं कधीं मांडली नाही. पाकिस्तान हें सर्व बाबतींत स्वतंत्र राष्ट्र होणार का? परंतु पंजाबला बंगाल जोडणार कसा? सरहृद प्रांत, सिंध प्रांत, पंजाब, बंगाल यांचें म्हणे पाकिस्तान बनवा. परंतु बंगाल का पंजाबला जोडलेला आहे? सरहृद प्रांतांत शेंकडो ९० मुसलमान आहेत. येथें म्हणतां येईल की हिंदु अल्पसंख्य आहेत. परंतु पंजाब व बंगालमध्यें मुसलमान शेंकडो ६५ तर हिंदु ४५ आहेत. याला का अल्पसंख्य म्हणावयाचें?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel