कधी पाहीन मी ते दृश्य बरें !

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद

तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते !
तूं म्हणालास, ' होय. मी त्या संघांत आहें. परंतु माझ्यावर रागावूं नका. माझी कींव करा.   माझी चूक मला आज कळली. तुमच्या व्याख्यानानें नवीन दृष्टि मिळाली. माझा एकांगीपणा गेला.'

तुझे ते शब्द ऐकून सध्दित झालों होतों. तुझा हात मी हातांत घेतला. तुझ्याकडे आशावादी दृष्टीनें मी पाहिलें. तुझ्या पाठीवरुन मी हात फिरविला व म्हटलें  ' वसंत, आतां माझ्या काँग्रेसच्या झेंडयाखालीं ये. तूं काँग्रेसचा हो. तिची सेवा कर; भक्ती कर. काँग्रेसची सेवा म्हणजे भारताची सेवा. भारताची पवित्र परंपरा जर कोणी चालवीत असेल, त्या परंपरेंतील चांगले घेऊन जर कोणी पुढें जात असेल तर ती काँग्रेस होय. भारताचा आत्मा जर कोणी ओळखला असेल तर तो काँग्रेसनें. भारतीय इतिहासांतील सोनेरी धागा हातीं घेऊन जर कोणी नवीन इतिहास घडवित असेल तर ती काँग्रेस होंय. '

वसंता, त्या सभेनंतर तुझी-माझी भेट परत झाली नाहीं. तुझा पत्ता मिळेना. परंतु तूं माझ्या डोळयांसमोर अनेकदा येत असस, आणि आज अकस्मात् पत्र मिळालें. जणूं हरवलेलें निधान सापडलें. पत्र वाचून किती आनंद झाला ! तुझी मूर्ति पुन्हां डोळयांसमोर आहे असें वाटलें. तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून दिलास, हें वाचून अपार समाधान झालें. भ्रामक जाळयांतून मुक्त झालास. डबक्यांतून बाहेर पडलास. मला भीति वाटत होती. हा दिलदार व उदार वृत्तीचा तरुण मुलगा जातीय चिखलांत फसतो की काय, अशी शंका मनांत येई. परंतु तुझी ती त्यावेळची कावरी-बावरी वृत्ति आठवून पुन्हां वाटे कीं हा तरुण सत्पथावर येईल. मी ईश्वरची प्रार्थना करीत असें कीं माझा वसंत संकुचित वृत्तीचा न होवो. देवानें का ती प्रार्थना ऐकली?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel