हरिजनांची दुर्दशा
अंमळनेर येथील पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. येथील गिरणी कामगार युनियनचे सेक्रेटरी श्री.वसंतराव भागवत वकील यांच्या घराजवळ दोन हरिजन लांकडें फोडीत होते. त्यांना तहान लागली होती. ते पाणी प्यावयास कोठें जाणार ? श्री.वसंतराव यांच्या दारांत ते आले व पाणी मागूं लागले. 'विहिरीवर बादली आहे. या, पाणी काढा व पोटभर प्या' असें वसंतराव त्यांना म्हणाले. ते हरिजन म्हणाले, 'असें कसें होईल रावसाहेब, आम्ही पाणी कसें काढूं ?' वसंतरावांनीं फिरून फिरून त्यांना सांगितलें कीं, 'पाणी काढा. हें माझें घर आहे. विहीर माझी आहे. तुम्हांस मनापासून सांगतों. आमच्या येथे भेद नाहीं. या.' परंतु ते हरिजन गेले नाहींत.
दुसरा अनुभव एरंडोल येथील साळवे गांवचा. सार्वजनिक आड आहे. प्रांतसाहेब तेथें गेले होते. त्यांना कळलें कीं, हरिजन त्या आडावर पाणी भरीत नाहींत. प्रांतसाहेब एकदोन चांभार बंधूंना म्हणाले, 'या, पाणी भरा, कोण तुम्हांला प्रतिबंध करतो तें बघतों. जा, दोर बादली घेऊन या.' ते चांभारबंधू गेले ते परत आले नाहींत. दुसर्याच्या हातीं निरोप पाठविला. तोहि अदृश्य झाला. प्रांतसाहेब स्वत: हजर राहून पाणी भरा असें सांगत होते, परंतु हरिजन आले नाहीत.
अंमळनेर येथें श्री.वसंतराव भागवत पाणी भरा असें सांगत होते. साळवें येथें प्रांतसाहेब सांगत होते. परंतु हरिजन पाणी भरण्यास कां धजले नाहींत ? कारण त्यांना इतर निर्दय सनातनी मंडळींची भीति वाटते. प्रांतसाहेब आंत आहेत, परंतु नेहमीं थोडेच तेथें राहणार ! रोज बसल्या उठल्या गावकर्यांशीं गांठ ! सनातनी मंडळी म्हणतील, 'त्यांनीं पाणी भरा सांगितलें म्हणून तुम्ही भरावें कीं काय ? त्यांनीं धर्माची मर्यादा सोडली म्हणून तुम्ही सोडावयाची कीं काय ?' हरिजनांनीं पाणी भरलें असतें तर 'तुम्ही म्हारडे माजलेत' असें सनातनी मंडळींनीं म्हटलें असतें. त्यांच्यावर बहिष्कार घातला असता. त्यांना कदाचित् मारहाणहि केली असती.
हरिजन भितात. सनातनी बंधूंनो ! हरिजनांस पाणी पिण्याचीहि मोकळीक न देऊन कोणता मोक्ष तुम्हांला मिळणार आहे ? तुमच्या विहिरीवर गाई, म्हशी पाणी पितात. त्यांच्यापेक्षां मनुष्य नीच झाला का ? हें पाप कोठें फेडाल ?
तृषिताय जलं यच्छेत् । हरेत् दीनस्य चापदम् ।
असा हा सनातन धर्म आहे. हरिजनांना माणसांप्रमाणें वागवावयास लागूं, त्याच दिवशीं आपण स्वराज्यास पात्र ठरूं. आपल्या बांधवांस गुलाम करणारा स्वत: चिरकाल गुलाम होऊन पडेल. आपल्या बांधवांची स्थिति पशुहून नीच करणारा जगांत स्वत: पशु होईल. सारें जग त्याच्या तोंडावर थुंकेल !
१८ एप्रिल, १९३८.