एके ठिकाणीं कांहीं शेतकरी म्हणाले, 'दादा शेतकर्याला कोणी नाहीं. आम्ही भूकंपांत कां गडप होत नाहीं ?' आम्हांला कोणी नाहीं, कोणी नाहीं, हे शब्द मी मरेपर्यंत विसरणार नाहीं. मी त्यांना म्हटलें, 'कांग्रेस आपली आई आहे. ती मुलांना पोटाशीं धरल्याशिवाय राहणार नाहीं. तिला जेवढें देतां येईल तेवढें ती देईल.' 'होईल तेव्हां खरें' ते निराशेनें म्हणत.
आमचे प्रिय आमदार, तसेंच जि. कां. कमिटीचे अध्यक्ष मंत्र्यांना भेटून आले असें कळतें. २६ तारखेच्या सभेला वर्किंग कमिटीचे दे. भ. शंकरराव देव हजर होते. म. प्रां. कां. चे अध्यक्ष दे. भ. केशवराव जेधे होते. ५० हजार शेतकरी त्यांनीं पाहिले. त्यांची कहाणी ते मंत्र्यांच्या कानावर घालतील का ? पूर्व खानदेशाला भरपूर भाकरी या वर्षी देववतील का ?
कांग्रेसमाता की जय हा मंत्र खानदेशाला आम्ही शिकविला. 'कांग्रेस माय बाप । जाळील सर्व ताप' हे चरण जनतेच्या मुखावर नाचविले. त्याची सत्यता आज आपत्तींत दिसून आली पाहिजे. कां. बद्दलचें जनतेंतील प्रेम त्यांना सहानुभूति मिळून वाढीव लागलें पाहिजे.
कांग्रेसच्या थोर मंत्र्यानों, तुम्ही अहोरात्र श्रम करीत आहांत. क्षणाचा विसावा नाहीं. जनतेची चिंता तुम्हांस सदैव लागलेली आहे. स्वार्थ तुम्हांला शिवत नाहीं. स्तुतीची तुम्हांला स्पृहा नाहीं; निंदेची भीति नाहीं. स्थितप्रज्ञाप्रमाणें तुम्ही कामाचे बोजे पार पाडीत आहात. खानदेशाच्या हजारों भुकी शेतकर्यांच्या वतीनें, खानदेशांतील उदार, दिलदार, भोळ्या व श्रध्दावान् शेतकर्यांचे वतीनें त्यांच्या मुलांबाळांच्या वतीनें साश्रु प्रणाम करून तुमच्या चरणीं प्रार्थितों कीं या वर्षी खानदेशांतील शेतकर्यास भरपूर सारासूट न मिळाली तर ती दु:खाची गोष्ट होईल. श्रध्दावान् मनुष्याची श्रध्दा एकदां भंगली म्हणजे काय राहिलें ? जनतेच्या मनांत केवळ निराशा निर्माण होणें हें इष्ट नाहीं. खानदेशी शेतकर्याची श्रध्दा रहावी, त्याच्या जीवनांत निराशेची अंधारी अमावास्या येऊं नये, यासाठीं सारासुटीची पौर्णिमा नसली तरी निदान शुध्द अष्टमी तरी येवो अशी प्रार्थना आहे.
एखादा धनिक उठतो व एकाद्या शाळा कॉलेजसाठीं १०।२० लाख रुपये देऊन टाकतो. मग खानदेशांतील १३ लाख जनतेची श्रध्दा टिकवण्यासाठीं कां. सरकार का उभें राहाणार नाहीं ? २०।२५ लाख ही महत्त्वाची वस्तु नाहीं. जनतेची श्रध्दा व आशा ही पृथ्वी मोलाची वस्तु आहे. कां.चे मंत्री या बाबतींत अधिकांत अधिक उदारपणा दाखवतील अशी आशा आम्ही बाळगावी का ? ज्या क्षणीं केवळ निष्करुण आंकडेबाजी दूर ठेवावी लागते, हिशोबी कृपणता दूर राखावी लागते, असा हा क्षण आहे. या क्षणाचें महत्त्व थोर मंत्री ओळखतील, या क्षणांतील सारा अर्थ स्वच्छपणें वाचतील असा श्रध्दाशील मनाला विश्वास वाटत आहे.
३० जानेवारी, १९३९.