आरसपानी नर्मदा
त्रिपुरी कांग्रेस नर्मदातीरीं होती. त्रिपुरीच्या जवळ नर्मदेचा एक अत्यन्त सुंदर देखावा आहे. त्रिपुरी कांग्रेसला गेलेल्या हजारों लोकांनीं तें भव्य दृश्य पाहिलें. भेडाघाटाजवळ हा देखावा आहे. मी व अमळनेरचा कांग्रेसप्रेमी मित्र शंकर दोघे एके दिवशीं एकदम हा देखावा पहावयास निघालों. आम्हीं आधीं ठरवलें नव्हतें. अकस्मात् ठरलें, अकस्मात् गेलों. प्रथम धुवाधारी या धबधब्याकडे आम्हीं गेलों. हजारों लोक तेथें जमले होते. कोणी संकल्पपूर्वक स्नानें करीत होते. कोणी स्तोत्रें म्हणत होते, तेथें जणूं महापर्वणीच होती. नर्मदेचा प्रवाह कृश होता. तो प्रवाह शेंकडों कर्वतींनीं जणूं कापून काढलेला होता. नर्मदेनें स्वत:ला जणूं स्वच्छ करण्याकरितां शेंकडों पाषाणमय साधनांनीं धुवून धुवून काढलें होतें. धबधबा फार उंच नाहीं. ३५।४० फूट फार तर असेल परन्तु काय मौज दिसते ! पिंजलेल्या कापसाची रास दिसावी तसा दिसतो. पाण्याची धार जोरानें खालीं आपटते व त्यांतून शुभ्र स्वच्छ फेंस बाहेर पडतो. जणूं पाण्यांतील निर्मळ आत्माच बाहेर प्रगट होत असतो. सूर्याचे किरण पडून सुंदर इंद्रधनुष्य दिसे. खालीं खूप खोल डोह झालेला आहे व त्यांत भोंवरे झालेले आहेत. एक दोन तरुण त्यांत पोहण्यासाठीं उड्या घालणार होते. एकानें कडेकडेला थोडी सुरनाळी मारली. दोन संत्रें बाहेर काढलीं. नर्मदेचा प्रसाद म्हणून लोकांनीं खाल्लीं. खालीं पाण्यांत खूप कपारी आहेत. दगड आहेत, कोठें अडकाल, आपटाल, भोंवरें आहेत, असें कळल्यावर ते तरुण आंत गेले नाहींत. शंकर व मी तेथें उभा होतों. इतक्यांत आम्हांला कोण बरें दिसलें ? अमळनेरचा चित्रकार नागेश खालच्या बाजूला शांत बसून देखावा रेखाटीत होता. आम्ही टाळी वाजविली. आणखी पाहूं लागलों तों खांमगांवच्या राष्ट्रीय शाळेंतील चित्रकला-आचार्य पंधे गुरुजी आणखी खालीं एका दगडी आसनावर बसून देखावा काढीत होते. त्यांच्याबरोबरचे विद्यार्थीहि आले होते. तेहि वह्या व पेन्सिली घेऊन स्केचिस करीत होते. हळुहळू ते सारे वर आले. नर्मदेमध्यें स्नानें करूं व मग फराळ करूं असें ठरलें. पंधेगुरुजींबरोबरचा छोटा बटू म्हणाला, 'ती तिकडे एक लहान धार पडत आहे, तिच्याखालीं आपण उभे राहूं चला.' मी प्रथम नाखूष होतों. पाय सरकला तर डोहांत पडेन अशी भीति वाटली. परंतु त्या लहान वीरानें हात धरला व माझ्या निर्जीव मनांत उत्साह आला. आम्ही हळुहळू उतरलों. पलीकडे धो धो धुवाधारा पडत होती. तिच्याशेजारीं या लहान धारेखालीं आम्ही गेलों. त्या धारेखालीं डोकें केलें. धाडधाड कोणी वरून बर्फाचे गोळे मारावे तसें तें पाणी डोक्यावर पडे. मी म्हटलें, 'माई नर्मदे, या डोक्यांतील सारी घाण काढ. जोरानें डोकें घांस. मार जोरानें थपडा.' पुन:पुन्हां मी माझें डोकें आईच्या त्या जीवनमद मारापुढें करीत होतों. पत्रींतील चरण मला आठवले.
"आई तूं मज मार मार'
मग माझी पाठ पुढें केली. आई जोरानें पाठ धुवूं लागली. पाठीवरील दोषांचे खळमळ ती दवडूं लागली. किती आनंद होत होता. आमचें पाहून दुसरेहि लोक तेथें येऊं लागले. म्हणून आम्हांला क्रीडा संपवणें भाग होतें. पंधे गुरुजी म्हणाले, 'येथें खरी स्फूर्ति आहे. या धारेखालीं डोकें धरणें म्हणजे विद्युत्संचार आहे.' आम्हीं वर आलों. पंधेगुरुजींनीं फराळाचें भरपूर आणलें होतें. आम्हीं दोघे त्यांत सामील झालों. इतक्यांत अमळनेरच्या मिलमधील कॅप्टन मल्हारी वगैरे उत्साही वीर दिसले. तेहि स्नानें करून आमच्यांत मिसळले. दगडाचे पाट मांडलेले होते, आम्ही फराळ केला. नंतर नर्मदेच्या किनार्यानें जावयाचें ठरलें. निघालों आम्हीं. छोटा वीर सर्वांच्या पुढें होता. आरसपानी पहावयास आम्हीं निघालों. कंगोरे कंगोरे सर्वत्र होते. पाय सोलूनच निघावयाचे. जातांजातां कांहीं कंटाळूं लागले. परन्तु लहान मुलें पुढें गेलीं. मीहि मग जोरानें निघालों. रेंगाळणारेहि मग आले. तों आम्हांला तिकडून प्रवाशांना नेणारी लाँच दिसली. अरे हीच ती दरी. आली दरी. संगमरवरी पाषाणांची दरी आली. 'महात्मा गांधी की जय' आम्ही जयजयकार केला. परन्तु खालीं उतरावयाचें होतें. कसें उतरणार ? कडा तुटलेला होता. परन्तु ठायींठायीं खांचा होत्या. त्यांना धरून उतरतां आलें असतें. आम्हीं पिशव्या खालीं फेंकल्या. हळुहळू सारे खालीं आलों. जेथपर्यंत स्टीमलाँच किंवा नांव येते तेथें आम्हीं बसलों होतों. पलीकडे ती पुढें दरी दिसत होती. आम्ही पाणी प्यायलों. तेथें प्रतिध्वनी फारच सुंदर ऐकूं येई. आजूबाजूस पाषाणांच्या नाना आकृति दिसत. पंधे गुरुजी म्हणाले, 'हें पहा दगडांतलें डिझाइन. किती सुंदर' मी म्हटलें, 'येथून पहा म्हणजे प्रचंड बुध्द किंवा महावीरं यांची मूर्तीच उभी आहे असें दिसेल. लेण्यांतील कल्पना अशाच मिळाल्या असतील.' आम्ही पुन्हां वर चढून आजूबाजूस संशोधन करीत होतों.