जातीजातींतील भांडणें, हिंदु-मुसलमान भांडणें, स्पृश्यास्पृश्य भांडणें, ब्राह्मण-ब्राह्मणेतर भांडणें, कुळ-सावकार भांडणें, मालक-मजूर भांडणें, सर्वत्र भांडणेंच भांडणें. हीं भांडणें आपण बंद केली पाहिजेत. त्यासाठीं उदारता जीवनांत आणली पाहिजे. गरिबांच्या जीवनांत तर अनंत उदारता आहे. शेतकरी, कामकरी, मजूर, बिचारे अहोरात्र धडपडून श्रमाचें सारें फळ सावकार, जमीनदार, कारखानदार यांच्या पुढें ठेवतात. त्यांनीं उदार होऊन या गरिबांचे संसार सुखाचे होतील असें करावें. या गरिबांच्या अंगावर नीट वस्त्र आहे कीं नाहीं, त्यांना रहायला नीट घर आहे कीं नाहीं, त्यांच्या मुलांना दुधाचा थेंब मिळतो कीं नाहीं हें पहावें. अशानें गुण्यागोविंदाचे संबंध वाढतात. सलोखा नांदतो. संप होत नाहींत, तंटे वाढत नाहींत. तुकाराम महाराजांनीं म्हटलें आहे,
थोडें आहे थोडें आहे । चित्त साहाय्य झालिया ॥
जर मन निर्मळ असेल तर ही कांहीं फार कठिण गोष्ट नाहीं. सर्वांचा संसार सुखाचा करण्यासाठीं जर आपल्या मनानें तयारी केली तर राष्ट्राच्या संसाराचें स्वरूप आतां एका क्षणांत बदलेल.
दिवाळीला आपण दिवे लावतों. सुंदर सुंदर रंगांच्या ज्योती पाहून दंग होतों. विजेचे दिवे किती गोड दिसतात. एक कळ दाबली जाते व हजारों घरांतून, दुकानांतून, कारखान्यांतून गंमतच गंमत दिसते. अरे हे बाहेरची दिवे लावणें यांतील अर्थ आहे का माहित ? प्रत्येक पेटवलेली ज्योत म्हणजे प्रत्येक जीवात्मा मला तिच्यांत दिसतो. लाखों लोकांच्या जीवनांच्या ज्योती मिणमिण कशा तरी टिकाव धरून असतात. त्या ज्योति केव्हां मालवतील यांचा नेम नसतो. दिवाळीचे दिवे लावणें म्हणजे लाखों कोट्यवधि दरिद्री लोकांची जाऊं का राहूं करणारी जीवनज्योत स्नेहप्रेमाचें तेल घालून पुन्हां तेजस्वी करणें हा अर्थ आहे. हे जीवनाचे दिवे पहा. तेथें तेल नाहीं, काहीं नाहीं. कसे टिकतील हे दिवे ? धुळ्याच्या तीन हजार कामगारांच्या घरचे सर्व जीवनाचे दिवे मालवत आले होते. श्री.प्रतापशेटजींना सद्बुध्दी सुचली. या दिव्यांना दिवाळीच्या आधीं थोडें तेल मिळूं लागलें. ही खरी दिवाळी. दिवाळीचा सण साजरा करणार्या माझ्या धनिक बंधूंनो ! तुमच्या हाताखालीं काम करणार्या, श्रमणार्या लाखों लोकांच्या जीवनाचे दिवे मंगल पेटत रहावेत, देशाच्या विराट् संसाराला शोभा रहावी, असें वाटत असेल तर त्यांना प्रेम द्या, सहानुभूति द्या, विजेची कळ दाबतांच बाहेरचे दिवे लागतात. सहानुभूतीची, खर्या आस्थेची, खर्या बंधुप्रीतीची, माणुसकीच्या सद्भावनेची कळ दाबतांच लाखो लोकांच्या जीवनाचे दिवे सतेज ठेवतां येतात. सर्वांच्या जीवनांत दिवाळी आणली तरच या बाहेरच्या दिवाळीला अर्थ !
काँग्रेसपत्राला अशी दिवाळी राष्ट्रांत साजरी व्हावी हा ध्यास आहे. अंतर्बाह्य प्रकाश यावा, स्वच्छता यावी, हें या पत्राचें ध्येय आहे. भांडणें वाढवावीं हें या पत्राचें ध्येय नाहीं. भांडणें मिटावीं व तीं मिटविण्यासाठीं दुसर्यांच्या जीवनाचा विचार सहानुभूतिपूर्वक आपण सर्वांनीं करावा असेंच या पत्राला सदैव वाटतें. धनिकांना मी रागारागानें या पत्रांतून लिहिलें असेल परन्तु त्याचा उद्देश एकच होता. त्यांच्या हृदयांत प्रेमाचा पाझर फुटावा. पाषाणांत आंत ओलावा असतो. वरून ओबडधोबड दिसणार्या खडकाच्या पोटांत झुळझुळ वाहणारे झरे असतात. परंतु ते बाहेर यावेत म्हणून सुरुंग लावावे लागतात, घणाचे घाव घालावे लागतात. म्हणून मी माझ्या लेखणीचे घाव श्रीमंतांच्या हृदयांतील झरे बाहेर पडावेत म्हणून घालीत होतों, आणि एकीकडे माझें कोमल मन कष्टी होत होतें.
दगडाच्या पोटांतील झरे दोन मार्गानीं बाहेर काढतां येतात. घणाचे घाव घालून किंवा मंजुळ मुरली वाजवून. श्रीकृष्णाची गोड गोड मुरली ऐकून शिळा पाझरूं लागत असें वर्णन आहे. तो गोड पांवा पाषाणांना पाझर फोडी. परन्तु ही दैवी कला कोणाला साधणार ? कोणी पांवा वाजवून पाषाणांस पाझर फोडील, तर कोणी घणाचे घाव घालून ते बाहेर आणील.
मला ही पांवा वाजविण्याची कला अद्याप येत नाहीं. महात्मा गांधींची मुरली पाषाणांस पाझर फोडते, मुसळांस अंकुर फोडते. परन्तु हें इतरांचें काम नव्हे. आम्हांला ही धन्य कला साधावयास अनन्त जन्म अजून लागतील. तोंपर्यंत आम्ही आदळ आपटच करीत राहाणार. परन्तु त्या आदळआपटीमध्येंहि स्वार्थ नाहीं. ही आमची अडाणी आदळआपट सर्वांच्या जीवनांत दिवाळी यावी म्हणूनच आहे, हें थोरांनीं लक्षांत घ्यावें.
२४ ऑक्टोबर, १९३८.