वृक्षसंवर्धन
एक काळ असा होता कीं, ज्या वेळेस हिंदुस्थानांत जंगलेंच जंगलें होतीं. त्या वेळेस आपले पूर्वज हातांत कुर्‍हाडी घेऊन जंगलें तोडावयास जात. 'पृथुपर्शवो ययु:' रुंद परशु हातांत घेतलेले आर्य निघाले असें वेदांत वर्णन येतें. जंगलें तोडून जमीन साफसूफ करून त्यांनीं ती लागवडीस आणली होती. जंगलें तोडणें जणूं त्या वेळचा राष्ट्रधर्म होता. कोणतेंहि धर्मकर्म असो. त्या प्रसंगीं होम हवा व होमासाठीं समिधा रानांतून आणल्या पाहिजेत. यांत हेंच तत्त्व दिसतें.

परंतु कर्तव्य हें काळाप्रमाणें बदलतें. एके काळीं जंगलें तोडणें हा धर्म होता. आज जंगलें लावून मंगल निर्माण करणें हा धर्म झाला आहे. हिंदुस्थानांतून झाडी तुटत चालली. त्यामुळें गांवांचें सौंदर्य व संपत्ति कमी होत आहे. पाऊस कमी होत आहे. जळण महाग व दुर्मिळ म्हणून शेतांत सोनें पिकविणारें शेण शेणीगोवरींच्या रूपानें चुलींत जात आहे. या सर्व गोष्टींचा राष्ट्रीय दृष्टया विचार झाला पाहिजे.

मुंबई इलाख्यांत कारवारच्या बाजूला अपार जंगल आहे. परन्तु मध्य व उत्तर भागांत जंगल कमी आहे. कारवारचें जंगल जर कांहीं मध्य उत्तर भागांत आणतां आलें तर बरें होईल ! पण तें अशक्य आहे. आपण येथेंच तें निर्माण केलें पाहिजे. काठेवाडांत जंगलांची लागवड केल्याशिवाय तेथील परिस्थिति सुधारणार नाहीं, पाण्याचें दुर्भिक्ष संपणार नाहीं, असें महात्माजींनीं परवां म्हटलें आहे.

गांवाला नदी हवी व वनराजी हवी. नदी गांवाला ओलावा देते. आमराई छाया देते. मुकीं जनावरें नदीचें पाणी पितात व उन्हांत छायेखालीं बसून रवंथ करतात. गुराखी त्या दाट छायेखालीं खेळतात. गांवांतील मुलेंमुली अशा राईंत जाऊन तेथें झोले बांधून झोंके घेतात व क्षणभर पांखरांच्या सुखाचा आस्वाद घेतात. एखादी सभापरिषद असली तर या हिरव्या मंडपांत भर दुपारींहि भरवतां येते.

ज्या मुलाला आईचा हात लागत नाहीं, तें मूल नीट वाढत नाहीं. मुलाच्या अंगावरून आईचा कोमल हात फिरला पाहिजे. म्हणजे त्या मुलाला बाळसें येतें. त्याला कळा चढते. गांवांचें असेंच. पूर्वी आपलीं गांवें गर्द झाडींत असत. कांहीं धीट घरें मधून डोकावत. मोठी सुंदर दिसत गांवें. परंतु आज खेडींपाडीं उदास, भगभगीत दिसतात. त्यांच्या तोंडावर तजेला नाहीं, रया नाहीं. याचें काय कारण ? आईचे हात दूर झाले. झाडें म्हणजे भूमातेचे जणुं हिरवे हिरवे हात. ज्या गांवांना हे हात कवटाळतात, ज्या गांवच्या डोक्यावर मातेचे मंगल हात आशीर्वाद देत असतात, त्या गांवांना आनंद व शांति लाभते. परंतु हे भूमातेचे बळकट परंतु कोमल असे हात आज खेड्यांभोंवतीं कोठें आहेत ?

असें म्हणतात कीं झाडें हवेंतील ओलावा ओढून आणतात. जेथें झाडें अधिक तेथें पाऊस अधिक. रवीन्द्रनाथांनीं एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं, झाडें म्हणजे भूमातेची प्रार्थना. झाडें म्हणजे भूमातेचे देवाला जोडलेले हात. पृथ्वीनें आपल्या लेंकरांसाठीं जी अंत:करणांत प्रार्थना केली ती झाडांच्या रूपानें वर आली. किती गोड कल्पना ! भूमातेचे हे जोडलेले हजारों हजार हात पाहून वरील विशाल आकाशाचें हृदय भरून येतें आणि त्याचें हृदय विरघळून खालीं या भूमातेला सस्यशामल करणारी जलवृष्टि होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel