सुंदर मनुष्य आणि मडकें
एक मनुष्य होता. तो अत्यंत सुस्वरूप होता. त्याच्यासारखा सुंदर पुरुष झाला नाहीं असें लोक म्हणत. आपल्या सौन्दर्याचा त्यास गर्व झाला. तो सर्वांना तुच्छ मानी.
फुलापेक्षां मी सुकुमार आहें, तार्यापेक्षां तेजस्वी आहें; असें तो म्हणे. त्रैलोक्यांत माझ्यासारखा सुंदर पुरुष असणें शक्य नाहीं, असें तो प्रौढीनें सांगत असे.
राजे लोकांना नाना प्रकारचे लोक पदरीं ठेवण्याचा शोक असतो. जें जें अपूर्व दिसेल त्याचा ते संग्रह करीत असतात. अत्यंत सुरूप, अत्यंत कुरूप, अति उंच, अति ठेंगणा, अत्यंत बुध्दिमान, अत्यंत अडाणी असे नमुने ते जमा करीत असतात. एक अजबखानाच जणुं ते तयार करतात.
त्या सुंदर पुरुषाला एका राजानें आपल्याजवळ ठेवलें. त्याला काम कांहीं नसे. राजाच्या पंक्तीला जेवावें, एवढेंच त्याचें काम. रहायला त्यास सुंदर बंगला राजानें दिला होता. खावेंप्यावें, हिंडावें, फिरावें एवढेंच त्याला माहीत होतें.
काम करणार्या लोकांचा तो फार तिटकारा करी. मातींत काम करणारे कुंभार, शेतांत काम करणारे शेतकरी, मळ वाहून नेणारे भंगी, रस्ते झाडणारे झाडू-सर्वांना तो तुच्छ मानी. 'माझ्या बोटांना कधींहि माती लागलेली नाहीं.' असें तो म्हणावयाचा.
एके दिवशीं तो फिरावयाला जात होता. तिकडून शेतांत काम करून एक शेतकरी येत होता. त्याचें अंग धुळीनें भरलें होतें. हा सुंदर पुरुष त्यास म्हणाला, 'माझ्या समोरून यावयाला लाज नाहीं वाटत ? तूं किती घाणेरडा, मी बघ किती सुंदर !'
शेतकरी म्हणाला, 'महाराज या तुमच्या सुंदर देहाला जर खायला मिळालें नाहीं तर त्याचें सौन्दर्य टिकेल का ? वेलींतील रस जर मिळाला नाहीं तर फूल टवटवीत दिसेल का ?
तो पुरूष म्हणाला, 'खाल्लें नाहीं तर सौंदर्य कसें टिकेल ? माझे डोळे खोल जातील, माझे गाल बसतील. मी भुतासारखा दिसूं लागेन. राजानें मला पाळलें आहे, म्हणून तर मी निश्चिंत आहे. माझें सौन्दर्य कायम रहावें म्हणून उत्कृष्ट अन्न राजा मला देतो.'
शेतकरी म्हणाला, 'जें अन्न तुमचें सौन्दर्य राखतें, तें अन्न उत्पन्न करण्यासाठीं आम्हांला मातीमध्यें खपावें लागतें, शेतें नांगरावीं लागतात, बी पेरावें लागतें. आम्ही असे मातींत काम करणार नाहीं तर सोन्यासारखें धान्य पिकणार नाहीं, सोन्यासारखी तुमची कांति टिकणार नाहीं. म्हणून आम्हांला तुच्छ नका मानूं.'
तो सुंदर पुरुष म्हणाला, 'तुझ्याजवळ बोलण्यांत अर्थ नाहीं. सौंदर्य म्हणजे काय तें तुला काय कळे. जा, नीघ येथून.' शेतकरी निघून गेला. हा गर्विष्ठ मनुष्य पुढें चालला.
वाटेंत एक कुंभार माती तुडवीत होता. तो सुंदर पुरुष त्यास म्हणाला, 'मी येत आहें तें तुला दिसलें नाहीं का ? असलें घाणेरडें काम माझ्यासमोर करायला तुला लाज नाहीं रे वाटत ?'