तें मडकें म्हणालें, 'बरोबर. तरी तें धान्य वाईट होत नाहीं. या धान्याला वास येतो का बघा ?'
सुंदर पुरुष म्हणाला, 'नाहीं हें चांगलें आहे.'

मडके म्हणालें, 'आमच्या पोटांत हें धान्य वर्ष वर्ष राहिलें तरी घाण होत नाहीं. आतां तें तुमच्या पोटांत एक दिवस ठेवून पहा. त्याची काय दशा होईल ? तुमच्या पोटांत तें असेंच चांगलें राहील का, खरें सांगा.'

सुंदर पुरुष म्हणाला, 'माझ्या पोटांत गेल्यावर त्याची क्षणांत घाण होईल.'
मडकें म्हणालें, 'मग तूं घाणेरडा का आम्हीं घाणेरडीं ? खरें सांग, खरें तें मानावयाचें ठरलें आहे.'

सुंदर पुरुष म्हणाला, 'मी घाणेरडा आहें.'
तें मडकें म्हणालें, 'आपण सारे घाणेरडेच आहोंत. आपण सारीं मडकीं आहोंत. कोणी कोणाला हिणवायला नको. परन्तु या मलिन मडक्यांना सुंदर होतां येतें. जें मडकें दुसर्‍याच्या उपयोगी पडतें, जें दुसर्‍याला प्रेमाचें अमृत देतें, जें मडकें सत्याची पूजा करतें, व सत्याची सेवा करितां करितां फुटून जाण्यासहि सिध्द असतें, तें मडकें थोर होतें, सुंदर होतें. त्या मडक्याचें सोनें होतें, त्या भंगुर मडक्यांतून अमृतत्व बाहेर येतें, दिव्य सौंदर्य प्रकट होतें. मातीच्या मडक्याचा सोन्याचा कलश होतो !'

तो सुंदर पुरुष म्हणाला, 'थोर मडक्यांनो ! तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुम्ही आधीं कधीं बोलत नाहीं. परंतु आज मला अमृतमय, रहस्यमय थोर वाणी ऐकविलीत. मी कृतार्थ झालों. मला नवीन डोळे तुम्ही दिलेत. सत्पंथ दाखविलात. मी या माझ्या मडक्याचें सोनें करण्यासाठीं झटेन. या घाणेरड्या मडक्याला सौंदर्यसिंधु बनवीन. सांगा, आणखी कांहीं थोडें सांगा.'

तें मडकें म्हणालें, 'भल्या माणसा ! जगांत कसें वागावें याचें एक सूत्र तुला सांगून ठेवतों. जगांत आपण जेव्हां जन्माला येतों, तेव्हां आपण रडत येतों, परंतु लोकांना आनंद होतो. आपला आत्मा या लहानशा मडक्यांत बध्द होऊन जन्मतो व रडतो. परंतु लोक पेढे वाटतात. आपण मरतांना याच्या उलट स्थिति व्हावी. या मडक्यांत राहूनहि मी जीवनाचें सोनें केलें. मातीचें मोतीं केलें असें मरतांना वाटून स्वत:ला आनंद झाला पाहिजे. आणि इतरांना रडूं आलें पाहिजे. असा हा सुंदर मनुष्य, गोड मनुष्य मरत आहे असें मनांत येऊन लोकांना रडूं येऊं दे. जनमतांना रडत आलों, मरतांना हंसूं दे; जन्मतांना इतर हंसले, त्यांना माझें मरण पाहून रडूं दे !'

सुन्दर पुरुष म्हणाला, 'किती गोड तुम्ही सांगतां' मला एखादी लहानशी प्रार्थना सांगा.

एक मडकें म्हणालें, 'भारतांतील एका महर्षीनें, मडक्यांत राहून विश्वाला कवटाळणार्‍या एका ऋषीनें, सुंदर व सरळ, साधी, टोपी, सुटसुटीत अशी एक प्रार्थना जगाला दिली आहे. ती ऐक.

तमसो मा ज्योतिर्गमय
असतो मा सत् गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
मला अंधारांतून प्रकाशाकडे ने; असत्याकडून सत्याकडे ने; मृत्यूकडून अमृताकडे ने. असे हे तीनच चरण आहेत. परन्तु त्रिभुवनमोलाचे आहेत !'

तो सुंदर मनुष्य त्या मडक्यांना प्रणाम करून ती प्रार्थना गुणगुणतच निघून गेला. त्या दिवसापासून त्याचें जीवन निराळें झालें. त्यानें आपल्या जन्माचें सार्थक केलें. त्याच्या मडक्याचें सोनें झालें. पूर्वी लोक म्हणत 'याच्यासारखा देखणा कोणी नाहीं.' आतां लोक म्हणतात, 'याच्यासारखा थोर व गोड कोणी नाहीं !'
३ एप्रिल, १९४०.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel