अमळनेरला किसान-कामगार कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. कांग्रेसमध्यें प्रखर वृत्तीचे व सौम्य वृत्तीचे असे भेद होत आहेत. प्रखर वृत्तीच्या लोकांना करूं लागला तर दुसर्‍यासहि करणें प्राप्त असतें. कांग्रेसमधील जहाल गटानेंहि एकत्र यावें. आपल्या चळवळीस एकसूत्रीपणा आणावा. आपला पक्ष बळकट करावा. यांत पाप वगैरे कांहीं नाहीं. स्वार्थत्याग सर्वांचाच आहे. आणि अमक्यानें अधिक स्वार्थत्याग केला एवढ्यावरून त्याच्या पाठीमागेंच जावें असें होत नाहीं. बॅ. सावरकरांहून कोणाचा त्याग अधिक आहे ? त्यांच्या पासंगासहि मोठेमोठे पुरणार नाहींत, मग आम्हां पामरांची कथा काय ? परन्तु म्हणून त्यांच्या झेंड्याखालीं गेलेंच पाहिजे असें नाहीं. त्याग मोठा असेल परन्तु ध्येय चुकीचें असणें शक्य आहे. या दृष्टीनें कांग्रेसमधील कांहीं लोक अधिक त्यागी, अधिक विरक्त व तपस्वी असले तरी एवढ्यानें त्यांचेंच सारें अनुकरणीय ठरेल असें नाही.

कामगार, किसान वगैरेंचे प्रश्न प्रखर होत आहेत. कर्जाचा प्रश्न, तहशिलीचा प्रश्न, खंडकरी बिल, वगैरे प्रश्नांवर कांग्रेसमधील कांहीं कार्यकर्ते मूग गिळून बसतात. दुसर्‍यांना हें पहावत नाहीं. हे दुसरे प्रखर लोक का स्वस्थ बसतील ? नाहीं बसणार. ते चळवळी करतील. त्यांत कांग्रेसचा द्रोह आहे असें मला वाटत नाहीं.

किसान, कामगार, विद्यार्थी, यांच्या संघटना करणार्‍यांनीं एक गोष्ट लक्षात ठेवणें जरूर आहे. किसानांत काम करणारे जे असतील त्यांच्या हातांत किसान पाहिजेत. कामगारांत कार्यकर्ते असतील, त्यांनाहि हाच विश्वास हवा. तसेंच विद्यार्थ्यांतहि काम करणार्‍यांस म्हणतां आलें पाहिजे. कांहीं पुढारी म्हणतात, 'आम्हांला रान उठवायचें आहे.' रान उठवणें सोपें, परन्तु जागृत वाघाला आंवरणें कठिण. सेनापति सांगेल तसें लष्कर वागेल तरच खरें बळ. किसान, कामगार, विद्यार्थी यांना चेतवणें सोपें आहे. परन्तु त्यांना लगामहि घालतां आला पाहिजे. उठा म्हटलें कीं उठतील, थांबा म्हटलें कीं थांबतील, अशी शिस्तीची बळकट संघटना व्हायला हवी.

या संघटनांत संयम हवा, शिस्त हवी; पोरकटपणा नको, अहिंसा हवी आणि सर्वांत महत्त्वाची वस्तु म्हणजे शेवटीं त्या कांग्रेसच्या लढ्याला उपकारक ठरल्या पाहिजेत. अमळनेरला या अनेक दृष्टींनीं विचार होईल अशी आशा आहे. अमळनेर काय करतें, काय ठरवतें इकडे महाराष्ट्राचें लक्ष आहे. ही जबाबदारी ओळखून सारे वागतील अशी मी आशा करतों.
२६ डिसेंबर, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel