ही कुरबानीची चाल कशी पडली ? अरबस्थानांत एक थोर संत झाला. एकदां देवदूत देवाला म्हणाले, 'देवा तुझा थोर भक्त कोण ?' देव म्हणाले, 'अब्राहम.' देवदूत म्हणाले, 'कशावरून ?' देव म्हणाला, 'मी मागेन तें तो मला देईल.' देवदूत म्हणाले, 'प्रत्यक्ष परीक्षा घेऊन पहा.' देव म्हणाला, 'बरें.'

देव अब्राहमच्या स्वप्नांत आला व म्हणाला 'बेटा, तुला जी वस्तु सर्वांत प्रिय असेल ती दे.' सकाळीं अब्राहम उठला व मनांत विचार करूं लागला. कोणती बरें वस्तू त्याला प्रिय होती ? अब्राहमची एक उंटीण होती. ती सर्वांत त्याला प्रिय होती. त्यानें ती उंटीण देवाला देण्याचें ठरविलें. उंटिणीची त्यानें कुरबानी केली. परंतु पुन: रात्रीं देव स्वप्नांत आला व म्हणाला 'गड्या, उंटिणीपेक्षांहि दुसरी वस्तु तुला प्रिय आहे. ती मला दे' सकाळी अब्राहाम पुन: उठून विचार करूं लागला. तो म्हणाला, 'माझा मुलगा मला प्राणापेक्षांहि प्रिय आहे. देवाला तो देतों.' अब्राहम आपल्या मुलाचा बळी देणार, इतक्यांत देवानें त्याचा हात धरला. देव म्हणाला 'गड्या, तूं परीक्षेंत उतरलास, तूं खरा भक्त.' देवदूतांनीं जयजयकार केला.

परमप्रिय उंटीण ज्या दिवशीं अब्राहामनें दिली, तो दिवस कुरबानीचा म्हणून मुसलमान पाळतात. पुढें मुसलमान हिंदुस्थानांत आले. येथें फार उंट नाहींत. येथें गाई. येथें गाय सर्वांना प्रिय म्हणून येथील मुसलमान गायीची कुरबानी करूं लागले. हिंदूंचा द्वेष म्हणून नव्हे तर गाय प्रिय म्हणून ही पध्दत सुरू झाली. परंतु पुढें हिंदूंना वाटूं लागलें कीं, गाय मुद्दाम मारतात आणि मुसलमानांसहि ही गोष्ट माहित नसल्यामुळें हिंदूंना दुखविण्यासाठीं गाय मारण्यांत त्यांना धर्म वाटूं लागला.

ईश्वराला रक्ताची तहान नाहीं. आपल्या हृदयांतील कामक्रोधांची कुरबानी देवाला द्या. म्हणजे हृदयांत शांति येईल.

आपण हिंदु-मुसलमानांनीं परस्पराचीं मनें ज्या ज्या गोष्टींनीं दुखवतील त्या गोष्टी वर्ज्य कराव्या. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांति व हिंदुधर्मातहि प्रत्येक मंत्राचे शेवटीं शांति: शांति: असें म्हणतात. आपले पूर्वज या मार्गानें जाऊं पहात होते. परकी सत्तेनें आपणांत पुन्हां झगडे उत्पन्न केले व आपण त्याला बळी पडत आहोंत. हिंदु-मुस्लीम ऐक्य ही हिंदुस्थानच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. थोर पुढारी प्रयत्न करीत आहेत. आपणहि लहानथोर नम्रपणें त्या प्रयत्नांत सामील होऊं या.                                            २ मे, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel