अहिंसा

अहिंसा माझ्या जीवनाचा आधार आहे. अहिंसेकडे माझी लहानपणापासून वृत्ति आहे, कल आहे. कांग्रेसमध्यें माझ्या अहिंसक स्वभावाला वाढावयास वाव होता म्हणून मी कांग्रेसचा भक्त बनलों. धर्ममय भावनेनें मी कांग्रेसचा उपासक बनलों. ३० सालीं धुळें जेलमध्यें असतांना दे. भ. नानासाहेब ठकारांनीं मला विचारलें, 'तुम्ही सुटल्यावर काय करणार ?' मी म्हटलें, 'प्रेमधर्माचा, सत्यधर्माचा प्रचार करीन.' ३२ सालीं पू. विनोबाजींजवळ मी धुळें जेलमध्यें म्हटलें, 'मी हातांत झाडू घेऊन गांवोगांव फिरत राहीन. दिवसा सफाई करावी, रात्रीं भजन प्रवचन करावें, रामनाम मुखानें म्हणावें. मी संस्था, आश्रम यांत राहूं शकणार नाहीं. तेथें माझा जीव गुदमरेल' पू. विनोबाजी हंसून म्हणाले 'असा मनुष्य आमच्याकडे आला नाहीं तरी आम्ही त्याच्याकडे जाऊं.'

माझी अशी ही वृत्ति आहे. स्पर्धाक्षेत्रापासून मी दूर राहातें. अधिकाराची जागा मिळावी वगैरे स्वप्नांतहि माझ्या मनांत विचार येत नाहीं. परंतु अहिंसक वृत्तीचा असून मी कम्युनिस्ट लोकांशीं मैत्री कशी ठेवतों याचें कांहींना आश्चर्य वाटतें.

मला अशी श्रध्दा आहे कीं, ज्याच्या हृदयांत भूतदया आहे तो कम्युनिस्ट असलाच पाहिजे. महात्माजी अहिंसक साम्यवादी आहेत. मी कम्युनिस्टांशीं सहकार्य करतों म्हणजे त्यांच्या हिंसेशीं करतों असें नाहीं. कम्युनिस्ट केवळ अहिंसा मानीत नाहींत. अहिंसेनें कार्य झालें तर त्यांना पाहिजेच आहे. परंतु हिंसा ते अंती वर्ज्यच मानतील असें नाहीं. परंतु माझा हा स्वभाव नाहीं. अहिंसामय माझी वृत्ति आहे. मी अंमळनेरच्या थोड्या दिवसांपूर्वी भरलेल्या सभेंत सांगितलें, 'मी जर मुंबईत काम करणारा असतों व कामगार दगड मारीत आहेत असें मला कळतें तर त्यांच्या दगडांसमोर मी आधीं उभा राहिलों असतों. माझें डोकें फुटल्यावर मगच मिलवर दगड त्यांना मारतां आला असता. अंमळनेरचे कामगार जर दगड कधीं मारूं लागले तर त्यांना आधीं मला मारावें लागेल.' हा माझ्यांत व कम्युनिस्ट मित्रांत फरक आहे.

गांधीवादी व साम्यवादी यांच्यांतील मी एक लहान दुवा आहें. कम्युनिस्टांना खड्यांप्रमाणें मी वगळणार नाहीं. त्यांच्या हिंसेसमोर मी माझी अहिंसा नेऊन उभी करीन. भाई डांगे एकदां मला म्हणाले, 'गुरुजी, आमच्यावर टीका करावयाची तुम्हांला मुभा आहे.' ते माझ्यापासून सर्वच त्यांचा कार्यक्रम अपेक्षीत नाहींत.

किसान व कामगार पिळले जात आहेत हें कोणीहि कबूल करील. किसानांची करुण कहाणी ऐकून शहारे येतात. तुम्ही पोटाला पोटभर मिळवण्यासाठीं उभें राहिलें पाहिजे. परंतु अहिंसेचा मंत्र घेऊन उभे रहा असें मी त्यांना सांगेन. या हिंदुस्थानांत अहिंसेशिवाय तरणोपाय नाहीं. हिंदुस्थान म्हणजे एक प्रचंड खंडच आहे. नाना धर्म नाना पंथ; नाना जाति नाना भेद; नाना भाषा नाना रूढी; अनंत प्रकारचा इतिहास; नाना प्रांत; स्पृश्यास्पृश्य, हिंदुमुसलमान; अशा या प्रचंड देशांत एकदां हिंसा सुरू झाली तर ती कोठें थांबेल याचा नेम नाहीं. शिवाय हिंसा ही संपूर्ण जनतेची शक्ति असूं शकत नाही, हिंसा कांही लोकच करूं शकतात. हिंसेनें मिळालेली शक्तिहि त्यांच्याच हातीं राहाते. ती बहुजन समाजाच्या कल्याणासाठींहि असूं शकेल. परंतु ती सत्ता जनतेची नव्हे. खरी लोकसत्ता स्थापावयाची असेल तर अहिंसेनेंच स्वराज्य स्थापूं या.

परन्तु या तात्विक वादविवादांत मी शिरूं इच्छित नाहीं. हिंसा योग्य कीं अयोग्य हाहि प्रश्न मी दूर ठेवतों. ती योग्य ठरली तरीहि मला पेलणार नाहीं. त्रिचनापल्ली तुरुंगांत एका कम्युनिस्ट मित्राजवळ मी बोलत होतों. त्यानें विचारिलें, 'उद्यां हिंसेनें स्वराज्य मिळवावयाचें झालें तर' मी त्याला म्हटलें, 'कदाचित् मी गोळीबारासमोर उभा राहीन; परन्तु गोळी घालूं शकणार नाहीं. तुम्ही सांगतां तशी परिस्थिति आली तर मी दूर राहीन व खेड्यांत स्वच्छतेचें काम करीत जाईन, लहान मुलांच्या नाकांचा शेंबूड काढीत जाईन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel