संस्थानिक व ब्रि. सरकार लुटारूपणा सोडावयास तयार नाहींत. जनता तर अधीर होत चालली. अहिंसात्मक लढा करावयाचा तर विधायक सेवेस सर्वांनीं वाहून घेऊन अहिंसक शक्ति वाढविली पाहिजे. परन्तु इतका धीर आतां नाहीं. धीर नाहीं म्हणजे अधिक अहिंसा आचरण्यांत आणण्याची इच्छा नाहीं किंवा शक्यता नाहीं. आज २० वर्षे जी कांहीं अहिंसा आम्ही दाखविली तिच्याहून अधिक आम्हांपासून अपेक्षूं नका असें जनता कदाचित् म्हणेल.
मग उपाय काय ? अधिक अहिंसा शक्य नसेल, पेलत नसेल तर काय करावयाचें ? गुलामगिरी तर सर्वांत त्याज्य. महात्माजींनीं अनेक वेळां लिहिलें आहे 'अहिंसेनें नसेल स्वतंत्र होतां येत तर हिंसेनें व्हा. परन्तु गुलाम राहूं नका.' अहिंसेनें स्वराज्य मिळवावें असें त्यांना वाटतें. हा प्रयोग कोठें शक्य असेल तर भारतांतच शक्य आहे असें त्यांचें हृदय सांगतें. परन्तु भारतीय जनता हा प्रयोग करतांना थकली असेल तर ?
अहिंसा वा हिंसा कोणताहि मार्ग घेतला तरी त्यात संघटणा हवी. व्यवस्थितपणा हवा. आज देशांत चळवळ सुरू झाली तर कांहीं ठिकाणीं अत्याचार होतील. परन्तु असे असंघटित अत्याचार काय कामाचे ? अत्याचारानें, हिंसेनें स्वराज्य मिळवावयाचें असेल तर त्यांत एकसूत्रीपणा आणला पाहिजे. महात्माजी म्हणतात, 'जर अधिक अहिंसा शक्य नसेल, तर राष्ट्रानें हिंसेसाठीं तयार झालें पाहिजे. मला जर अहिंसक लढा करून हिंसेपासून राष्ट्र वांचवतां आलें नाहीं तर तें हिंसेच्या वणव्यांत, रक्तपातांत सांपडल्याशिवाय राहणार नाहीं.'
महात्माजींचा ब्रि. सरकारला हा स्पष्ट इशारा आहे. त्याप्रमाणें राष्ट्रालाहि आहे. असंदिग्धपणा सर्वांत वाईट. हिंदुस्थानला अधिक अहिंसा शक्य नसेल तर तसें ठरविलें जावें. कांग्रेसनें विचार करून आपलें क्रीड बदलायचें असेल तर बदलावें. मुंबईस सुभाषचंद्र आपल्या भाषणांत म्हणाले होते, 'कांग्रेसचें क्रीडहि बदलून घेण्यासाठीं आम्हीं खटपट करूं.' महात्माजी राष्ट्रास नक्की काय तें एक करा असें सांगत आहेत. मागेंहि त्यांनीं असाच इषारा दिला होता, या वेळेस पुन्हां दिला आहे. एकदां आचार्य कृपलानी म्हणाले होते कीं, 'अहिंसेच्या साधनांनीं अत्यंत निष्ठा व अत्यंत श्रध्दा ठेवून महात्माजी शेवटपर्यंत प्रयोग करतील. परन्तु जर त्यांना असें दिसलें कीं, अत:पर अहिंसा शक्य नाहीं तर ते दुसर्या कोणीहि हिंसा अवलंबिली नसेल इतकी ते अवलंबावयास तयार होतील, जें हातीं घेतील तें महात्माजी अर्धवट घेत नाहींत.'
उद्यां महात्माजी काय करतील हा प्रश्न नाहीं. अहिंसेचा उपाय शोधण्यांत ते सध्यां मग्न आहेत. राष्ट्राची कोंडी फोडावयास लढा लवकरच कोणता तरी केला पाहिजे असें त्यांना वाटत आहे. हा शेवटचा महान् प्रयोग केल्याशिवाय ते राहणार नाहींत. म्हणून सध्यां सर्वांनीं शांत-गंभीर रहावें. कवि रवींन्द्रनाथ टागोर म्हणतात, 'शंकराची समाधि भंगाल तर प्रलयकाल ओढवेल. महात्माजींना शेवटची देणगी अद्याप राष्ट्रास द्यावयाची आहे. त्यांची चिंतना चालू आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा व ते जें सांगतील तें करावयास सिध्द रहा.'
रवींन्द्रनाथांनीं भारतीयांस गंभीर उपदेश दिला आहे. संस्थानिकांस व साम्राज्यसरकारास कोण देणार ? आज जगांत भीषण परिस्थिति आहे. इंग्लंडला हिंदुस्थान कायमचें शत्रु करून फायदा नाहीं. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊन मित्र करणें यांतच ब्रिटिशांचें हित आहे. 'परन्तु विनाशकाले विपरीत बुध्दि' हा नियम आहे. ब्रि. सरकारला त्यांच्या देशांतील जगविख्यात लेखकानें पुष्कळ वर्षांपूर्वी धोक्याची सूचना दिली आहे. बर्नार्ड शॉ यानें एका प्रस्तावनेंत स्पष्ट सांगितलें आहे. 'ब्रि. साम्राज्य सरकारनें साम्राज्यांतील गुलामगिरी दूर करावी, असंतोष वाढूं देऊं नये. जुलूम नाहींसा करावा. परन्तु शांतपणें प्रश्न सुटूंच नयेत, अहिंसेनें प्रश्न सुटूंच नयेत असें ब्रि.सरकारला वाटत असेल तर ? तर मग त्यांची इच्छा पुरी केली जाईल. ब्रिटिशांना रक्तच पाहिजे असेल तर तेंहि मिळेल !'
महात्माजींसारखा युगपुरुष शांतीचा अनन्त अमृतकुंभ हातीं घेऊन रक्ताळ जगांत उभा राहिला आहे. शॉ व रवींन्द्रनाथ इंग्लंड व हिंदुस्थान यांना गंभीर इषारा देत आहेत. भारताचें भवितव्य कोणतें असेल बरें ? जगाच्या दहा हजार वर्षांच्या इतिहासांत कधीं झाला नव्हता अशा विशाल प्रमाणावर अहिंसेचा प्रयोग आफ्रिकेंत व हिंदुस्थानांत आजवर केला तोच प्रयोग अधिक उत्कटतेनें, शांतपणें व गंभीरपणें त्यांच्या दिव्य नेतृत्वाखालीं करून भारतवर्ष मोक्ष मिळवील का ? खरी अहिंसक क्रांति करून दाखवील का ?'
भारतभाग्य विधात्याला माहीत !
वर्ष २, अंक १५.