कांग्रेसची दृष्टी

चाळीसगांव तालुक्यांतील कांग्रेसविरोधी कांहीं उमेदवारांनीं पत्रकें काढलीं आहेत. एका पत्रकांत सह्या करणारे म्हणतात 'कांग्रेसनें श्री. केशवराव पाटील यांना कां उभें केलें ? हे कालपर्यंत कांग्रेसला विरोध करीत होते. श्री. वाडेकरांच्या निवडणुकीच्या वेळेस ते विरोधीच होते. अशांना कांग्रेसनें कां तिकीट द्यावें ? तसेंच चाळीसगांवचे सावकार श्री. हरिशेट वाणी यांनाहि कां तिकीट मिळावें ? सावकार तर माना कापतो. पिळून पिळून व्याज घेतो. अशांना कांग्रेसनें जवळ कां घ्यावें ? कांग्रेसनें अशांना उभें केलें नसतें तर आम्हीहि उभे राहिलों नसतों. बिनविरोध निवडणुकी झाल्या असत्या.

कांग्रेसची भूमिका मी मागें एकदां समजवून देण्याचा प्रयत्न केला होता. कांग्रेसनें आपले दरवाजे बंद केलेले नाहींत. कांग्रेस सर्वांना जवळ घेण्यास तयार आहे. अजामीळ कालपर्यंत पापी होता. परन्तु आज माझें नांव घेत आहे, मी त्याचा उध्दार करीन असें भगवान् म्हणाले. इंग्रजींत एक म्हण आहे. 'संतांना भूतकाळ असतो. पाप्याला भविष्यकाळ असतो.' सर्वांना सुधारण्याची मोकळीक आहे. श्री. हरिशेट वाणीं निष्ठुर सावकार असतील. त्यांना चांगले सावकार आपणांस बनवायचे आहेत ना ? त्यांना आपल्या कांग्रेसच्या झेंड्याखालीं घ्या. भडगांव पेटयांतील गोंडगांव वगैरे गांवची वाणी सावकार मण्डळी कांग्रेसवर रागावली आहे. कांग्रेस कर्जतहकुबी देते, सावकारी नियंत्रणबिल आणते, म्हणून ते शिव्याशाप देत आहेत. चाळीसगांवचे हरिशेट वाणी असें न करितां कांग्रेसच्या तिकिटावर उभे राहात आहेत. कांग्रेसच्या तिकीटावर उभें राहणें म्हणजे थोडीफार माणुसकी अंगीं येणें, हरिशेटांना आपण कायमचे दूर ठेवूं तर ते कसे सुधारणार ? त्यांना होमकुण्डांत ओढलें पाहिजे. त्यांच्या कानांत कांग्रेसचा हा मंत्र ओतला पाहिजे. त्यांना चांगले बनविण्याची खटपट आपण केली पाहिजे.

जसे हरिशेटवाणी यांच्या बाबतींत तसेंच श्री. केशवरावांचे बाबतींत. महाराष्ट्रांत व अन्यत्र पूर्वीचे शेंकडो कांग्रेसविरोधक आज कांग्रेसच्या झेंड्याखालीं येऊन सेवा करीत आहेत. कर्नाटकांतील कट्टे कांग्रेस-विरोधी श्री. अंगडी आज कांग्रेसच्या निशाणाखालीं आहेत. परवां अंगडी स्वयंसेवकांबरोबर रस्ता खणीत होते ! श्री. अंगडी एका व्याख्यानांत म्हणाले, 'सहा महिन्यांपूर्वी माझा पुनर्जन्म झाला ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रकार्यांचें ज्ञान होण्यास व दृष्टि येण्यास मला इतका विलंब लागला. ज्या गंगाधररावांना मी शत्रु समजत होतों, त्यांना मी आतां गुरु मानतों. माझा पूर्वींचा मार्ग चुकला असें मला कळून आलें आहे. एक प्रकारचें धैर्य माझ्या मध्यें आज आलें आहे.'

आपले सर्वांचे याच जन्मांत असे अनेकदां पुनर्जन्म होत असतात. नदी का नेहमींच वाकडी जाते ? नाहीं. म्हणून आपण कालपर्यंत अमुक असा वागत होता एवढ्यामुळें त्याच्या नवीन स्वीकारलेल्या ध्येयाबद्दल अविश्वास दाखवूं नये. श्री. केशवराव कालपर्यंत विरोधी असतील. परंतु आज आपल्या झेंड्याखालीं जबाबदार उमेदवार म्हणून उभे आहेत याचा आपणास उलट आनंद वाटला पाहिजे. कांग्रेसचा वाढता गोतावळा, वाढता जय पाहून नाचलें पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel