महाराज, हा तुमचा देह. म्हणजे तरी एक मडकेंच आहे. जरी सुंदर नीटनेटकें परन्तु कांहीं झालें तरी मडकेंच !' दुकानदार शांतपणें म्हणाला, 'रागावलेत तरी सत्य तें सत्यच. तुम्हांला खुष करण्यासाठीं मी खोटें कसें सांगू ? राजाला जाऊन सांगितलेंत तरी मला भीति नाहीं. मी त्या पंडिताला पटवून देईन. तुम्हीं मडकें आहांत, आपण सारीं कच्चीं पक्कीं मडकीं आहोंत, हें राजाला माहित आहे. हें मडकें केव्हां फुटेल याचा नेम नाहीं. मनुष्य मेला म्हणजे त्याच्या पुढें आपण मडकें धरतों. यांतील अर्थ हाच. तें मडकें लोकांना सांगत असतें : ऐट नको मारूं. तुम्ही मातीचीं मडकीं आहांत. आज ना उद्या फुटाल व मातींत मिळाल. मृताच्या पुढें मडकें धरतात तें तुम्ही पाहिलें नाहीं वाटतें ! रागावूं नका. या फुटणार्या मडक्यांत राहूनहि न फुटणारा व न तुटणारा असा तो अखंड परमात्मा जोडतां येतो. तें तुच्छच असतें असें नाहीं.'
सुंदर पुरुष म्हणाला, 'तूं तर सर्वांहून ताण केलीस. तुझ्या अकलेचे तारे तुटूं लागले. माझ्या सौंदर्याला मडकें म्हणतोस ? आणि पुन्हां तें सिध्द करूं पाहतोस ?'
दुकानदार म्हणाला, 'मोठे म्हणतात तें मी म्हणतों. राजाच्या पदरीं असलेले ते गवयी एक गाणें म्हणतात. तें कोणा एका साधूनें केलेलें गाणें आहे. त्यांत पुढील चरण आहे :
मट्टी आटावन मट्टी बिछावन, मट्टीसे मिल जाना होगा ।
इस तन धनकी कौन बढाई, देखत नयनोमें मट्टी मिलाई ॥
'थोर थोर लोक असें म्हणतात--म्हणून आम्ही असें म्हणतों. मोठयांचें ऐकायचें नाहीं तर कोणाचें ?'
तो सुन्दर पुरुष म्हणाला, 'मी मडकें ? तूं एक मडकें व मीहि मडकें तुझी माझी बरोबरी करतोस ?'
दुकानदार म्हणाला, 'तुम्ही फार तर उंची मडकें. मी साधा लोटा तर तुम्ही उंची सुरई, म्हणजे झालें.'
तो सुन्दर पुरुष म्हणाला, 'मी का सुरई, मी का बरणी ?'
एकदम आवाज आला, 'मडक्यापेक्षांहि तूं तुच्छ आहेस. अरे घमेंडखोरा ! तूं आमच्यापेक्षां शतपटीनें घाणेरडा आहेस.'
तो सुंदर पुरुष पाहूं लागला. कोण बोलतें त्याला समजेना. 'अरे, असा वेड्यासारखा काय बघतोस ? मूर्खा जरा इकडे ये. आम्ही मडकीं आधीं होतां होई तों बोलत नाहीं. परन्तु तूं मानवी मडकें फारच बेतालपणें बोलूं लागलास. तें आम्हांला सहन होईना.' तीं दुकानांतील मडकीं बोलूं लागलीं.
सुंदर पुरुष म्हणाला, 'काय मी तुमच्या पेक्षां घाणेरडा आहें ?'
त्या मडक्यांतील प्रमुख व पोक्त मडकें म्हणालें 'हो, तूं आमच्यापेक्षां घाणेरडा आहेस.'
सुंदर पुरुष म्हणाला, 'सिध्द करा. नाहीं तर तुम्हांला या क्षणीं फोडून टाकतों. तुमचे तिळ तिळ तुकडे करतों. गांवांत एक मडकें ठेवूं देणार नाहीं. राजाला सांगून राज्यांतील सार्या मडक्यांचीं मुंडकीं उडवायला लावीन. काय समजलांत ? सार्या मडक्यांवर सूड उगवीन. कर, सिध्द कर.'
तें वृध्द व जुनें मडकें म्हणालें, 'मी सिध्द करीन, परन्तु तूं ऐकलेंस तर. जें खरोखर दिसेल ते मानशील का ?'
सुंदर पुरुष म्हणाला, 'अलबत. जें खरें आहे तें मानलेंच पाहिजे.'
तें मडकें म्हणालें, 'माझ्यामध्यें हें धान्य आज सहा महिने झालें, ठेवलेलें आहे. ही गोष्ट तुम्हांला माहित आहे ?'
सुंदर पुरुष म्हणाला, 'वर्ष वर्ष सुध्दां ठेवतात.'