महाराष्ट्रा ऊठ !

जगांतील परिस्थिती झपाट्यानें बदलत आहे. स्पेनचें लोकसत्तात्मक सरकार त्रस्त झालें आहे. त्यानें जाहीर केलें कीं जर आमच्या शहरांवर इटलीच्या मदतीने बंडवाले वैमानिक हल्ले करतील तर इटलीच्या शहरांवरहि आम्ही वैमानिक हल्ले करूं. मुसोलिनीच्या रोम शहरावर बाँब टाकूं. स्पॅनिश लोकांच्या या घोषणेला मुसोलिनीच्या सरकारनें मगरूरपणाचें उत्तर दिलें आहे. 'स्पॅनिश सरकार जर इटलीवर बाँब टाकील तर त्याला शब्दांनीं नव्हे तर तोफेच्या गोळयांनीं आम्ही उत्तर देऊं. किती दिवस जगावयाचें याची विवंचना रात्रंदिवस करणार्‍या स्पॅनिश सरकारला मग घटका पळें मोजावीं लागतील.' इटली व जर्मनी यांची स्पॅनिश बंडखोरांस मदत आहे. जर्मनीनें आस्ट्रिया खाल्ला आहे. इटलीनें स्पेन खावा याला जर्मनीची सहानुभूति आहे. अशा रीतीनें फ्रान्सचा सर्व बाजूंनीं कोंडमारा करण्याचा हा डाव आहे. फ्रान्स इंग्रजांच्या स्वार्थी व नेभळट धोरणामुळें स्पेनला तितकी मदत करूं शकत नाहीं. फ्रान्स व इंग्लंडला युध्दांत ओढण्यासाठीं जर्मनी व इटली तयार आहेत. परंतु आपलें बळ वाढेपर्यंत इंग्लंड सारे अपमान पोटांत घालीत आहे. इंग्लंडची तयारी झाली म्हणजे युध्दाचा वणवा पेटेल. फ्रान्सचा फारचा कोंडमारा होत आहे. फ्रान्सला इंग्लंडची मैत्री तोडतां येत नाहीं. रशियाशीं तह केलेल्या फ्रान्सबद्दल तितकीशी सहानुभूति इंग्लंडला नाहीं. रशिया व इंग्लंड यांच्यामध्यें फ्रान्स लोंबकळत आहे.

जगांत युध्दाचा वणवा पेटल्याशिवाय रहात नाहीं. त्या वेळेस हिंदुस्थानांत प्रबळ संघटना हवी. आज सारी शक्ति संघटना करण्यांत ओतली पाहिजे. तिकडे संयुक्तप्रांतांत पहा. महान् संघटना त्यांनीं आरंभिली आहे. पांच लाख काँग्रेसचे स्वयंसेवक ते तयार करणार आहेत. कशी आहे प्रतिभा, केवढें आहे संकल्पबळ ! अचाट योजना हातीं घ्याव्या व त्या पार पाडण्यासाठीं मरणांतिक श्रम करावेत. संयुक्तप्रांत काँग्रेस कमिटी एक काँग्रेसचें वर्तमानपत्र सुरू करणार आहे. हें वर्तमानपत्र विमानद्वारा सर्वत्र पाठविलें जाईल. गांवोगांव अंक टाकले जातील. अशा रीतीनें विचारप्रसार व संघटना या दोन्ही कामांस संयुक्त प्रांतानें हात घातला आहे.

अशी संघटना आपल्याकडे कधीं होणार ? संयुक्तप्रांतांत ५ लाख स्वयंसेवक, तर महाराष्ट्रांत एक लाख झाले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानें दहा दहा हजार स्वयंसेवक उभे केले पाहिजेत. प्रत्येक तालुक्यानें एक हजार स्वयंसेवक तयार केले पाहिजेत.

ही का अशक्य गोष्ट आहे ? कांहींहि अशक्य नसतें. तालुक्यांच्या मुख्य गांवीं २५० स्वयंसेवकांचें पथक हवें. तालुक्यांत ४०।५० तरी मोठीं गांवें असतात. त्या गांवांतून कोठें दहा, कोठें वीस असे स्वयंसेवक तयार केले पाहिजेत. स्वयंसेवक तयार करण्यासाठीं शिक्षक हवेत. एकेका गांवाला पंधरा पंधरा दिवस राहून रात्रीं तेथील तरुणांना शिक्षण द्यावें. प्रत्येक तालुक्याला असे स्वयंसेवक तयार करणारे दोन तरी शिक्षक हवेत. त्या शिक्षकांना पोटापुरता पगार दिला पाहिजे. स्वयंसेवकांना पोशाख दिले पाहिजेत. या सर्व गोष्टी कशा होणार ?

संयुक्तप्रांतांत एवढा उत्साह कां आहे ? तेथें शेतकर्‍याच्या दु:खांना, कामगारांच्या दु:खांना, अधिक जिव्हाळ्यानें सहानुभूति दाखविली जाते. संयुक्तप्रांतीय काँग्रेसकमिट्यांना समाजसत्तावादाचा थोडा वास आहे. हा सुवास सर्वत्र दरवळत जातो व संघटनेला मदत होते. काँग्रेसच्या स्वयंसेवकांत विद्यार्थीच तेवढे दिसावे का ? प्रौढ लोक कां नकोत ? सारे शेतकरी, कामकरी स्वयंसेवक होतील. शेतांत काम करतील, इकडे झेंडा नाचवतील. शाळेंतील दोन सुशिक्षित विद्यार्थी किती पुरे पडणार ? जर्मनींत, इटलींत का विद्यार्थीच असतात ? सारी जनता स्वयंसेवक बनते. पेशावरच्या लाल डगलेवाल्यांत का विद्यार्थीच आहेत ? गांवोगांवचे शेंकडों शेतकरी त्या संघटनेंत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel