हिंदु-मुसलमानांत पराकाष्ठेचा बंधुभाव उत्पन्न झाला होता. मुसलमानी पाणी हिंदु प्यायले, हिंदू पाणी मुसलमान प्यायले. मशिदींतून श्रध्दानंदांनीं व्याख्यानें दिलीं. गोळीबारांत मेलेल्या हिंदूंना मुसलमानांनी खांदे दिले तर मुसलमानांच्या कबरस्थानांत हिंदु पोंचवावयास गेले. हिंदु-मुसलमानांचें तें दिवस प्रेम आपण विसरतां कामा नये. सहा एप्रिल येतांच त्याची आठवण झाली पाहिजे. सहा एप्रिल दिवसाला प्रारंभ झाला. आम्ही उपवास केला, सरकारनें गोळीबार केला. या गोळीबाराची पराकाष्ठा तेरा तारखेस झाली. तेरा तारखेस अमृतसर येथें जालियनवाला बागेंत वीस हजार लोकांची प्रचंड सभा भरली होती. वर्षप्रतिपदेचा तो दिवस होता. पंजाबांत सत्याग्रह पेटत चालला होता. कारण, महायुध्दाच्या काळांत रिक्रूट भरती करतांना पंजाबांत भयंकर अत्याचार झाले होते. पंजाबी सिंह ब्रिटिश सरकारच्या पंजाखालीं चिरडण्यांत आला होता. सत्याग्रहाचें नवीन साधन येतांच पंजाबी जनता उठून उभी राहूं लागली. पंजाबचे गव्हर्नर ओड्वायर यांना जागृत पंजाब सहन होईना. पंजाबला चिरडून टाकण्याचा त्यांनीं निश्चय केला. ही पेटती ज्योत दडपून टाकण्याचें त्यांनीं ठरविलें. जालियनवाला बागेंतील वीस हजार लोकांवर सोळाशें गोळ्या झाडण्यांत आल्या. गोळ्या संपल्या, नाहीं तर सोळा हजारहि सोडण्यांत आल्या असत्या. स्त्री-पुरुष-मुलें यांच्या प्रेतांचे खच पडले. तेरा एप्रिल रक्तानें रंगला. गुढीपाडव्याचा तो दिवस भारत मातेच्या मुलांच्या रक्तानें रंगला. निष्पाप बलिदान झालें. त्यानंतर पंजाबभर लष्करी कायदा पुकारण्यांत आला. भराभर अमानुष शिक्षा झाल्या. रस्त्यांतून फटके मारले गेले. उन्हांतून मुलांना मैल मैल फिरविण्यांत आलें. जमिनीवरून सरपटत जाण्याचे हुकूम सोडण्यांत आले.

सरकारनें पुढें चौकशी कमिटी नेमली तिनें सर्व कृत्यांवर बोळा फिरविला. सोळाशें गोळ्या घालणार्‍यास इंग्लंडमधील जनतेनें फंड उभारून देणग्या दिल्या ! काँग्रेसनें स्वतंत्र चौकशी कमिटी नेमली. या कमिटीचा रिपोर्ट पुढें जप्त करण्यात आला. या काँग्रेस कमिटीच्या रिपोर्टावर शेवटच्या सह्या मला वाटतें काशी किंवा अलाहाबाद येथें गंगेच्या तीरावर करण्यांत आल्या. आणि राष्ट्राचा अपमान धुवून निघेपर्यंत स्वस्थ रहावयाचें नाहीं अशा प्रतिज्ञा पुढार्‍यांनीं घेतल्या. सत्याग्रहाचा संग्राम स्वराज्य मिळेपर्यंत निरनिराळ्या स्वरूपांत सुरू ठेवावयाचा अशी ती घोषणा होती.

असा हा राष्ट्रीय सप्ताहाचा इतिहास आहे. या इतिहासाचें स्मरण करा. राष्ट्राचा अपमान आठवा. राष्ट्राचें बलिदान आठवा. स्वातंत्र्यासाठीं शक्य तें सारें करावयास उभे रहा. या सप्ताहांत निरनिराळे निश्चय करा. मी मरेपर्यंत खादी वापरीन, मी दरवर्षी काँग्रेसचा सभासद होईन. मी नेहमीं काँग्रेसलाच मत देईन, मी स्वदेशीचा उपांसक होईन, मी हिंदु-मुसलमान ऐक्याचा पुरस्कार करीन, मी हरिजनांना छातीशीं लावीन, मी जातिभेदास मूठमाती देईन, असे संकल्प मनांत करा.

तालुका काँग्रेस कमिटयांनीं या सात दिवसांत कार्यक्रम करावे. ता.काँ.कमिटींतील प्रत्येक सभासदानें दोनशें सभासद या सात दिवसांत नोंदविण्याचा ठराव करावा. तसेच रोज प्रभात फेरी काढावी, खादी विकावी; गांव स्वच्छ करावा; झेंडावंदन करावें. अशा रीतीनें हे सात दिवस राष्ट्रीय जागृतींत जाऊं देत. हा सप्ताह नीट साजरा होऊं दे.             
६ एप्रिल, १९३८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel