परंतु खानदेशांतील राष्ट्रप्रेम या 'काँग्रेस' पत्राला भिक्षा मागावयास लावणार नाहीं अशी मला श्रध्दा आहे. खानदेशांतील सहानुभूतीचे झरे या पत्राचें पोषण करतील. शेंकडों बालगोपाळ या पत्राचा आपलेपणानें सर्वत्र प्रचार करतील. खानदेशांत का माझे शंभर मित्र नाहींत कीं जे वीस वीस वर्गणीदार या पत्रकाला मिळवून देणार नाहींत ? माझे मित्र म्हणजे काँग्रेसचे मित्र, माझ्या मैत्रीचा दुसरा अर्थ नाहीं.

राष्ट्रीय सप्ताहाच्या पहिल्या मंगल दिवशीं हा पहिला अंक जन्म घेत आहे. या एकाच गोष्टीवरून या पत्राचें धोरण कळून येईल. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे काय ? त्याचा इतिहास अन्यत्र दिला आहे. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे पंजाबांतील जालियनवाला बागेंतील शेंकडों हुतात्म्यांचें स्मरण. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे स्वातंत्र्यासाठीं सर्वस्व अर्पावें लागतें याची प्रखर आठवण. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे स्वातंत्र्याच्या सर्व साधनांची पूजा व प्रचार. ज्या ज्या योगें राष्ट्राचें बळ वाढेल त्या त्या सर्व गोष्टी करूं पाहणें म्हणजे राष्ट्रीय आठवडा. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे त्याग, राष्ट्रीय सप्ताह म्हणजे खादी, राष्ट्रीय सप्ताह म्हणजे हिंदु-मुस्लीम ऐक्य, राष्ट्रीय सप्ताह म्हणजे हरिजन-सेवा; राष्ट्रीय सप्ताह म्हणजे निर्भयता, राष्ट्रीय सप्ताह म्हणजे जातिभेदांचा अंत; राष्ट्रीय सप्ताह म्हणजे साक्षरता प्रसार, स्वच्छता प्रसार; राष्ट्रीय सप्ताह म्हणजे संघटना, स्वयंसेवक दलें वाढविणें, वानरसेना वाढविणें; राष्ट्रीय सप्ताह म्हणजे काँग्रेसचे लाखों सभासद करणें, झेंडा गांवोगांव फडकविणें; राष्ट्रीय सप्ताह म्हणजे प्रभातफेर्‍या, पोवाडे, गाणीं यांची मंगल दंगल; थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे राष्ट्रांत उत्पन्न झालेल्या शेंकडों स्वातंत्र्यपोषक व स्वातंत्र्यसाधक अशा सेवासाधनांचा उत्कटपणें निरलस प्रचार व आचार. जें साप्ताहिक राष्ट्रीय सप्ताहाच्या आरंभीं निघत आहे तें राष्ट्रोध्दारक सर्व सेवासाधनांना सतत उचलून धरील; या सर्व गोष्टींचा सर्वत्र प्रचार व्हावा म्हणून धडपड करील.

'या पत्रांत जी विशाल व व्यापक सहानुभूति आढळेल तशी क्वचितच आढळेल. लोक म्हणतात साने गुरुजी खादीधारी लोकांची संख्या वाढत नाहीं म्हणूनहि उपवास करतात, आणि कामगारांचा प्रश्न अजून कसा महाराष्ट्र उचलीत नाहीं म्हणूनहि अधीर होऊन उपवास करतात. उठल्या बसल्या उपवास करणें कदाचित् वेडेपणा असेल व अहंकार असेल. परंतु खादीलाहि प्रेमानें मिठी मारणारा व कामगारांतहि उत्कटपणें शिरणारा असा. एक विचित्र प्राणी म्हणजे हे साने गुरुजी ! अर्थात् त्यांचें पत्रहि असेंच असेल. या वर्तमानपत्रांत खादी दिसतांच 'क्रांति' पत्राचे संपादक कदाचित् हंसतील. तर या वर्तमानपत्रांत क्वचित् कोणाला साम्यवादाचा वास येऊन ते कपाळाला आंठ्या पाडतील. परंतु कोणी हंसो वा कोणी रागावो. आपल्या स्वत:च्या समाधानासाठीं हें पत्र आहे.

हें पत्र जातिभेदाचें भूत गाडूं पाहील, द्वेषाला शमवूं पाहील; अहिंसा प्रचारील, सध्दर्माच्या कल्पना फैलावील; रूढींना जाळील, दंभ दुरावील, जीवनांत निर्मळपणा आणील, प्रेम आणील, कर्म आणील. खानदेशभर एक प्रकारचें नवचैतन्य हें पत्र निर्माण करूं पाहील; निद्रितांना जागें करील व जागृतांस कामास लावील; जनतेचीं हृदयें काँग्रेस-प्रेमानें उचंबळून सोडील व काँग्रेसच्या भक्तीनें रंगलेले जीव ठायींठायीं असंख्य आहेत, त्यांना जोडील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel